सरसकट सर्वाना परवानगी देण्याची पारंपरिक मच्छीमारांची मागणी

दोन महिन्यांच्या मासेमारीवरील बंदी संपल्याने आजपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. मात्र या हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यातील मच्छीमारांमध्ये पर्सिसीन व एलईडी पद्धतीच्या मासेमारीवरून असलेले मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पारंपरिक मच्छीमारांनी या पद्धतींवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी करताना समुद्रातील मत्स्यबीजाचे अस्तित्वच यामुळे नष्ट होत असल्याचा दावा केला आहे.

समुद्रातील मासेमारीत गेल्या काही वर्षांपासून बदल झाले आहेत. त्यामुळे पारंपरिक ट्रॉलरऐवजी आता पर्सिसीन आणि एलईडीसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे. या दोन्ही पद्धतींमध्ये जाळ्याने होणाऱ्या मासेमारीमुळे मासे पकडण्याची क्षमता वाढली आहे. तर मोठय़ा क्षमतेच्या एलईडी पद्धतीत लहान जीव देखील नामशेष होत असल्याने मासे प्रजननावरच त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे या दोन्हीही आधुनिक मासेमारीच्या पद्धतींना पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचा विरोध आहे.

एलईडी मासेमारीला पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे. परंतु काहींना परवानगी दिली जाते तर बहुतांश मच्छीमारांना ती नाकारली जात असल्याने राज्य सरकारने एकतर सर्वाना परवानगी द्यावी अन्यथा त्यावर पूर्णत: बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे.

-शिवदास नाखवा, अध्यक्ष, मच्छीमार सोसायटी, करंजा  

१ ऑगस्टपासून सुरू होणारी मासेमारी पारंपरिक असून पर्सिसीन तसेच एलईडीला परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय अशा प्रकारच्या मासेमारीला महाराष्ट्रात १२ नॉटिकल परिसरात बंदी असून फक्त सप्टेंबर ते डिसेंबरमध्येच त्याला परवानगी असते. तर एलईडी संदर्भात केंद्र सरकारकडून काही अटींवरच परवानगी देण्यात येत असल्याने राज्य मत्स्य विभाग त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

-अविनाश नाखवा, मत्स्य उपायुक्त, रायगड</strong>