पनवेलमधील धबधब्यांवर येणाऱ्यांना पोलिसांची ताकीद

पनवेलमधील चार धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांवर शनिवार-रविवारी पोलिसांची नजर असणार आहे. खारघरमधील पांडवकडा, गाढेश्वर येथील गाढी नदीचा ओढा, शेडूंग फाटय़ापासून बेलवली गावाजवळील माची प्रबळ आणि वळवली गावाजवळी खदाणींतून निर्माण झालेला धबधबा असे हे चार धबधबे पर्यटकांत लोकप्रिय आहेत. धबधब्यांत भिजताना जीव गमावणाऱ्यांची आजवरची आकडेवारी पाहता, यंदा पाणी पाहा पण त्यात उतरू नका, असे बजावणारे पोलीस सर्वत्र दिसणार आहेत.

गाढी नदी

पनवेल बस आगारापासून सुमारे २० किलोमीटरवर असलेल्या वाजेगावाच्या पुढील गाढी नदीच्या ओढय़ावरही अशीच स्थिती आहे. इथे सेल्फी काढणाऱ्यांची आणि दगडावर बसून पाण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या आठवडय़ात इथे मुंबईच्या मामा भाच्याचा मृत्यू झाल्यानंतर येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मद्यपी तरूणांच्या घोळक्याने येथे नूकताच धिंगाणा केला. साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगूनही ही टोळकी न ऐकल्याने अखेर या सर्व मद्यपींना आवरता आवरता संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाची काच फुटली. अखेर या मद्यपी टोळक्याची आनंदयात्रा पोलीस कोठडीत पोहोचली. त्यामुळे सध्या हे ठिकाण पोलिसांच्या रडारवर आहे. येथे पर्यटकांनी पाण्याचा आनंद घेण्यास मज्जाव नाही. मात्र वाहत्या पाण्यात उतरण्यास पोलीस मज्जाव करतात. शनिवार व रविवारी येथे आठ तास पोलीस बंदोबस्त असतो. मात्र सोमवार ते शुक्रवार शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी पोलिसांना हुलकावणी देत येथे येतात.

वळवली

खांदेश्वर वसाहतीपासून काही अंतरावर असलेला  वळवली गावाजवळचा धबधबा हल्ली स्थानिकांत लोकप्रिय झाला आहे.  डोंगरातील खडक फोडण्यासाठी उभारलेल्या खदाणींमुळे हा नवीन धबधबा निर्माण झाला आहे. सध्या पनवेलच्या शहरी भागातील अनेकजण या सोयीच्या पर्यटनस्थळी जात आहेत.

पांडवकडा

मुंबई-पुणे महामार्गावर असणारा खारघर येथील पांडवकडा धबधबा सर्वाधिक पर्यटकप्रिय आहे. येथे पर्यटक बुडण्याचा घटना अलिकडे पोलीस व वन विभागाच्या गस्तीमुळे थांबल्या आहेत. पांडवांचा संचार असलेली ही भूमी असल्यामुळे हे पाणी अंगावर घेणारा पवित्र होतो, अशी अंधश्रद्धा होती. परंतु ती अफवा असल्याचे कालांतराने पर्यटकांनीच सिद्ध केले. आजवर या धबधब्यावर वर्षांला किमान ७ ते कमाल १२ व्यक्तींचे प्राण जात. याची गंभीर दखल घेत पांडवकडा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला, त्यानंतर येथे येऊन ओल्या पाटर्य़ा करणाऱ्यांची संख्या वाढली.

माची प्रबळ

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरचा माची प्रबळ हा धबधबा हिरवाईने नटलेला व तुलनेने शांतता असलेला आहे. परंतु अलिकडे मुंबईच्या पर्यटकांनी या धबधब्याचाही ‘पत्ता’ शोधून काढला आहे. त्यामुळे येथे शनिवार व रविवारी मोठी गर्दी असते. शेडूंग फाटय़ापासून चार किलोमीटर अंतरावर बेलवली व वारदोली गावातील ठाकूरवाडीजवळ हा धबधबा आहे. तासभर चालल्यानंतर  प्रबळगडावर पोहोचता येते; मात्र मार्गदर्शन करण्यासाठी इथे कोणीच नाही. अनेकजण सकाळच्या कोवळ्या उन्हात गड सर करण्याचा आनंद घेतात. मागील तीन-चार वर्षांपासून येथे गावकरी व मद्यपी पर्यटकांत खटके उडू लागले आहेत. त्यातील अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहेत. तालुका पोलीस ठाण्याची ही हद्द असल्याने येथे शनिवार व रविवारी मद्यपी पर्यटकांना हुसकावण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो.