आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाशी ‘आमदार आपल्या दारी’ ची स्पर्धा

नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी गेले आठ महिने राबवलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला मुंढे यांच्याशी फारसे सख्य नसलेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही उपक्रमांमुळे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई पालिकेचा २ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा जनतेच्या समस्या सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला. तो काही शनिवारचा अपवाद वगळता सातत्याने सुरू आहे. मुंढे यांचा दरारा पाहता नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल अधिकारी तात्काळ घेतात आणि त्या सोडवतात.

काही अधिकारी तर ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाच्या आदल्या दिवशीच त्या भागात जाऊन तेथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. याचा थेट फायदा नागरिकांना होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी करावे, दारावे, नेरुळ, सानपाडा येथून ‘आमदार आपल्या दारी’ या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने त्यांनी सुचविलेल्या कामांची दखल पालिकेचे अधिकारी घेतात. काही समस्याप्रधान भागांचा त्या कार्यकर्त्यांसह दौरादेखील करतात.

शहरात नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम सर्वप्रथम माजी मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारमधून सुरू केला होता. मुंढे यांच्या आगमनापासून विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या मंदा म्हात्रे यांनी मुंढे यांना नागरी कामे करून उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंढे यांच्यावरील अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा सबुरीने घेण्याचा सल्ला म्हात्रे यांना दिला होता. त्यामुळे भाजपचे नगरसेवक तटस्थ राहिले होते. मात्र आमदार आयुक्तांच्या चढाओढीत नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत.