अलेक्झांड्रिया शहरात, भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एकावेळी ३,००० वाचक बसू शकतील असे हे भव्य ग्रंथालय प्राचीन जगातल्या मोठय़ा ग्रंथालयांपकी एक समजले जाई. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा ग्रीक सेनानी टोलेमी सॉटर याने ग्रीक इजिप्तचे शासन सांभाळले. त्याने आपल्या राजधानी अलेक्झांड्रियात कलांची ग्रीक देवता म्युसेसचे मोठे मंदिर बांधले. म्युसेसवरूनच पुढे ‘म्युझियम’ हा शब्द बनला. म्युसेसच्या मंदिराला जोडून टोलेमी प्रथमने छोटेसे वस्तुसंग्रहालय तयार केले. या संग्रहालयात ग्रंथालय तयार करण्याची जबाबदारी त्याने त्याचा विद्वान, राजकीय मुत्सद्दी डिम्रिटीयसवर टाकली. इ.स.पूर्व २९५ मध्ये स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचा पुढच्या राज्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे विस्तार केला. येथील प्रचंड मोठय़ा ग्रंथसंग्रहात दोन लाख पुस्तकांचा संग्रह होता असा इतिहासकारांचा अंदाज आहे. यातील बहुतेक पुस्तके तत्कालीन पॅपेरस या इजिप्शियन कागदावरील हस्तलिखिते, स्क्रोल्स म्हणजे भेंडोळ्यांच्या स्वरूपात होती आणि ती आजपर्यंत व्यवस्थित जतन करून ठेवली आहेत. तत्कालीन विद्वान, अभ्यासू लोकांची इथे नियमित वर्दळ होती. इथल्या अभ्यासिकेत तत्कालीन विद्वान वैज्ञानिक युक्लिड, कोपíनकस, आíकमिडीज, अरिस्टार्चस, स्टाईक्स यांची रोजची हजेरी असे. हे ग्रंथालय म्हणजे मध्यपूर्वेतले एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला आले. अलेक्झांड्रिया बंदरात येणाऱ्या प्रत्येक जहाजाची ग्रंथांसाठी कसून झडती घेतली जाई. जहाजात आढळणारे सर्व ग्रंथ, स्क्रोल जप्त करून ग्रंथालयास दिले जात! पुढे इ.स.पूर्व ४८ मध्ये ज्यूलियस सिझरबरोबर झालेल्या संघर्षांत आणि पुढच्या काळात या ग्रंथसंग्रहास लागलेल्या आगींनी येथील अनेक ग्रंथांची जाळपोळ झाली, तसेच इ.स. ६४२ मध्ये अलेक्झांड्रिया अरब मुस्लिमांच्या कब्जात गेल्यावर त्यांनीही अनेक ग्रंथांची नासाडी केली. अन्य अरब राष्ट्रांच्या मदतीने २००२ साली नव्याने बांधलेल्या या ‘बिब्लीओथिका अलेक्झांड्रिना’च्या भव्या इमारतीत सध्या अरेबिक, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषेतील ८० लाख पुस्तकांबरोबर शिलालेख, ताम्रपटांचाही मोठा संग्रह आहे!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com  

 

बीजपेढी

आपला भारत  हा कृषिप्रधान देश आहे. नवरात्र, पोंगल, ओणम असे आपले अनेक सण धनधान्याची पूजा करून साजरे होतात. इथल्या शेतकऱ्यांनी केवळ निरीक्षण आणि अनुभवाच्या आधाराने फक्त भाताच्या सुमारे १००,००० हून अधिक जाती विकसित केल्या होत्या. आता फक्त भाताच्या ६००० जाती लोकांना माहीत आहेत. सध्याच्या जागतिक हवामानबदलामुळे वाढलेल्या नसर्गिक आपत्ती आणि अनेक संहारक अस्त्रांच्या निर्मितीमुळे अन्नसुरक्षेची जटिल समस्या सर्व जगाला भेडसावत आहे. अशा परिस्थितीत आपल्यानंतरच्या पिढीसाठी हा अमोल ठेवा आणि शिल्लक असलेले पारंपरिक ज्ञान जतन करणे, ही आपली नतिक जबाबदारी आहे. यातूनच जन्म झाला बीज कोषागार या संकल्पनेचा!

बीज कोषागार म्हणजे एक प्रकारची बँकच असते जिथे अनेक दुर्मीळ जातींच्या धान्यांचे, भाजीपाल्यांचे, फळांचे उत्तम वाण सुरक्षितरीत्या वर्षांनुवष्रे साठवतात आणि गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांना पुरविले जातात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे झाडांच्या बिया शेकडो वष्रे -नाही- कित्येक हजार वर्षांपर्यंत राहू शकतात. इस्राएलमधील उत्खननात मिळालेल्या दोन हजार वष्रे पुरातन खजुराच्या बीमधून झाड उगवले. २०१२ साली सायबेरियातील अतिपुरातन हिमनगाच्या आत ३८ मीटर खोलीवर ८००,००० बिया मिळाल्या होत्या. त्यातील एका ३२००० वष्रे जुन्या बीमधून झाड उगवल्याचा दावा रशियन शास्त्रज्ञांनी केला आहे.

ब्रिटनमधील रॉयल वनस्पती उद्यानात जगातील सर्वाधिक उपयुक्त अशा कमीत कमी २५ टक्के वनस्पतींचे संरक्षण करण्याचे प्रयत्न वनस्पतिशास्त्रज्ञ करीत आहेत आणि २००० सालापासून १० टक्के वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे.

युनेस्कोसाठी अशा बीजपेढय़ा १९७० सालाच्या सुमारास शेतीशास्त्रज्ञ डॉ. आत्माराम भरव जोशी यांनी अनेक देशांत उभ्या करून दिल्या होत्या. भारतामध्ये डॉ. वंदना शिवा यांच्या ‘नवधान्य’ चळवळीतून उत्तराखंड राज्यामध्ये पहिल्या बीज विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली गावागावांतील महिलांच्या मदतीने देशातील १७ राज्यांमध्ये १११ बीज कोषागारांची निर्मिती झाली आहे. देहरादूनमधील त्यांच्या संस्थेमध्ये ५००० प्रकारच्या धान्यांचे बियाणे साठविले जाते, दुर्मीळ जातींचे बी पुन्हा पेरून नवीन बीज तयार केले जाते. संकटकाळात दिलासा देणारी बीजपेढी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेचा एक नवा किरणच आहे.

– सुगंधा शेटय़े (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org