खारघरमधील पाडे दळणवळणाच्या साधनांपासून वंचित; पाण्याचीही टंचा

वेगाने विकसित होत असलेल्या खारघरमधील प्रभाग क्रमांक ५च्या दोन भागांतील सोयीसुविधांत प्रचंड तफावत आहे. हिरानंदानी, से. ३, ४, ७ येथील उच्चवर्गीयांच्या वस्तीत सर्व सुखसोयी आहेत, मात्र त्याच प्रभागातील फणसवाडी आणि चाफेवाडी हे आदिवासी पाडे आजही शिक्षण, दळण-वळणापासून वंचित आहेत.

प्रभाग क्रमांक ५च्या शहरी भागात दळणवळाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. मेट्रोदेखील सुरू होणार आहे, मात्र शहरातील फणसवाडी आणि चाफेवाडी आदिवासी पाडय़ांमध्ये आजही बससेवा उपलब्ध नाही, रिक्षा थांबाही नाही. याच पाडय़ांच्या प्रवेशद्वारापासूनच मेट्रोचे मार्गक्रमाण होणार आहे. या पाडय़ांतील आदिवासी आजही पायपीट करूनच शहर गाठत आहेत. खारघरपासून ७ किमी दूर असलेल्या डोंगरावरील पाडय़ांमध्ये जाण्यासाठी १० वर्षांपूर्वी डांबरी रस्ता बांधण्यात आला, मात्र अद्याप बससेवा देण्यात आलेली नाही. येथील आदिवासी डांबरी रस्त्याऐवजी डोंगरातून ये-जा करतात. ते आजही या पाऊलवाटेने बेलापूर, खारघर, नेरूळ, तळोजा गाठतात. डांबरी रस्त्याने खाली उतरण्यापेक्षा पायवाटेने जाणे त्यांना सोपे वाटते. त्यामुळे तो रस्ता वापराविनाच आहे. खारघर हिलचाही समावेश याच पाडय़ांमध्ये आहे.

बेलपाडा गावात अनेक टोलेजंग टॉवर आहेत. तिथे पाणीटंचाईची समस्या आहे, मात्र कातकरवाडीतील पाणी समस्या अधिक भीषण असल्यामुळे तेथील रहिवासीदेखील बेलपाडय़ातच पाणी भरण्यासाठी जातात. त्यामुळे बेलपाडय़ातील समस्या अधिक तीव्र झाली आहे. कित्येक वेळा आदिवासींना पाणी मिळत नाही. बेलपाडा गावात पाण्याची एक स्वतंत्र टाकी बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

transportataion-chart

विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाचा प्रश्न

फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासी पाडय़ांत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु त्यापुढील शिक्षणासाठी  विध्यार्थ्यांना कोपरा, बेलापूर येथील शाळेत जावे लागते. वाहतुकीचे साधन नसल्याने शाळेत जाण्यासाठी मुलांना रोज चार तास पायपीट करावी लागते. त्यामुळे अनेक मुले शाळेत जाणे टाळतात आणि प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थी गळती सुरू होते. बेलपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती बिकट आहे. सन १९५६ मध्ये बांधण्यात आलेल्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्या ऐवजी समाज मंदिरात शाळा भरवली जाते. ही शाळा पुन्हा बांधण्यात यावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. त्याचबरोबर अंगणवाडीदेखील सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.

कातकरवाडीत अनधिकृत झोपडय़ा

बेलपाडा गावाच्या बाजूला कातकर वाडी आहे. येथे काही मूळचे रहिवासी आहेत, मात्र अलीकडच्या काळात तेथे अनधिकृत झोपडय़ांचे जाळे पसरत चालले आहे. या झोपडीतील लोकांमुळे अस्वच्छता वाढली आहे. सुमारे १०० ते १५० अनधिकृत झोपडय़ा येथे आहेत. झोपडपट्टीवासीय उघडय़ावरच प्रातर्विधी करतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दरुगधी पसरली आहे. या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

प्रभागक्षेत्र : हिरानंदानी मार्ग, हिरानंदानी कॉम्प्लेक्स, से. १२, , बेलपाडा, कातकरीवाडी