वाहतुकीच्या योग्य नियोजनामुळे कोंडी टळली

वाशी पुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सुरू झाले. या पुलाला काही दिवसांपूर्वी (वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या भागात) तडे गेले होते. हे काम करताना वाहतूक विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीत फार मोठा अडथळा आला नाही.

पुलाला तडे गेल्यामुळे अवजड वाहनांना या मार्गावरून ये-जा करण्यास बंदी करण्यात आली होती व एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. सकाळी १० ते ४ या वेळेत दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. म्हणून सकाळपासून वाहतूक पोलीस सज्ज होते. त्यातच महाशिवरात्रीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. एका मार्गिकेवरून वाहतूक सुरळीत सुरू होती. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते. सानपाडा पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असत्या, तर ऐरोली मार्गे वाहतूक वळवण्यात येणार होती. पण वाहतुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली, त्यामुळे मार्ग बदलण्याची गरज निर्माण झाली नाही, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी दिली.