दोन धरणांची पातळी वाढविण्याची गरज
पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांबाबत उदासीनता
उरण तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(एमआयडीसी)चे रानसई व जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे पुनाडे अशी दोन धरणे असून या दोन्ही धरणांतील पाण्याचे नियोजन करून धरणांची पातळी वाढविल्यास उरण तालुक्याला बारमाही पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. मात्र गेली अनेक वर्ष या दोन्ही धरणांच्या पाण्याचे नियोजन न झाल्याने व धरणांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने उरण तालुक्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यात सुधारणा झाल्यास दोन्ही धरणांतून १५ ते २० दशलक्ष घनमीटर पाणी तालुक्याला उपलब्ध होऊ शकते.
उरण तालुक्यातील उरण शहर व त्यानजीक असलेल्या केगाव, नागाव, चाणजे परिसरात विहिरी व बोरचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या भागाला पाणीटंचाई होत नव्हती.मात्र शहरालगतच असलेल्या खारेपाट तसेच उरण पूर्व विभागातील गावांना पाणीटंचाई भासत होती. खारेपाटातील बारा गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १९२० साली ब्रिटिशांनी उरण शहरातील विहिरींतून नळ पाणीपुरवठा योजना लागू केली होती. या यशस्वी पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी १ लाख ३४ हजार रुपये खर्च केले होते. तर १९७०च्या दशकात रानसई येथे उरणमधील नौदलाच्या शस्त्रागाराला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने १० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असलेले रानसई धरण बांधले. उरण तालुका हा कोकणाचाच भाग असल्याने दर वर्षी २६०० ते २७०० मिलिमीटर पाऊस होतो. त्यामुळे रानसई धरण भरून दोन महिन्यांचे पाणी वाया जाते. या धरणातून उरण तालुक्यातील ओएनजीसी तसेच वायू विद्युत प्रकल्पासह तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जात आहे. तर शेतीसाठी बांधण्यात आलेल्या पुनाडे धरणाला बांधल्यानंतरच गळती लागल्याने धरण फुकट गेले होते. या धरणातील गळतीचे व धरणात साठलेले पाणी येथील आठ गावांना देण्यासाठी आठ गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. त्यामुळे या आठ गावांना पुनाडेमधून पाणी मिळते. असे असले तरी रानसईमधील ४० वर्षे गाळ न काढल्याने धरणाची पाणी साठवणूक क्षमता घटली आहे. तर पाऊस कमी झाल्याने गळतीने पुनाडय़ाचेही पाणी कमी झाले आहे. त्यामुळे दोन्ही धरणांतून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीने उरणमध्ये दोन दिवसांसाठी पाणीकपात सुरू केली आहे. उपाय- उरणमधील रानसई धरणाच्या गाळाचा सव्‍‌र्हे झाला असून धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे पडून आहे. त्याला मंजुरी मिळून धरणाची उंची वाढल्या धरणाच्या पाणी क्षमतेत दुपटीने वाढ होऊ शकते. तर पुनाडे धरणातील गळती थांबविण्यासाठी कठडा घालून, धरणाची पाणीक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. तालुक्यातील साठ टक्के भाग हा खारेपाट विभागाचा आहे.

शहर आणि गोडय़ा भागातील विहिरींची सफाई करून विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी करावा; तसेच बहुतांशी गावांत पूर्वजांनी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव खोदलेले आहेत. शहरीकरणामुळे या तलावांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या तलावांतील पाणी टिकवून ग्रामस्थांच्या गरजांसाठी त्याचा नियंत्रित वापर होऊ शकतो.