वाशीत आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’च्या उपक्रमात आयुक्तांचे स्पष्टीकरण

सार्वजनिक ठिकाणी कचरा केला नाही तर शहरे आपोआप स्वच्छ राहतील व त्यामुळे कचरा संकलन आणि वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन हा निधी नागरी सुविधांसाठी अधिक प्रमाणात वापरता येईल, असे मत नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात पार पडलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमावेळी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी महानगरपालिका सर्वतोपरीने आपले कर्तव्य पार पाडत असून नागरिकांनीही नागरी सुविधांचा वापर करताना आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.

ओला आणि सुका कचऱ्याचे घरापासून ते महानगरपालिकेच्या कचरा गाडय़ांपर्यंत योग्य वर्गीकरण होण्याची गरज आयुक्त मुंढे यांनी व्यक्त केली. प्लॅस्टिक हे मानवाला व पर्यावरणाला घातक असून नागरिकांनी दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकला प्रतिबंध करावा, अगदी दैनंदिन खरेदीसाठीदेखील प्लॅस्टिक बॅग न वापरता कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे मत त्यांनी मांडले. या वेळी त्यांनी शहरातील विविध मुद्दय़ांवर नागरिकांशी संवाद साधला. त्यात अनेक ठिकाणी इमारतींना गळती असल्याचे कारण सांगून बेकायदेशीररीत्या छप्पर टाकताना त्याचा होणारा वाणिज्य वापर यावर त्यांनी भाष्य केले. या इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून गळती रोखण्यासाठी छतावर पत्रे टाकणे हा पर्याय नसून त्यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय याबाबत पालिकेच्या वतीने संबंधित सोसायटय़ांना तथा इमारत मालकांना पावसाळ्यापूर्वी योग्य उपाययोजना करण्याचे किंवा छतावरील पत्र्याचे छप्पर स्वत:हून काढून टाकावे, असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छतांवरील छपरांचा वाणिज्य वापरावर लवकरच कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला.

या वेळी शहरातील पार्किंगच्या समस्येवर बोलताना पालिकेच्या वतीने  नो-पार्किंग झोन, वन वे पार्किंग, पे अँड पार्किंग असे विविध उपाय आयोजले असून नागरिकांनीही आपल्या गाडय़ा सोसायटीच्या आवारात आपल्या मालकीच्या जागेत पार्क कराव्यात, असे आवाहन मुंढे यांनी या वेळी केले. शिवाय नवे बस मार्ग सुरू करून प्रवासी वाहतूकीबरोबर पदपथ चालण्यायोग्य असावे, याकडे पालिकेचे अधिक लक्ष  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईकरांना आयुक्तांचे आवाहन

मोरबे धरणात पुरेसा पाणीसाठा असून नवी मुंबईकरांना पाण्याची कोणत्याही प्रकारे अडचण भासणार नसल्याचे आश्वासन तुकाराम मुंढे यांनी दिले. मात्र नागरिकांनीदेखील मुबलक पाणी असले म्हणून त्याचा गैरवापर किंवा अतिरिक्त वापर करणे टाळावे असे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. याचबरोबर फेरीवालेमुक्त रस्ते, पदपथ ही महानगरपालिकेची भूमिका असून त्याविरोधात सातत्याने मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनीदेखील पालिकेच्या या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक असून फेरीवाल्यांवर जर बहिष्कार टाकला गेला तर ते व्यवसाय करायला बसणारच नाहीत, असे देखील मुंढे यांनी स्पष्ट केले.