तुकाराम मुंढे यांचा बदलीपूर्वीच निर्णय; लाखोंचा दंड

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरुळ येथील रुग्णालये आणि माता-बाल रुग्णालयांमध्ये यांत्रिक सफाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी मेसर्स बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड या बडय़ा कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय तुकाराम मुंढे यांनी बदलीपूर्वी घेतला आहे. महापालिकेच्या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या ठेकेदारांना कोटय़वधी रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंढे यांनी यापूर्वी घेतला होता. या ठेकेदारांच्या यादीत बी. व्ही.जी. कंपनीचाही समावेश झाला असून, विविध मुद्दय़ांच्या आधारे लाखो रुपयांचा दंड या कंपनीस ठोठाविण्यात आला आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी ठाणे-बेलापूर तसेच पाम बीच मार्गाची साफसफाई यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय वादात सापडला होता. ही यांत्रिक सफाई मोठय़ा मार्गाच्या स्वच्छतेसाठी कितपत उपयोगी ठरेल हा सवाल कायम असताना मुंढे यांची नवी मुंबई महापालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी येथील रुग्णालयांची सफाईदेखील यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांचा वावर असतो. मध्यंतरी महापालिकेने ऐरोली आणि नेरुळ येथे १०० खाटांच्या रुग्णालयांची उभारणी केली. या उभारणीवर झालेला वारेमाप खर्च यापूर्वीच चौकशीच्या फेऱ्यात सापडला असताना महापालिकेने येथील साफसफाईची कामे यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रियेनंतर मेसर्स बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीस हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात निविदेतील अटींप्रमाणे काम होत नसल्याच्या तक्रारी तुकाराम मुंढे यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे चौकशीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, डॉ. वसंत माने, डॉ. वैभव झुंजारे या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.

या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक केलेल्या पाहणीत रुग्णालय सफाईत अनेक त्रुटी असल्याचे आढळले. याप्रकरणी महापालिकेने कंपनीला नोटीस बजावून खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या. कंपनीने कर्मचाऱ्यांची   संख्या आणि रसायनांची उपलब्धता या संबंधी सविस्तर खुलासा केला खरा, मात्र एकंदर प्रकरणातील त्रुटी लक्षात घेऊन कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला आहे.

शहरातील साफसफाई तसेच डासआळी नाशक फवारणी ठेक्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर घोळ असल्याच्या तक्रारी वर्षांनुवर्षे पुढे येत असताना त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, रुग्णालयातील साफसफाईच्या मुद्दय़ावरून मुंढे यांनी जाता जाता ठेकेदारास दणका देत काही लाख रुपयांचा दंड आकारल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बी. व्ही. जी. कंपनीचे व्यवस्थापन विभागप्रमुख ओमकार सप्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

चौकशीत आढळलेल्या त्रुटी

* निविदा प्रक्रियेत नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे, यंत्रांचा तुटवडा असल्याचे व सफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा पुरेसा साठा नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

* महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत यांत्रिक पद्धतीने रुग्णालयांची सतत सफाई होणे बंधन घालण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील स्वच्छतागृह, बाह्यरुग्ण विभाग तसेच आवारात पुरेशी साफसफाई होत नसल्याचे महापालिकेच्या पथकास तपासणीदरम्यान आढळले.

* वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात तर धुळीचे थर आढळले.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]