आंदोलन हा शेकापचा पाया होता. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा विस्तारीवरील मर्यादानंतर पसारा नवी मुंबईच्या निर्मितीच्या विचाराने वाशी खाडीलगत पसरलेल्या सानपाडा, नेरुळ, बेलापूर, पनवेल आणि उरणजवळील शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अनेक शेतजमिनींवर हे शहर उभे राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर जमीन संपादनाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन उभारले. मात्र पनवेल महानगरपालिका निवडणूकांमध्ये शेतकऱ्याला आधार वाटणाऱ्या या पक्षाचा पायाच ढासळल्याने कळंबोलीवगळता नवीन पनवेल, खारघर, कामोठे येथील मतदारांनी या पक्षाला साफ नाकारले आहे.

१९७० ते १९८५ या काळात प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलने उभारली. अनेकांच्या पाठीत, पोटात, पायांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न १९८० साली केला. त्यानंतर पुन्हा आंदोलनाला धार आल्यामुळे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोळीबारात १९८४ साली पाच हुतात्मे गेल्यावर येथील शेतकऱ्यांना त्यांचे काही हक्क पदरात पडले. काळ ओसरला. प्रकल्पग्रस्तांची तिसरी पिढी त्या लढय़ाचे यश चाखताना प्रत्यक्षात दिसत आहे. चांगले शिक्षण, आलिशान गाडय़ा, राहण्यासाठी बंगले ही राहणीमानाची सुबत्ता शेतकऱ्यांच्या त्याच लढय़ाने आजच्या पिढीला मिळवून दिली. कालांतराने प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेक प्रतिनिधी कंत्राटदार झाले. याच प्रतिनिधींनी वेगवेगळ्या चुली मांडल्या. नेते, कार्यकर्त्यांनी आपापल्या इच्छेनुसार व सोयीनुसार स्वत:ची राजकीय दिशा ठरविली. ज्यांनी भवितव्यासाठी रक्त सांडले त्यांची नावे देखील सध्याच्या पिढीला ठाऊक नसतील अशी आजची स्थिती आहे. मात्र या सर्व जागतिकीकरणाच्या ओघात अखिल भारतीय शेकापची ओळख पुसली. सध्या याच राजकीय पक्षाला शेकाप याच नावाने पनवेल व उरणपुरते ओळखतात. चार दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या निकालात या पक्षाचा धुंवाधार पराभव झाला आणि सध्याच्या मोदी व ठाकूर लाटेत पनवेलचा शेकापक्ष येथून हद्दपार होईल का अशी भीती या पक्षामधील सामान्य कार्यकर्त्यांला वाटत आहे. पक्षाच्या नावातील शेतकऱ्यांची संख्या पनवेलमधून कमी झाल्यामुळे येथील वाढत्या शहरी नागरिकाने त्याला का रामराम केला याबाबतचे उत्तर सध्या नामशेष होणाऱ्या शेकापक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडे नाही.

देशातील कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर डाव्या विचारांवर तग धरून स्थापन झालेला देशातील दुसरा राजकीय पक्ष म्हणजे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा आहे. १९२० साली देशात या पक्षाने मुळे रुजवली. कामगार हा शब्दनिर्मितीच्या वेळी असला तरी पक्षाने १९५० पर्यंत कामगारांसाठी विशेष काही केले याचे दाखले मिळाले नाही; मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रक्त सांडणारा, पेटलेली आंदोलने करणारा आणि वेळीच पोलिसांवर दगडफेक करून आंदोलने करणारा अशा या पक्षाची ओळख होती. उरण येथील जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट)सारख्या लढय़ात खंबीर भूमिका घेऊन हौतात्म्य पत्करणाऱ्यांपैकी पाच जण याच पक्षाचे शिलेदार असल्याचे आजही या पक्षाचे नेते छातीठोकपणे सांगतात. पनवेल व उरणला आंदोलनाचा इतिहास करून देणारे राजकीय नेते याच शेकापचे दाखले देऊन प्रशासनाला वेळीच नरम करतात. काळ संपला आणि शेतकऱ्याच्या तिसऱ्या पिढीचे भवितव्य ऑडी व मर्सिडीस कापर्यंत आले. त्यामुळे या पक्षाची कोणालाही गरज वाटत नाही. शेकाप म्हणजे विकासाला विरोध, शेतकऱ्यांचा पक्ष, शहरी नागरिकांच्या विरोधातील वृत्ती याच नामांकरणामुळे हा पक्ष शहरी नागरिकांना आपलासा वाटला नाही. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शहरी मतदारांनी या पक्षाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे दाखवत या पक्षाला अखेरची माती देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय यांच्या हातांमधून होणाऱ्या विकासाला आपली मते दिल्याने शेकाप पनवेलमध्ये भुईसपाट झाला.

