आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी निर्णय

गेले दोन महिने एक दिवसाआड येणाऱ्या पाण्यात दिवस काढणाऱ्या पनवेलवासियांना निवडणुकीच्या तोंडावर पाणीपुरवठय़ात वाढ करण्याचे गाजर दाखवण्यात आले आहे. आठवडय़ातून तीन दिवस काही तास पाणीपुरवठा करण्यात येईल आणि उर्वरित चार दिवस एकदिवसाआड पाणी येणार आहे. त्यामुळे सत्तेतील सरकार मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने जनहिताचे निर्णय घेत असल्याचा देखावा करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मंगळवार ते गुरुवार काही तास आणि त्यानंतरचे चार दिवस एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात का असेना पनवेलकरांची तहान मात्र भागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी अनेक पालिकांमधील विविध कामांचे ई-उद्घाटन केले. त्यात पनवेलच्या पाणी पुरवठय़ासाठी ५० कोटी रुपयांच्या विविध कामांचाही समावेश होता. २० एप्रिलला पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ एप्रिलला या ई-उदघाटन केलेल्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि या कामांसाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अधिक काळ पाणीपुरवठय़ाचा आणि जलवाहिन्या जोडणी व दुरुस्तीची ५० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

देहरंगमधील गाळ उपसण्याचे काम लांबणीवर

पनवेल शहरातील पाणीप्रश्न बिकट आहे. महापालिका स्थापनेच्या पहिल्या वर्षांत देहरंग धरणामधील गाळ काढण्याचे व धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रशासन करू शकले नाही. त्यामुळे पनवेलचे आमदार भारतीय जनता पक्षाचे असताना तसेच केंद्रात व राज्यातसुद्धा भाजपचे सरकार असतानाही, पनवेलकरांना एकदिवसाआड मिळत असल्यामुळे सत्तेचा काय फायदा, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे.