मजुरी, लाकूड तोडण्याची कामे मिळेनात; उसनवारीमुळे अनेकांवर माघारी परतण्याची वेळ

पाडय़ांवर राहणारे आदिवासी पावसाळ्यातील चार महिन्यांची शेतीची कामे उरकून मजुरीच्या शोधात शहराची वाट धरतात. पेण तालुक्यातून उरणकडे जवळपास ५० कुटुंबे आली आहेत; मात्र नोटाबंदीमुळे मजुरीची तसेच लाकूड तोडण्याची कामे मिळणे बंद झाल्याने माघारी परतण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची हताश भावना आदिवासींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे.

रायगड, ठाणे तसेच इतर जिल्ह्य़ांतील बहुतांशी आदिवासींच्या जीवनात पावसाचे चार महिने आपल्या कुटुंबासह पाडय़ावर तर पुढील आठ महिने भटकंती करून मिळेल तेथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अशी पद्धत आहे. त्यामुळे आदिवासी पाडे ओस पडतात. याच जगण्याला आदिवासी जगायला जात असल्याचे बोलले जाते.

यात आदिवासी, ठाकूर, कातकरी आदी आदिवासी जमातींचा समावेश आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात उरण शहरा लगतच्या मुळेखंड पाडा येथील शेतात गवताच्या झोपडय़ा तयार करून ही कुटुंब येतात.

यातील बहुतेक कुटुंबातील पुरुष लाकडे तोडण्याचे काम करतात. पावसाळ्यात आलेले गवत व वाढलेली झाडे छाटून त्याची जळावू लाकडे तयार करण्याच्या तसेच विट भट्टय़ांवरील कामे करतात. डोंगर व दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या या आदिवासींना शहराच्या परिसरात चांगली मजुरी मिळते.

त्यामुळे ही परंपराच बनली आहे. २०० ते ४०० रुपये मजुरीवर काम करणारे आदिवासी एकत्रित येऊन दिवसाकाठी ८०० रुपये मजुरी मिळवीत असल्याची माहिती शिमग्या दोरे या आदिवासीने दिले.

रोज लाकूड तोडण्याची कामे पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाला अन्न शिजविण्यासाठी लागणारा लाकूडफाटाही मिळतो. त्यामुळे मजुरीतील काही रक्कम शिल्लक राहते. याच मजुरीतून शिल्लक राहिलेल्या पैशातूनच पाडय़ावर जाऊन पावसात भात तसेच नाचणीची शेती केली जात असल्याची माहिती गुणा नाईक या आदिवासी महिलेने सांगितेल. पाडे सोडून आलेल्या महिना झाला असून मजुरीच मिळत नसल्याने पदरचे पैसे खर्च करून राहावे लागत असल्याची माहिती पद्माकर ठाकर याने दिली. त्यामुळे परत पाडय़ावर जाण्याचा विचार करीत असल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे रोज कमावून मजुरीवर कुटुंब चालविणाऱ्या आदिवासींवर नोटाबंदीचा गंभीर परिणाम होत आहे.