उद्योजक : सुधाकर सोनावणे

अहमदनगर जिल्ह्य़ातील प्रवरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिका आणि संघर्ष करा या तत्त्वावर कौशल्य शिक्षण घेतलेला एक तरुण नवी मुंबईत पोटापाण्यासाठी येतो आणि कष्ट, चिकाटी स्वकर्तृत्वाच्या बळावर ३० वर्षांत वाहनांची बॉडी बनविण्याचे दोन कारखाने उभारतो. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची बॉडी देशातील एक अग्रगण्य कंपनी हायवा बनवीत असली तरी त्यामागच्या अनेक हातांपैकी एक हात रबाळे व महापे येथील गौरा फॅब्रिकेशनचा आहे. केवळ कचरा वाहून नेणाऱ्याच नाही, तर डम्पर, कॉम्पॅक्टर, क्रेन या वाहनांचेही सुटे भाग ही कंपनी बनविते.

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे या कंपनीचे संस्थापक आहेत. अठरा विसे दारिद्रय़ असलेल्या कुटुंबात सोनावणे यांचा जन्म झाला. प्रवराच्या रयत शिक्षण शाळेत जुजबी कौशल्यशिक्षण घेतल्यानंतर सोनावणे यांनी रोजगारासाठी काही नातेवाईकांच्या ओळखीने नवी मुंबईची वाट धरली. त्या वेळी नवी मुंबईचा आता आहे तसा विकास झालेला नव्हता. साठच्या दशकात केवळ औद्योगिक नगरी म्हणून उदयाला येणाऱ्या नवी मुंबईतील हिंदुस्थान ऑरगॅनिक कंपनीत १९७९ मध्ये सोनावणे यांनी हेल्पर म्हणून पहिली नोकरी स्वीकारली. कौशल्य शिक्षणात पहिल्यापासून रस असलेल्या सोनावणे यांनी फॅब्रिकेशनचे बारकावे शिकून घेतले. त्यात पारंगत व्हावे यासाठी न्यू इंजिनीअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनीकडून भोपाळ, राजस्थानमध्ये जाऊन तेथील कामे यशस्वी पूर्ण केली. वाहनांची बॉडी तयार करण्यात हातखंडा निर्माण झाल्यानंतर ११ वर्षांनी विक्रम प्रोजेक्ट कंपनीत कामगार कंत्राटदार घेण्यास सुरुवात केली. उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोनावणे यांची डाळ या औद्योगिक नगरीत न शिजल्याने अखेर त्यांनी सत्तरच्या दशकात गावी परतण्याचा निर्णय घेतला, मात्र उद्योग करण्याची खुमखुमी त्यांना स्वस्थ बसू देईना. अखरे ते पुन्हा नवी मुंबईत आले. विक्रम प्रोजेक्टमध्ये काम करताना दोन पैसे हाताशी आल्यानंतर सोनावणे यांनी गौरा फॅब्रिकेशन ही स्वत:ची एक छोटी कंपनी सुरू केली.

नव्वदच्या दशकात हायवासारख्या बडय़ा कंपनीचे नवी मुंबईत आगमन झाले. हायवा ही जगातील मर्सिडीज, वोल्वो या कंपन्यांचे सुटे भाग बनवून देणारी कंपनी आहे. देशात त्यांना टाटा, अशोक लेलॅण्ड, मान, आयशर यांसारख्या वाहन बनविणाऱ्या कंपन्यांची कामे मिळाल्याने त्यांनी भारतात बंगळुरू, मध्य प्रदेश आणि नवी मुंबईत उद्योग सुरू केले आहेत. या बडय़ा कंपन्या सर्व कामे स्वत: करत नाहीत. त्यांच्या पसंती आणि डिझाइननुसार काम करून देऊ शकणाऱ्या लघुउद्योजकांकडून ही कंपनी कमी पैशांत काम करून घेते. सोनावणे यांच्या गौरा फॅब्रिकेशनचा यात क्रमांक लागला. त्यामुळे सोनावणे यांनी रबाळे येथे एक छोटा कारखाना भाडय़ाने घेऊन आपला स्वत:चा उद्योग सुरू केला.

याच काळात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सर्व पालिकांना घनकचरा व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. त्यामुळे वाहन बनविणाऱ्या कंपन्यांनी कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली. वाहनाच्या चेसीज आणि इंजिन वगळता वरील सर्व बॉडी बनविण्याचे काम हायवासारखी कंपनी करत होती आणि गौरा फॅब्रिकेशन हायवाला ही कामे करून देऊ लागली. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या देशातील सर्व पालिकांना पुरविण्यात आलेल्या बहुतांशी गाडय़ांची चेसिजवरील बॉडी ही गौराची आहे.  सोनावणे यांच्या दोन मुलांनी आता व्यवसायाची धुरा सांभाळली आहे. त्यासाठी त्यांनी मुरबाड येथे स्वत:च्या मालकीच्या जागेत कारखाना सुरू केला आहे.

पाच ते सहा कामगारांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या गौराची घोडदौड आजही सुरूच आहे. आजच्या घडीला २५० ते ३०० कामगार येथे काम करत आहेत. सुरुवातीला अवघ्या काही हजारांत असलेली कारखान्याची आर्थिक उलाढाल आज ११ कोटींच्या घरात गेली आहे. वाहन बांधणीमध्ये आता अनेक नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना समोरे जात हा उद्योग देशात वाढविण्याचा मानस सोनावणे यांनी व्यक्त केला.

कचरागाडय़ा झाल्या सोयीस्कर

काही वर्षांपूर्वी या कचरा वाहतूक गाडय़ांतील कचरा रिता करताना कचरा भरलेला भाग हा वाहनाच्या मध्यभागातून उचलावा लागत असे. त्यानंतर यावर संशोधन करून या गाडय़ा रिकाम्या करण्यासाठी वाहनाच्या एका बाजूचा (मागील) वापर केला जाऊ लागला. यात गौरा फॅब्रिकेशनची भूमिका महत्त्वाची ठरली. मुंबई-पुणे द्रुतग्रती महामार्गाच्या कामात वापरण्यात आलेल्या रेडी मिक्स वाहनांसाठीही हीच पद्धत सर्वप्रथम वापरली गेली आहे.

हायवाकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सोनावणे यांनी नंतर पावणे येथे दुसरा कारखाना सुरू केला.