वाहतूक पोलीस दिसताच वॉलेट पार्किंगचे फलक गायब

वाशीतील सतरा प्लाझा येथील बेकायदा वॉलेट पार्किंगचे फलक वाहतूक विभागाने जप्त केले आहेत. या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. शहरात अनेक मॉल्स आणि व्यापारी संकुलांत बेकायदा वॉलेट पार्किंग सुरू आहे. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच हे पार्किंगचे फलक लपवले जातात आणि गाडी निघून जाताच पुन्हा बेकायदा पार्किंग सुरू होते. अशाप्रकारे वॉलेट पार्किंगवाले आणि वाहतूक पोलिसांचा लपंडाव सुरू आहे.

शहराचा झपाटय़ाने होणारा विस्तार, त्या प्रमाणात वाढलेली वाहने आणि पार्किंगसाठी उपलब्ध जागा यांचा ताळमेळ सिडको व पालिकेला घालता आलेला नाही. त्यामुळे शहरात सर्वच विभागांत बेकायदा दुतर्फा पार्किंग सुरू आहे. सम-विषम पार्किंगचे नियोजनही कोलमडले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग केलेले दिसते. शहरातील मोठे मॉल व व्यापारी संकुलांपुढे तर पालिका व वाहतूक विभागाने गुडघे टेकले आहेत. सतरा प्लाझा येथे रस्त्याच्या दुतर्फा कायम बेकायदा पार्किंग केले जाते. सतरा प्लाझामध्ये विविध दुकाने, कार्यालये आहेत. विविध वाहनांची खरेदी-विक्री आणि दुरुस्तीही येथे होते. तिथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यांवरच पार्क केली जातात. त्यासाठी वॉलेट पार्किंगचे बोर्ड मुख्य मार्गावरच उभारण्यात आले आहेत. दुकानदारांनी त्यासाठी पगारी कर्मचारीही ठेवले आहेत. ते दुकानात आलेल्या ग्राहकाचे वाहन पार्क करून देतात आणि काम संपल्यावर ते पुन्हा संबंधित ग्राहकाला आणून देतात. या बेकायदा वॉलेट पार्किंगमुळे या भागात कायमच वाहतूक कोंडी असते. मोठी दुर्घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सतरा प्लाझासमोर वॉलेट पार्किंगच्या नावाखाली हवी तिथे वाहने पार्क केली जातात. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्धीमाध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिल्यानंतर रस्त्यावरचे वॉलेट पार्किंगचे फलक हटविण्यात आले होते. काही ठिकाणी झाडांवर फलक लावले आहेत. वाहतूक विभाग कारवाईसाठी जाताच फलक लपवून ठेवले जातात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. पालिकेने याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवा. सतरा प्लाझाच्या पुढील भागात चारचाकी वाहनांची दुरुस्ती व इतर साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. त्यांचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेने आहे, याची पालिकेने पुन्हा तपासणी करावी. पालिकेने नुसत्या नोटिसा न देता योग्य कारवाई करावी.

मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक, एपीएमसी

सतरा प्लाझासमोरील वाहतूक व्यवस्था, तेथील पार्किंग आणि दुकानांच्या परवानगीबाबत योग्य ती तपासणी करण्यात येईल. त्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका