भारतातील एक अग्रगण्य रासायनिक कंपनी असलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीने स्वीडन, डच, सिंगापूर, चीन आणि कोरियन पाहुण्यांना एक दिवसीय कार्यशाळेत योगाभ्यास शिकवून अनोखी भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी वाशी येथील योग विद्या निकेतनच्या सभागृहात हे परदेशी पाहुणे योगाभ्यासाचा पाठ शिकणार आहेत. पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादास सावंत योगाचे धडे घेणार आहेत. या वेळी सहा देशी पाहुणेदेखील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून आज जगात साजरा केला जात आहे. भारतीय विद्येचा आविष्कार असलेला योग विद्या आजच्या घडीला जगातील कानाकोपऱ्यात शिकवली जात असून यासाठी काही मल्टिनॅशनल कंपन्या खास कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत. योगाभ्यासामुळे मानसिक व शारीरिक व्याधी दूर करण्यास मदत होत असून प्रसन्नता वाटत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक कारखाने तसेच शासकीय संस्था आता योगाला महत्त्व देत आहेत. नवी मुंबईतील एका प्रसिद्ध रासायनिक कारखान्यात आलेल्या परदेशी शिष्टमंडळाला भारतीय भेट काय द्यावी असा प्रश्न पडला आणि त्यातून योगाभ्यासाची कल्पना पुढे आल्याची माहिती योग विद्या निकेतनच्या संचालिका शकुंतला निंबाळकर यांनी सांगितले.