उत्तर इटालीतील मिलानो ऊर्फ मिलान शहर लोम्बार्डी प्रांताची आणि मिलानो परगण्याची राजधानी, इटालीतील प्रमुख औद्योगिक, व्यापारी आणि कला सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. इटालीच्या अर्थकारणाची सर्व सूत्रे मिलानकडेच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! खरे तर मिलान हीच संयुक्त इटालीची राजधानी असावयास हवी अशी अनेक इटालीवासीयांची धारणा आहे. मध्य युरोपातून इ.स.पूर्व ४००मध्ये लोम्बार्डी या प्रदेशात राहावयास आलेले इनसबर्स जमातीचे लोक हे मिलानचे पहिले आदिवासी. इ.स.पूर्व २२२मध्ये रोमन सम्राटाने या वस्तीवर अंमल बसवून वस्तीचे नाव मेडिओलेनम असे केले. पुढच्या काळात मेडिओलेनमचे महत्त्व वाढत जाऊन रोमन सम्राट डायोक्लेशन याने मूळ रोमन साम्राज्याची राजधानी मेडिओलेनम येथेच केली. २९३ साली येथे रोमन साम्राज्याची राजधानी झाल्यावर सम्राटाने तिथे किल्ला बांधला. किल्ल्याच्या जागी सध्या मिलानचे कॅथ्रेडल डोमो उभे आहे. पुढे डायोक्लेशन हा पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याचा अधिपती झाला तर मूळच्या, पश्चिमेकडच्या रोमन साम्राज्याच्या सम्राटपदी आला मॅक्झिमिआनस. या सम्राटाने मिलान शहरात रस्ते, राजवाडे आणि उत्तुंग प्रासाद बांधले, स्मारके आणि पुतळे उभे केले, थेर्मी हक्र्यूल हे भव्य स्टेडियम बांधले. ३१३ साली सम्राट कॉन्स्टन्टाईन आणि लिसिनियनी आपल्या दोन्ही रोमन साम्राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसाराला मोकळीक दिल्यावर धर्मातरे झाली. याच काळात मिलानचे प्रसिद्ध कॅथ्रेडल डोमो याच्या बांधकामास प्रारंभ झाला. बांधकाम पूर्ण होण्यास पाचशे वष्रे लागलेले हे चर्च भव्यतेमध्ये जगात चौथे मोठे चर्च होय. रोमन साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर मिलान आणि इटालीच्या अनेक प्रदेशांवर युरोपातील वन्य टोळ्यांचा प्रभाव वाढला. व्हिसगोथ, हून, अस्ट्रोगोथ्स आणि लाँगोबार्ड्स या जमातीच्या टोळ्यांनी पुढची तीन शतके मिलानचा ताबा आपल्याकडे ठेवला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – खाजण वनाचे पुनरुज्जीवन
वेगवेगळ्या कारणांमुळे खाजणवनांचा संहार मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यावर उपाय म्हणून पुनप्र्रस्थापनाचे प्रकल्प राबवले जातात. प्राण्यांच्या पिल्लांप्रमाणेच वनस्पतींची रोपटीही नाजूक असतात. खाऱ्या चिखल-पाण्यात तग धरण्याची त्यांची शाश्वती नसते. झाडांना उन्हाळ्यात फुले येतात. नवीन रोपटी पावसाळ्यात तयार होतात. नदीच्या प्रवाहातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे दलदलीचा खारेपणा कमी असतो. नाजूक रोपटी माफक खारेपणा सहन करू शकतात. तरीही वेगवेगळ्या वृक्षप्रकारांत नाजूक रोपटय़ांच्या रक्षणासाठी अनुकूलनाच्या निरनिराळ्या पद्धती दिसतात.
कांदळ झाडावर लोंबकळत असलेल्या शेंगा म्हणजे २५-३० सेंटिमीटर लांबीची रोपटी. पक्व झाल्यावर ही रोपटी फांदीवरून तुटून चिखलात पडतात. काही सरळ रुततात, तर काही आडवी पडली तरी मुळे वळून चिखलात रुततात आणि झाड वाढण्यास सुरुवात होते. उभ्या बुंध्यापासून जमिनीकडे वळलेल्या असंख्य फांद्या फुटतात. चिखलात पोहोचल्यावर ही मुळे झाड पक्केपणाने रोवतात. रायझोफोरेसी कुटुंबातील इतर प्रकारांतही (किरकिरी, कान्दल्गुरीया, बृगीएरा, कांदळ) प्रजोत्पत्ती अशीच असते, रोपटय़ांचे आकार वेगवेगळे असतात.
तिवराच्या झाडाला असंख्य फुले येतात. योग्य वेळी त्यांची फळे ओल्या चिखलावर पडतात, रुजतात किंवा लाटांबरोबर आसपास पसरतात आणि रुजतात. तिवराच्या मोठय़ा झाडाखाली व आसपास २ ते १० पाने असलेली शेकडो रोपटी पावसाळ्याच्या उत्तरार्धात दिसून येतात.
मरांडीच्या झुडपाचाही फैलाव बियांद्वारे होतो, पण त्याहीपेक्षा जास्त मोठय़ा प्रमाणावर मरांडीचा पसारा वाढतो तो त्याच्या जलपर्णीसारख्या धावऱ्या फांद्यांमुळे. फुला-फळाद्वारे बीजनिर्मिती होऊन चीर्पीचा प्रसार मर्यादित प्रमाणात होतो. कधी कधी फांद्यावर ‘बुटी’ मारतात. यात फांदीचे साल काढून तेथे ओला चिखल बांधतात. काही दिवसांनी त्याजागी मुळे फुटतात. मुळे असलेली फांदी कापून जमिनीवर पेरली की नवे झाड तयार होते. कांदळ नर्सरी गोव्यात चोराव बेटावर आणि विक्रोळीच्या ठाणे खाडीलगत उभारल्या गेल्या आहेत. डहाणूत सावता खाडीकाठी तिवरवन नव्याने प्रस्थापित करण्यात यश आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडात कांदळ रोपटय़ांना कागदाचे पंख लावून हेलिकॉप्टरमधून पेरणी करून फार मोठे क्षेत्र खाजणवनाखाली आणलेले आहे.
– प्रा. शरद चाफेकर मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org