कोपरखैरणे सेक्टर-५ येथे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने एक इमारत, एक प्रार्थना स्थळ आणि बेकायदा गोदामावर कारवाई केली.

कोपरखैरणे सेक्टर-५, भूखंड क्रमांक ३९ हा साडेबारा टक्केअंतर्गत राखीव आहे. त्यावर बेकायदा तळमजला अधिक चार मजल्याची इमारत राजाराम नाईक यांनी बांधली होती. तिथे ११ घरे आणि तीन व्यावसायिक गाळे होते. ही इमारत अनधिकृत असल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात महिला पोलीस कर्मचारीही मोठय़ा प्रमाणात होते. इमारतीबाबत जून २०१६ मध्येच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही इमारत पाडण्यात न आल्याने सिडको आणि पालिकेने संयुक्त कारवाई केली. इमारतीतील रहिवाशांना पोलिसांनी बाहेर काढले. जवळच असलेले एक गोदाम आणि एका गणेश मंदिरावरही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्याने दिली.

सिडकोच्या साडेबारा टक्केमधील भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात २०१६मध्ये नोटीस बजावण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या इसमाने न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायलयाने अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.

– मनोहर मेनन, अतिक्रमण विभाग अधिकारी, सिडको