संशयित दहशतवाद्यांचा अद्याप मागमूस नाही

पाच संशयित दहशतवाद्यांनी उरणमध्ये घुसखोरी केल्याच्या घटनेला ३६ तास उलटून गेल्यानंतरही संशयितांचा ठावठिकाणा लागू शकला नाही. नौदलासह पोलीस व एनएसजीच्या कमांडोंनी या संशयितांच्या शोधासाठी उरणचा परिसर पिंजून काढला. मात्र, संशयितांचा मागमूस लागू शकला नाही. अखेरीस नौदलाने शोधमोहीम थांबवत असल्याचे जाहीर केले. शोधमोहीम थांबवण्यात आली असली तरी अतिदक्षता बाळगण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

दोन शाळकरी विद्यार्थ्यांना उरण परिसरात पाच जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा होता व ते हल्ला करण्यासंदर्भात बोलत होते, असे या विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. उरीतील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्वच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क होत, या पाचही संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. गुरुवारपासून या संशयितांचा शोध सुरू होता. शुक्रवारी पोलीस व एनएसजी कमांडोंनी उरण परिसरातील शाळा, महाविद्यालये, बंद घरे, सागरकिनारे, किनारी परिसर पिंजून काढला. मात्र, कोणताही मागमूस लागला नाही. नौदलाने शुक्रवारी शोधमोहीम थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु असे असले तरी स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासन यांच्याशी संशयितांच्या शोधासंदर्भात समन्वय राखला जाणार असल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत.

शिवडीत दहशतवादी घुसल्याची अफवा

शिवडी आगारानजीकच्या आशीर्वाद या इमारतीत दहशतवादी घुसले असल्याची खबर पोलिसांना शुक्रवारी मिळाली. पोलीस व एनएसजी कमांडोंनी या इमारतीला वेढा घालत  प्रत्येक घराची  झडती घेतली व परिसरही पिंजून काढला. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही.

उरणच्या सागरी किनाऱ्यावर दहशतवादी दिसल्याच्या माहितीनंतर देश व राज्याच्या सर्व यंत्रणांनी सर्व शक्यतांचा विचार करून शोधमोहीम हाती घेतली. परंतु दहशतवाद्यांच्या माहितीबाबत अद्याप पुष्टी मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री