आलिशान, भव्य इमारत, अत्याधुनिक सोयी, उच्चशिक्षित शिक्षक आणि मोठी प्रतिष्ठा असलेल्या शाळांत तेवढेच भरमसाठ शुल्क भरून प्रवेश मिळवला जातो, पण या प्रतिष्ठितांच्या शाळांत तेवढेच उत्तम शिक्षण मिळते की शिक्षण ही विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षाच ठरते, असा प्रश्न पडावा, असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. खांदेश्वर येथील सेंट जोसेफ शाळेचा न सुटणार शुल्कप्रश्न असो वा न्यू होरायझन शाळेतील विद्यार्थ्यांचा खिडकीतून पडून झालेला मृत्यू.. पनवेलमधील शिक्षण व्यवस्थेपुढे या घटना एक भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात.

इंग्रजी माध्यमाच्या विशेषत: कॉन्व्हेंट शाळेत मुलांना प्रवेश मिळावा यासाठी धडपडणारे पालक जेव्हा, त्या शाळेच्या विरोधात स्थानिक शिक्षणाधिकारी, राज्याच्या शिक्षण संचालकांपासून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत अनेकांशी पत्रव्यवहार करतात, शाळेच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी करतात आणि या खटाटोपानंतरही हाती निराशा लागल्यामुळे अखेर राजकीय पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन मुले शाळेसमोरील रस्त्यावर ठिय्या देतात, तेव्हा शिक्षणाच्या आणि शाळांच्या दर्जावरच संशय घेण्याची वेळ येते.

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५७ शाळा आहेत, त्यात सुमारे २२,८०० विद्यार्थी शिकतात. तसेच पनवेल महापालिकेच्या शाळांत सुमारे दोन हजार १८ विद्यार्थी शिकतात. तालुक्यातील खासगी शाळांची संख्या पाहिली तर सरकारी शाळांपेक्षा मोठी आहे. २७७ खासगी शाळांमध्ये सुमारे १ लाख ५५ हजार २२० विद्यार्थी शिकतात. आजपर्यंत पालकांनी सरकारच्या जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळांविरोधात आंदोलन केल्याची नोंद पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यांच्या दप्तरी नाही. मात्र खासगी शाळांमध्ये अशा घटना वारंवार होताना दिसतात. पनवेलमध्ये तर हे प्रमाण लक्षणीय आहे.

खांदेश्वर येथील सेंट जोसेफ विद्यालयातील काही पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला काही अंशी राजकीय बळ मिळाले तरी अद्याप याच विद्यालयात शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांचा पाठिंबा आंदोलनाला मिळालेला नाही, हे मागील आठवडय़ात पालकांनी केलेल्या आंदोलना वेळी दिसून आले. आंदोलक पालक व्यासपीठावरून सर्व पालकांना वेळोवेळी एकत्र येण्याचे आवाहन करत होते. याच व्यासपीठावर एका महिला पालकाने या शाळेत मुलांच्या मनात सूडभावना निर्माण करणारी प्रार्थना शिकवली जात असल्याचा आरोप केला. सेंट जोसेफ विद्यालयाच्या शुल्कवाढीविरोधात पालकांनी पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण विभागाने याची दखल घेतली. या शाळेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. तरीही या विद्यालय व्यवस्थापनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही; परंतु त्याच काळात विद्यालयाने मुलांच्या प्रार्थनांमध्ये एका प्रार्थनेची भर घातली, असे या महिलेचे म्हणणे आहे. त्यांनी आंदोलनस्थळी जमावासमोर ही प्रार्थना वाचून दाखविली. त्यामुळे पालकांच्या संतापात भरच पडली.

भाजपने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आमदार ठाकूरांपासून ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या दिवशी शाळेला अद्दल घडवायची असा पवित्रा घेतला होता. मात्र सायंकाळ झाली तरी शाळेने या प्रार्थनेबाबत मौन सोडले नाही. पालकांच्या आंदोलनानंतर ही प्रार्थना काही दिवस सुरू करण्यात आली. मात्र पालकांच्या विरोधानंतर ही प्रार्थना बंद करण्यात आली, अशी माहिती विद्यालय व्यवस्थापनाने दिली.

यापूर्वीही अनेक मोठय़ा दुर्घटनांमुळे पनवेलमधील शाळांचा आणि तेथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात मृत्यू होणे, सहलीदरम्यान अपघाती मृत्यू, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, अशा अनेक प्रकारांमुळे पनवेलचे शिक्षणक्षेत्र अनेकदा ढवळून निघाले आहे. काही विद्यालय व्यवस्थापनांनी यावर अजब तोडगा काढला. पालकांनी घटनेनंतर विद्यालयावर आरोप करू नये म्हणून पालकांकडून मुलांचे हमीपत्र लिहून घेण्यात येऊ लागले. आम्ही आमच्या स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना आपल्या शाळेत पाठवीत आहोत. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला आम्हीच जबाबदार असू, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले. इंग्रजी शाळेत आपली मुले इतर मुलांच्या स्पर्धेत टिकावीत म्हणून पालकांनी या हमीपत्रावर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. आपल्या पाल्याने उत्तम इंग्रजी बोलावे, त्याचे राहणीमान सुधारावे, अशी भोळी स्वप्ने बाळगून मुलांना बडय़ा शाळांत पाठवणारे पालक यामुळे निराशेच्या गर्तेत अडकत आहेत. पाल्य सुरक्षित राहील का, ही टांगती तलवार, न परवडणारे शुल्क भरण्याचा तणाव आणि स्पर्धेला तोंड देताना होणारी दमछाक यामुळे शालेय शिक्षण ही विद्यार्थी व पालक दोघांसाठीही शिक्षाच ठरू लागली आहे.

पनवेलच्या शाळांतील दुर्घटना

* कळंबोलीमधील सुधागड शाळेची सहलीला गेलेली मुले बुडाल्याच्या घटनेमुळे या विद्यालयाने त्यानंतर कधीच विद्यार्थ्यांसाठी सहली काढल्या नाहीत. सीकेटी विद्यालयाची धावती बस पेटल्यामुळे व मुलांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर किमान विद्यार्थी वाहतुकीचे नियम कठोर करा यावर चर्चा झाली व त्याची काही अंशी अंमलबजावणी झाली.

* कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयात चौथीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्काराच्या घटनेने कळंबोलीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर शाळेत मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नावर चर्चा झाली. काही वर्षांनी याच विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला त्याच्या पालकांनी शाळेत सोडल्यानंतर तो चौथ्या मजल्यावरून पडला होता. या घटनेने पुन्हा शाळेत प्रवेश केल्यावर मुलांची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची की पालकांची असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. माध्यमांनी दखल घेतल्यामुळे राज्यभर पुन्हा शाळेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

* खांदेश्वर वसाहतीमधील न्यू होरायझन विद्यालयातील प्राथमिक शिक्षण घेणारा मुलगा खिडकीतून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा पनवेलच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधले गेले.

* कळंबोली येथील सुधागड विद्यालयातील अकरावीचा प्रवेश न झाल्यामुळे एका मुलीने केलेल्या आत्महत्येमुळे सुधागडच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने जामीनही दिला. मात्र या सर्व घटनांमुळे पनवेलमधील खासगी शाळांमधील पाल्यांची जबाबदारी नेमकी शाळांनी किती व कशी घ्यायची असा सूर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आळविला.