टोमॅटोच्या दरवाढीने बेजार झालेल्या ग्राहकांना आता कांद्याच्या वाढत्या किमतींना तोंड द्यावे लागणार आहे. मध्य आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांतील उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घटल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम देशभरातील कांद्याच्या पुरवठय़ावर दिसू लागला असून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या उपनगरांना कृषीमालाचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारात शुक्रवारी उत्तम प्रतीच्या कांद्याचे दर किलोमागे २८ रुपयांपर्यंत पोहोचले. अगदी दोन दिवसांपूर्वी ८ ते १५ रुपयांना हा कांदा उपलब्ध होता. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील किरकोळ बाजारात शुक्रवार दुपापर्यंत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र सायंकाळ होताच या शहरांमधील मध्यवर्ती किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३५ रुपयांपर्यंत पोहोचले. येत्या काही दिवसांत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परराज्यातून मागणी वाढल्याने कांदा दरातील चढता आलेख कायम राहिला. शुक्रवारी लासलगाव बाजारात केवळ आदल्या दिवशीच्या शिल्लक राहिलेल्या कांद्याचे लिलाव होऊन त्यास सरासरी २१६० रुपये दर मिळाले. मनमाड बाजार समितीत क्विंटलला २१५० रुपये दर मिळाला.

दर उंचावल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा विक्रीला नेण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे गुरूवारी लासलगाव बाजारात सकाळी सरासरी २४०० रुपयांवर गेलेला दर आवक वाढल्याने सायंकाळी २११० रुपयांपर्यंत खाली आला होता. कांद्याची इतकी आवक झाली की, रात्री उशिरानंतर लिलाव स्थगित करावे लागले. स्थानिक धार्मिक कार्यक्रमामुळे शुक्रवारी बाजार समितीत लिलाव बंद होते. केवळ आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या १९ हजार क्विंटल कांद्याचे लिलाव सकाळी

पार पडले. त्यास किमान ८०० ते कमाल २४०० असा भाव मिळाला. मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याची चार हजार क्विंटल आवक झाली. त्यास किमान ५०० ते कमाल २३७१ रुपये दर मिळाले.