मुंबई विद्यापीठाच्या २०१५ पदवी तसेच पदव्युत्तर परीक्षांत उरणमधील खोपटे येथील सतेजा ठाकूर हिने एमएच्या परीक्षेत अर्थशास्त्र विषयात तर बीए परीक्षेत प्रियांका माळी हिने मराठी विषयात सुवर्णपदक पटकावले आहे. उरणच्या या सुकन्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या दोन्ही कन्यांनी हे यश संपादित केले आहे. या दोघींनीही प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समजातील वंचितांना न्याय देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उरण तालुक्यातील खोपटे गावातील बांधपाडा गावातील देवळातील तसेच सार्वजनिक पूजा करण्याचे काम करणाऱ्या सतेजा ठाकूरच्या वडिलांची परिस्थिती बेताचीच आहे. मात्र, सतेजाने दहावीमध्ये ७६ तर बारावीला ७९ टक्के गुण मिळवीत मराठी विषयात मुंबई मंडळात पहिली येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर महाविद्यालयात तिने अर्थशास्त्राची निवड केली. बीए उत्तीर्ण झाल्यानंतर तिने पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयात एमएसाठी प्रवेश घेतला होता. २०१५ ला झालेल्या एमएच्या परीक्षेत सतेजाने ७४.८१ टक्के गुणांसह सुवर्णपदक मिळविले असल्याचे पत्र मुंबई विद्यापीठाकडून तिला मिळाले. आपण राज्य सेवा आयोगाची परीक्षा देणार असून उपजिल्हाधिकारी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन तिला पीएच.डी.ही करायची आहे.
उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चिर्ले गावातील प्रियांका नामदेव माळी या विद्यार्थिनीने २०१५ च्या बीए परीक्षेत मराठी विषयात ७१ गुण मिळवले. त्यामुळे प्रियांकालाही मुंबई विद्यापीठाकडून सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेणाऱ्या प्रियांकाला १० मध्ये ७५ तर बारावीत ७० टक्के गुण मिळालेले होते. नोकरीसाठी तिने डीएडही पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. प्रियांकालाही प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची इच्छा आहे.