घाऊक बाजारात दर १६ रुपये प्रति किलो

मागणीच्या तुलनेत आवक रोडावल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात दराचा उच्चांक गाठणाऱ्या टोमॅटोचे दर आता आटोक्यात येऊ लागले आहेत. घाऊक बाजारातील आवक वाढल्याने दोन दिवसांपूर्वीपर्यंत ३२ ते ४० रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो गुरुवारी १४ ते १६ रुपये किलो दराने विकला जात होता. ही घसरण किरकोळ बाजारातही दिसून येत असून येथील टोमॅटोचे दर ४० ते ६० रुपये प्रति किलो झाले आहेत.

तीन-चार वर्षांपासून टोमॅटोला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटोची कमी लागवड केली. बंगळूरुतून होणारी आवकही बंद झाली होती. नवीन टोमॅटो पिकाचा हंगामही संपल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोवर पोहोचले होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत टोमॅटोचे दर खाली उतरू लागले आहेत. सोमवारी एपीएमसीत ३२ टन टोमॅटोची आवक झाली होती. ती आता दुप्पट होऊन गुरुवारी ६० टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सोमवारी ४० रुपये किलोने उपलब्ध असलेला टोमॅटो गुरुवारी १६ रुपये किलोने विकला गेला. सातारा, सांगली, पुणे, नाशिक, विटा या भागांतून टोमॅटोची आवक सुरू झाली असली तरी, सध्या सोलापूर जिल्ह्यतून टोमॅटोची मोठी आवक होत आहे. तसेच बंगळूरुतूनही टोमॅटोची आवक होत आहे. किरकोळ बाजारातही टोमॅटोचे दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलोदरम्यान स्थिरावले आहेत. मात्र, घाऊक दरांच्या तुलनेत किरकोळ बाजारात भावात फारशी घसरण झालेली नाही. किरकोळ विक्रेत्यांनी नफेखोरीचा मार्ग अवलंबल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे दिसून येत आहे.

वाशी बाजारातील टोमॅटोची आवक दुपटीने वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी ३२ टन आवक होत होती. ती आता ६० टन झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव उतरले आहेत. बाजारात टोमॅटोचे नवीन उत्पादन येण्यासही सुरुवात झाली आहे.

प्रशांत जगताप, व्यापारी, वाशी एपीएमएसी