उरण वाहतूक पोलीस विभागात मनुष्यबळातही वाढ
नो पार्किंगच्या जागेत वाहने उभी करणे, वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवण्याची उरणकरांची सवयच त्यांच्याच मुळावर आली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यावर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई न करता हातावर हात ठेवून बसले आहेत, असा आरोप करीत नागरिकांनी याबद्दल वाहतूक पोलिसांनाच लक्ष्य केल्याने वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलद हिवाळे यांनी शहरात वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने ‘टोइंग व्हॅन’ची व्यवस्था करू असे सांगितले आहे, परंतु हे करताना मनुष्यबळाचीही उणीव भासत असून त्याच्यातही वाढ करण्यात येईल, असे ‘महामुंबई वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
शहरात होणारी कोंडी सकाळी किंवा सायंकाळी या वेळेत होत होती. ती आता वाढून दिवसभरात झाली असल्याने कोंडीत अडकल्याने सध्याच्या जाळून काढणाऱ्या उन्हाच्या ज्वालात प्रवाशांना घामाच्या धारांनी न्हाऊन निघावे लागत आहे. उरण नगरपालिका,वाहतूक शाखा यांच्याकडून ज्या प्रमाणात शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करायला हव्या त्यानुसार केल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दररोज खिडकोळी नाका या एकाच ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असतात. मात्र तेथेही ये-जा करणारी वाहतूक नियंत्रण करता येत नसल्याचे चित्र आहे.त्यात सध्या जरीमरी मंदिर, कोटनाका, गणपती चौक व एस.टी.स्टँड चारफाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चार वर्षांपूर्वी उरण नगरपालिका व उरणच्या वाहतूक विभागाने उरण शहरात वाहन तळांची निश्चिती करणारे फलक रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. त्या ठिकाणी नियमांच्या विरोधात नो पाìकगमध्ये बेकायदा पाìकग केली जाते.