नियोजनच नसल्याने वाहतूक पोलिसांमध्ये संभ्रम

महाडची दुर्घटना आणि मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न टाळण्यात सरकारला आलेले अपयश; या पाश्र्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून कोकणात जाण्यासाठी कोल्हापूपर्यंत गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर झाली असली तरी परतीच्या प्रवासात ती मिळण्याची कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. तसेच कोकणातील पत्त्याचा पुरावाही गणेशभक्ताला नजिकच्या वाहतूक चौकीत द्यावा लागणार असल्याने टोलमाफीचा लाभ प्रत्यक्षात कितीजणांना घेता येणार, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. या टोलमाफीबाबत वाहतूक खात्यात कोणतेही नियोजन नसल्याने आणि आदेशांबाबतही स्पष्टता नसल्याने वाहतूक पोलीसही संभ्रमात पडले आहेत.

टोलमाफी मिळवण्यासाठी संबंधित गणेशभक्ताला त्याचे पूर्ण नाव, त्याचा कोकणातील पत्ता, मोबाइल नंबर अशी माहिती जवळच्या वाहतूक विभागाच्या चौकीत द्यावी लागणार आहे. ती माहिती त्या चौकीतील स्वतंत्र नोंदवहीमध्ये  नोंदविल्यानंतर पोलिसांकडून टोलमाफीचा पास दिला जाणार आहे. मुंबईत राहाणाऱ्या पण कोकणात आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची अडचण अशी की त्यांची ओळख पटविणाऱ्या सर्व कागदपत्रांत मुंबईचाच पत्ता आहे. कोकणातील जमिनीच्या सातबारावर कुटुंब प्रमुखाच्या नावाखेरीज अन्य कोणताही पुरावा मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासियांकडे नाही. त्यामुळे टोलमाफीत पुराव्याचे विघ्न उभे आहे.

ज्या वाहतूक चौकीतून सामान्यांना टोलमाफी मिळणार आहे, तेथे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. याशिवाय पोलीस महासंचालकांनी प्रत्येक वाहतूक पोलीस चौक्यांमध्ये पाठविलेल्या आदेशपत्रात गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाच्या वेळी टोलमाफीचा उल्लेख न केल्याने भक्तांमध्ये संभ्रम आहे.

परतीच्या प्रवासालाही टोलमाफी न मिळाल्यास गणपती विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना सामान्यांना करावा लागण्याचीही भीती आहे.

स्वतंत्र चौकी उभारा

मुंबई पूणे द्रुतगती महामार्ग हा कळंबोली येथे ज्या मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरून सुरू होतो तेथे नवी मुंबई वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन टोलमाफीचा पास देण्यासाठी पाच दिवसासाठी स्वतंत्र चौकी उभारावी. असे झाल्यास मुंबई व उपनगरांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना पुन्हा कळंबोली चौकीकडे जाण्यासाठी वळसा घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होईल, अशी मागणी सिंधुदुर्ग कला सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विष्णु धुरे यांनी केली आहे.

कोकणचे फक्त नाव!

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणारी व्यक्ती कोकणातच जात आहे का, याची ओळख पटवण्यासाठी कोणता पुरावा संबंधित गणेशभक्ताकडून घ्यावा, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.  द्रुतगती महामार्गावरून पुणे व इतर ठिकाणी जाणारे गणेशभक्त या आदेशाचा फायदा घेतील, अशी शंका.

प्रवास कसा?

द्रुतगती मार्गावरून जाऊन नंतर पुणे-बंगळुरू महामार्गे कोल्हापूर, कणकवली आणि सातारा कराडमार्गे चिपळूण अशा प्रवासाची सूचना.

कडक पहारा

  • मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीवर सीसीटीव्हीची नजर
  • खारपाडा ते कशेडी या टप्प्यात १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
  • सुरक्षेसाठी द्रुतगती मार्गावर एक पोलीस अधीक्षक, एक पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक आणि ६११ पोलीस कर्मचारी.