सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या केवाळे येथील विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला दोन शिक्षकांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी शिक्षकांविरोधात बालहक्क व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. कळंबोली येथील सुधागड सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील १२वीच्या विद्यार्थिनीने परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गणिताच्या तासाला शिकवण्याकडे लक्ष न देता सूर्यफुलाच्या बिया खात असल्याच्या कारणावरून शिक्षकांनी त्याला मारहाण केली. याच वेळी दुसऱ्या शिक्षकानेही या विद्यार्थ्यांला मारहाण केली.

या वेळी शिक्षकाने मारहाणीचे समर्थन करताना विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांशी भांडण करीत होता. त्याला शांत करण्यासाठी आपण त्याच्यावर कारवाई केल्याचे म्हटले.

एकाच दिवशी दोन शिक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने ही घटना दडपण्यासाठी प्रयत्न केल्याचे पालकांनी सांगितले.

शुक्रवारी ही घटना केवाळे गावातील विद्यालयात घडली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊ नये म्हणून व्यवस्थापनाकडून अनेक प्रयत्न झाल्याचे पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले. पालक आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात या दोनही शिक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे; मात्र बालक हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत या शिक्षकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.