पावसामुळे मागणीत घट; भावात २०-३० टक्के घसरण

गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे घाऊक बाजारात भाज्यांना उठाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर घसरले आहेत. मंगळवारी हे दर २० ते ३० टक्क्यांनी घसरले. किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे दर चढेच आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर घाऊक बाजारातही दर पूर्ववत होतील, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे भाज्यांच्या भावात अचानक वाढ झाली होती. मंगळवारी मात्र नेमके उलट चित्र निर्माण झाले. मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए क्षेत्राला भाजीपुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसीत ५६५ ट्रक भरून भाज्या आल्या. यात कर्नाटकमधून आलेल्या वाटाण्याच्या ट्रकची संख्या जास्त होती. घाऊक बाजारात भाज्यांच्या वाहनांची संख्या वाढली तरी किरकोळ विक्रेत्यांची संख्या कमी झाली. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी मंगळवारी घाऊक बाजाराकडे पाठ फिरवली. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला. घाऊक बाजारात भाज्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी घसरल्याचे भाजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलाश तांजणे यांनी सांगितले.

मुंबईतील पदपथावर बसून भाज्या विकणारे घाऊक बाजारातील प्रमुख खरेदीदार मानले जातात; मात्र मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर हे विक्रेते घाऊक बाजारातील खरेदीकडे पाठ फिरवतात, असा अनुभव आहे. त्यामुळे मंगळवारी घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली असताना या भाज्या किरकोळ बाजारात ती पोहोचू न शकल्याने शिल्लक भाजी चढय़ा दराने विकण्यात आली. वाटाण्याने शंभरी गाठली.

टोमॅटोच्या किमतीत काहीच फरक पडला नाही. भेंडी, कोबी, प्लॉवर या नियमित विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर घाऊक बाजारात २०-३० टक्क्यांनी कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात ते वाढलेले आहेत.

टोमॅटो पाठोपाठ वाटाण्याचीही शंभरी

टोमॅटो घाऊक बाजारात ८० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १०० रुपयांनी विकला जात आहे. राज्यातील टोमॅटो भाव खात आहेत. कर्नाटक व हिमाचलमधून वाटाणा कमी प्रमाणात आला. त्यामुळे त्याने शंभरी पार केली. किरकोळ बाजारात वाटाणा १२० ते १४० रुपये किलोने विकला जात आहे.