स्थायी समिती सदस्यांची यादी बदलली जाण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतच मर्यादित असलेला नवी मुंबई शिवसेनेतील वाद आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला असून मातोश्री स्थायी समिती सदस्य नियुक्तीमध्ये फेरफार करणार असल्याचे समजते. विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा या दोन्ही गटांतील सर्मथकांना स्थायी समिती सदस्यपदी संधी दिली जाईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही
iqbal singh chahal
BMC च्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बालसिंग चहल आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती

स्थायी समितीतील पाच सदस्यांच्या नियुक्तीवरून नवी मुंबई शिवसेनेत बंडखोरीची ठिणगी पडली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच सदस्यांची यादी महापौर सुधाकर सोनावणे यांच्याकडे पाठविल्यानंतर शिवसेनेतील यादवीला सुरुवात झाली. या यादीत विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, गटनेते द्वारकानाथ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत व रंगनाथ औटी यांचा समावेश आहे. या यादीवर १९ शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वी अनेक पदांवर वर्णी लागलेल्या अथवा सध्या पदे भूषवणाऱ्या नगरसेवकांऐवजी ज्यांना यापूर्वी कोणतीच संधी मिळालेली नाही त्यांना समितीत घेण्यात यावे, अशी या नाराज नगरसेवकांची मागणी आहे. पालिकेकडे पाठविण्यात आलेली यादी ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली आहे. त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणतीच कल्पना नसल्याने त्यांनी या नाराजीची दखल घेतल्याचे समजते.

यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच ही यादी बदलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यात चौगुले आणि नाहटा अशा दोन्ही गटांतील नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. याशिवाय जुन्या आणि निष्ठावंत नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाराजी वाढण्याची चिन्हे

दोन्ही गटांतील नगरसेवकांना स्थायी समितीत सदस्यपदी नियुक्त केल्यास येत्या काळात ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या सर्मथकांना बाजूला सारून नवीन दमाच्या नगरसेवकांना स्थायी समितीत संधी मिळण्याचीही शक्यता आहे. या नियुक्तीनंतर लवकरच होणाऱ्या प्रभाग समिती तसेच परिवहन समितीच्या सदस्यपदासाठीच्या नियुक्तीतही हा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.