आपण सगळ्यांनी लहानपणी निळ्या कोल्ह्याची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. तो कोल्हा निळ्या रंगाच्या हौदात पडतो आणि निळा होतो… अशी काहीशी ती गोष्ट होती. पण आम्ही तुम्हाला बातमी देतो आहोत ती आहे निळ्या कुत्र्यांची.. नवी मुंबईतल्या तळोजा भागात तुम्ही गेलात तर निळे कुत्रे भटकताना तुम्हाला नक्की दिसतील. नदी प्रदूषण किंवा कंपन्यांमधील प्रदूषण यांमुळे कुत्र्यांचा मूळ रंग बदलला आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार तळोजा या ठिकाणी असलेल्या कासाडी नदीमध्ये या भागातल्या अनेक रासायनिक कंपन्यांचं प्रक्रिया न केलेलं पाणी सोडण्यात येतं. या पाण्यामुळेच कुत्र्यांचा रंग निळा होतो आहे अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

कासाडी नदीजवळ काही कुत्रे खाण्याच्या शोधासाठी आले तेव्हा एक दोन दिवसांत त्यांचा रंग निळा झाला. कासाडी नदीत सोडण्यात आलेल्या प्रदुषित पाण्यामुळेच कुत्र्यांचा रंग बदलला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. तळोजा औद्योगिक भागात साधारण १ हजारच्या आसपास कंपन्या आहेत, ज्यांमध्ये रासायनिक कंपन्या, हवाबंद अन्नाच्या कंपन्या आणि इंजिनिअरींगशी संबंधित कंपन्यांचा समावेश आहे.

ज्या कंपन्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया चालते त्यातलं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जातं, याच कारणांमुळे कासाडी नदी प्रदुषित झाली आहे. या नदीच्या पाण्यात काही विषद्रव्यं आढळली आहेत असं नवी मुंबई महापालिकेनं केलेल्या प्रदूषण चाचणीनंतर म्हटलं आहे.

कासाडी नदीच्या पाण्यातील जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी एक लीटर पाण्यामागे ८० मिलिग्रॅमच्या वर गेली आहे. नदीच्या पाण्यातील हे प्रमाण माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी घातक आहे असंही प्रदूषण नियामक मंडळानं म्हटलं आहे. जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी एका लीटर मागे ६ मिलिग्रॅमच्या वर गेली तर मासे मरू लागतात, कासाडी नदीनं ही पातळी कधीच ओलांडली आहे.

कासाडी नदीच्या पाण्यामुळे आता या नदीच्या आसपास भटकणाऱ्या कुत्र्यांवरही होऊ लागला असण्याची शक्यता आहे. कासाडी नदीबाबत तक्रारी झाल्यानंतरही या नदीतून येणारी दुर्गंधी काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र पाण्यात असलेल्या विषद्रव्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही.

कुत्र्यांचा रंग बदलणं ही धक्कादायक बाब आहे अशी प्रतिक्रिया प्राणी मित्र चळवळ चालविणाऱ्या आरती चौहान यांनी दिली आहे. आम्ही तळोजा भागात निळ्या रंगाचे पाच कुत्रे पाहिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे, रंग बदलण्याची ही प्रक्रिया का होते आहे? कासाडी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न कधी सुटणार? नवी मुंबई महापालिका काय करते आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

काही कुत्रे कंपन्यांमध्ये अन्नाचा शोध घेत जातात आणि त्यांचा रंग बाहेर आल्यावर निळा झालेला असतो हेदेखील आम्ही पाहिलं आहे अशी माहिती प्रदूषण नियामक मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे यांनी म्हटलं आहे आणि याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. कंपन्यांच्या प्रदुषणांमुळे कुत्र्यांचा रंग निळा होतो आहे की कासाडी नदीच्या प्रदुषणामुळे याचं उत्तर अद्याप मिळायचं आहे मात्र याबाबत लवकरात लवकर पावलं उचलली जावीत असं प्राणी मित्र संघटना चालवणाऱ्या संस्थांनी म्हटलं आहे.