नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष; फेरीवाले, अस्वच्छतेची समस्या गंभीर

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळात सर्व प्रशासकीय आणि नागरी कामे वेळेत आणि चोख करणारे कर्मचारी मुंढे यांची बदली होताच पुन्हा कामांकडे दुर्लक्ष सुरू केल्याचेच नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिसून आले. अनेक गंभीर तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला. शहरातील अस्वच्छतेची दखल थेट न्यायाधीशांना घ्यावी लागली. रेल्वे स्थानकांबाहेरील रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी पुन्हा व्यापले आहेत आणि दुकानदारांनी मार्जिनल स्पेसवर पुन्हा हात-पाय पसरले आहेत.

मुंढे यांच्या काळात ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविण्यात येत असे. रहिवाशांनी तक्रारी करू नयेत, यासाठी अधिकारी आदल्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन समस्या सोडवत. मुंढे यांनी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाया केल्या. कारवाईच्या भीतीने काही अधिकाऱ्यांनी पालिकेला रामराम ठोकला. मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाचा मोठा आनंद या अधिकाऱ्यांना झाला होता. बेकायदा बांधकामे कायम करण्याच्या धोरणालाच मुंढे यांनी विरोध केला आणि त्यांची बदली पुण्यात करण्यात आलली.

मुंढे यांची जागा शांत, संयमी डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतली, मात्र त्यांच्या या स्वभावाचा काही अधिकारी गैरफायदा घेऊ लागले आहेत. त्याचे प्रतिबिंब शहरात उमटू लागले आहे. शहरात एवढी अस्वच्छता आहे, की त्याची दखल थेट येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांना घ्यावी लागली. वाशी, ऐरोली, नेरुळ, घणसोली या वर्दळीच्या रेल्वे स्थानकांबाहेर तसेच काही पदपथांवर फेरीवाल्यांची गर्दी आहे. ज्या दुकानांवर आणि हॉटेलांवर मार्जिनल स्पेसच्या गैरवापराप्रकरणी कारवाई केली होती, त्यांनी आता तिथे पुन्हा अतिक्रमण केले आहे. ग्रामीण भागात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे पुन्हा पुढे येऊ लागली आहेत. अडवली भुतवलीचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. खासगी संस्थेला दिले विकास आराखडय़ाचे काम पालिकेने स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आराखडय़ात हवे ते बदल करणे शक्य होणार आहे. या समस्यांचा पाढा बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी वाचला.

काही अधिकाऱ्यांना लोकशाही मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची नागरी कामे ऐकून घेणे आणि ती योग्य असतील तर करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. अधिकारी हा जनतेचा सेवक आहे. अयोग्य कामांची तक्रार करण्यास कोणीही मज्जाव केलेला नाही, पण अलीकडे अधिकारी कर्मचारी लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. बुधवारच्या सभेत नगरसेवकांनी याच भावना मांडल्या. मुंंढे यांच्या काळात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी घडल्या हे सत्य आहे.

-सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई</strong>