भाजपने मतदानापूर्वीचे सर्वेक्षण करून नागरिकांची मने जाणून घेतली होती. त्यामुळे शेकापला गाठण्यासाठी राजकीय आखणी रचण्यात आली. घर मोडण्यासाठी त्या घराच्या मधला वासा कोसळवला, की आपोआप ते घर गडगडते, याच पद्धतीने ही राजकीय खेळी करण्यात आली. महापालिका निवडणुकीचे निमित्त साधत पनवेलमधील गावागावांमध्ये ताठ छातीने उभा राहिलेला शेतकरी कामगार पक्षाचे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने म्हणजेच रामशेठ ठाकूर पितापुत्रांनी पुरते पानिपत करून दाखवले. भाजपच्या ७८ पैकी ५१ जागांवर निर्विवाद सत्ता आल्यामुळे पुढील पाच वर्षांच्या काळात शेकाप पनवेलमधून नामशेष होणार हे आता दृष्टिक्षेपात आले आहे. शेकापच्या नाकाखालच्या ग्रामपंचायतींचे महापालिकेत समावेश करून शेकाप महापालिकेच्या दावणीला बांधली. एकीकडे गावांची शहरे झाली तर शहरांच्या मधोमध गावाची घुसमट झाली. त्यानंतर गावकऱ्यांचे प्रतिनिधी आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी कंत्राटदार, ठेकेदार व जमिनीच्या खरेदीविक्रीचे दलाल झाले. स्वत:चे आर्थिक स्थैर्य टिकविण्यासाठी शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाच्या उगवत्या सूर्याला नमस्कार करत भाजपचे कमळ हाती धरले. याचाच फटका शेकापला जोरदार बसला आणि निखाऱ्यावर चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा आकडा शेकापमध्ये कमी झाला. कालपर्यंत माझा शेकाप म्हणणारे कार्यकर्ते आता मोदींच्या विकासवाटेवर स्थिर होऊन ते शेकाप कधी भुईसपाट होतोय याच्या प्रतीक्षेत आहेत. ठाकूरांना हरविण्यासाठी एकेकाळचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्व राजकीय पक्षांची मोट शेकापने बांधली. मात्र राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या एकत्रीकरणाच्या कसरतीमध्ये पक्षाने स्वत:चे अस्तित्व जपण्यासाठी वेगळे काही पनवेलमध्ये करू शकले नाही हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झाले. शेकापची धुरा नव्या शहरी नागरिकांच्या हाती दिली नाही. तसेच घाटमाथ्यावरील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ातील नागरिकांना शहरांमध्ये प्रतिनिधित्व दिले नाही. याउलट ठाकूर पितापुत्रांनी भाजपमध्ये आजही मिश्रा, गुप्ता, शर्मा, शेट्टी यांसारख्या आडनावांना जे दिल्ली व इतर प्रांतांमधून खारघर व नवीन पनवेलमध्ये आलेत त्यांना दिखाव्यापुरती का होईना, पदाधिकारी बनवले. तीन आसनी रिक्षाचालक पनवेल व परिसरात शहरी नागरिकांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. अशा शहरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी शेकापने नेहमी प्रकल्पग्रस्तांची पाठराखण केली. यामुळे शहरी नागरिकांना ठाकूर कुटुंबीय आणि भाजप हा दुसरा पर्याय आपलासा वाटू लागला. प्रकल्पग्रस्तांसाठी झटणाऱ्या शेकापक्षाच्या प्रमुखांनी प्रकल्पग्रस्तांनाच शहराचे पदाधिकारी नेमले, त्यांच्याच हाती सत्ता दिली. मात्र याची मोठी शिक्षा महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला मिळाली. ज्या प्रकल्पग्रस्तांसाठी शेकापच्या पुढाऱ्यांनी हा सर्व खेळखंडोबा केला तोच प्रकल्पग्रस्तांचा तरुणांमधील मोठा गट भाजपकडे ओढला गेला. नामशेष झालेल्या शेकापला संजीवनी देण्यासाठी शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील नवी कोणती खेळी करतील याकडे शेकापच्या उरलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच पनवेलमध्ये अच्छे दिन येणार आहेत. याचे भाकीत स्वत: मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या मतदारांसमोर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी, घरांचा वाढीव बांधकामांचा प्रश्न, सुसज्ज रस्ते असे सर्व प्रश्न ठाकूर कुटुंबीय आणि भाजप पनवेलमध्ये सोडवणार आहेत. २०१९ साली पनवेलमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले उड्डाण झाल्यानंतर, नैना प्रकल्प, खारघर ते तळोजा मेट्रो धावू लागेपर्यंत पालिकेची दुसरी निवडणूक जाहीर झाली असेल. शेकापने आपली धोरणे वेळीच न बदलल्यास त्यावेळच्या निवडणुकीत शेकापक्षाला विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसण्याचीही संधी भाजप देणार नाही अशीच सध्याची हवा पनवेलमध्ये आहे.