अतिवृष्टी झाल्यास उरण जलमय होण्याची, परिसरात दरडी कोसळण्याची किंवा अन्य अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन उरण तहसील कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जाहीर केला आहे. तालुक्यातील पुनाडे, चिरनेर व कडाप्पे अशा तीन गावांना दरडींचा धोका असल्याचे सांगितले जाते.

आपत्तींना तोंड देण्यासाठी तहसील कार्यालयात २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाशी जनतेने तातडीने संपर्क साधून आपत्तीची माहिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले आहे. संबंधित अधिकारी व प्रशासनाच्या मुख्य विभागांशी संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

रायगड जिल्हा भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुनाडे, चिरनेर व कडापे या तीन गावांना कमी-जास्त प्रमाणात दरडींचा धोका आहे. त्यामुळे ही तीन गावे दरडग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांची लोकसंख्या ६ हजार ६९६ असून दरडी कोसळल्यास आपत्तीग्रस्तांची संख्या हजाराच्या घरात जाऊ शकते, असे सांगितले जाते.

खाडीकिनारी असलेल्या पाच गावांना चक्रीवादळ व त्सुनामीचा धोका आहे. तिथे २३ हजार लोक राहतात. साथीच्या रोगांनी पाच गावे बाधित होण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली आहे. यामध्ये १० हजार ७२६ नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. तालुक्यात दोन हेलिपॅड्ससाठी उपविभागीय व जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उरण तालुक्यात सरासरी पर्जन्यमान हे २ हजार ९८३ इतके आहे. त्यामुळे उरणमध्ये पुराची शक्यता आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्याची माहिती उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली आहे. तसेच उरणच्या २७२२२३५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.