पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणावर आवक; किरकोळ विक्रेत्यांकडे ग्राहकांचे लक्ष
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या काही भाज्यांच्या उत्पादनामुळे नवी मुंबईतील घाऊक बाजारात भाज्यांची मागील दोन दिवसांत मोसमातील सर्वाधिक आवक झाली असून सात प्रमुख भाज्यांचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे गोकुळाष्टमीनंतर पुढील दोन महिने स्वस्त भाज्या मिळणार आहेत. यात किरकोळ भाजी विक्रेते घाऊक बाजारात मिळणाऱ्या भाज्या किती स्वस्त विकतात ह्य़ावर ही स्वस्ताई अवलंबून आहे.

tv03सरकारने डाळीचे दर आवाक्यात ठेवण्यासाठी डाळी शिधावाटप दुकानावर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याच वेळी भाजी बाजारातही स्वस्ताई सुरू झाली आहे. सणासुदीच्या ऐन काळात भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दर घटले आहेत. तुर्भे येथील एपीएमसीच्या भाजी घाऊक बाजारात मंगळवारी ६५० ट्रक टेम्पो भरून भाजी आल्याची नोंद असून सोमवारी ही आवक ७८५ ट्रक टेम्पो आहे. ह्य़ा मोसमातील ही सर्वाधिक भाजी आवक असून याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला आहे.
त्यामुळे पुढील महिन्यात पहिल्या आठवडय़ात येणारे गणेशोत्सव व पुढील त्यानंतरचे नवरोत्रोत्सव काळात स्वस्त भाजी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे भाज्यांचे चांगले उत्पादन झाले असून त्याची आवक आता सुरू झाली आहे. भाज्यांची विविध प्रकारांत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कोबी, प्लॉवर, टोमॅटो, दोडका, भेंडी, गवार आणि वाटाणा ह्य़ा भाज्या घाऊक बाजारात स्वस्त झालेल्या आहेत.
यातील भेंडी व टोमॅटो वगळता सर्व भाज्या दहा रुपयांच्या खालील किमतीत विकल्या जात आहेत. कर्नाटकमधील काही भागांतून येणाऱ्या वाटाण्याला सातारा येथून येणाऱ्या वाटाण्याने स्पर्धा निर्माण केल्याने वाटाण्याचे भाव ४० ते ४४ रुपये प्रति किलो खाली आले आहेत. महाराष्ट्रातील काही भाज्या परराज्यात जात असल्याने त्यांचे दर काही चढे राहात होते, पण देशात चांगला पाऊस पडल्याने सर्व राज्यात भाज्यांचे चांगले उत्पादन झाले आहे.
त्यामुळे राज्यातील निर्यात थंडावली असून राज्यातील भाजी राज्यात विकली जात असल्याने स्वस्ताई होण्यामागे हे एक कारण आहे.

आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झालेल्या आहेत. सोमवारी भाजी बाजारात आलेली भाजी या मोसमातील सर्वाधिक भाजी आहे. सणासुदीच्या या काळात काही प्रमुख भाज्या स्वस्त झाल्याने नागरीकांना दिलासा मिळणार आहे. ह्य़ा पेक्षा स्वस्त भाजी झाल्यास ती शेतकरी व व्यापाऱ्यांनाही परवडणारी नाही
शंकर पिंगळे, व्यापारी, भाजी व्यापारी, एपीएमसी