अल्जिनेट तंतूंची कोरडय़ा स्थितीतील ताकद ही व्हिस्कोज तंतूंइतकीच असते, परंतु ओल्या स्थितीतील ताकद मात्र तुलनेने खूपच कमी असते. त्यामुळे हे तंतू पारंपरिक वस्त्रोद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापरण्यास योग्य असत नाहीत. अल्जिनेट तंतू हे ज्वालाग्राही नसतात व लगेच पेट घेत नाहीत. हे तंतू विशिष्ट क्षारांच्या द्रावणात विरघळतात व या गुणधर्माचा उपयोग पायमोजे बनविण्याच्या प्रक्रियेत तसेच काही खास प्रकारचे कपडे तयार करताना केला जातो.
अल्जिनेट तंतूंचा वापर पायमोजे तयार करणाऱ्या कारखान्यात होतो. पायमोज्यांचे उत्पादन करताना पायमोजे एकापुढे एक असे जोडलेल्या स्थितीत विणले जातात. दोन मोजे जोडण्यासाठी अल्जिनेट तंतूंचा वापर केला जातो. सर्व मोजे तयार झाल्यावर त्यांना जोडणारे अल्जिनेट तंतू क्षारांच्या द्रावणात विरघळवले जातात आणि मोजे एकमेकांपासून सुटे केले जातात.
नायलॉन किंवा पॉलिस्टर अशा तंतूंबरोबर पीळ देऊन अशा धाग्यांपासून कापड बनवून नंतर अल्जिनेट तंतू विरघळवून विविध प्रकारचे फॅन्सी कापड तयार करण्यासाठी अल्जिनेट तंतूंचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये जखमांवर बांधण्याची पट्टी (ड्रेसिंग) या तंतूपासून तयार केली जाते. अल्जिनेट तंतूंची द्रव शोषण क्षमता या उपयोगामध्ये महत्त्वाचे कार्य करते. अल्जिनेटपासून तयार केलेली जखमपट्टी जखमेतील रक्त किंवा स्राव शोषून घेते. हे स्राव शोषल्यानंतर अल्जिनेट तंतूंच्या असामान्य रासायनिक गुणधर्मामुळे एक जेलीसारखा चिकट व घट्ट असा पदार्थ तयार होतो. या पदार्थाचे जखमेभोवती एक आवरण तयार होते. अल्जिनेट तंतूंमधील कॅल्शियमच्या अणूंचा रक्तातील सोडियम अणूंबरोबर विनिमय होऊन रक्त साकाळण्याची क्रिया जलदगतीने होते. साध्या जखमपट्टीपेक्षा अल्जिनेट तंतूंच्या पट्टीमुळे ही क्रिया लवकर होत असल्याने गंभीर जखमा बऱ्या करण्यासाठी या तंतूंची पट्टी अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या तंतूंचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – अधीनस्थ सहयोग कराराची कलमे
अधीनस्थ सहयोगाच्या करारातील तनाती फौजेच्या खर्चविषयक धोरणाचे पहिले लक्ष्य ठरले अवध संस्थान. १८०१ साली अवधच्या नवाबाने त्याच्याकडील फौजेच्या खर्चाची रक्कम देण्यात कुचराई केल्यामुळे कंपनी सरकारने अवध राज्यक्षेत्रापकी निम्मा प्रदेश नुकसानभरपाई म्हणून जप्त केला. अठराव्या शतकाच्या अखेरीला मराठा साम्राज्य कमकुवत होऊन परिणामत: मराठा संघराज्यातील अनेक लहान आणि दुबळी राज्ये स्वतंत्र झाली. त्यापकी बहुतेकांनी वेलस्लीने तयार केलेल्या अधीनस्थ सहयोग कराराचा स्वीकार केला. शेजारच्या राज्याच्या आक्रमणापासून ब्रिटिशांच्या तनाती फौजेने आपले रक्षण करावे हा यामागचा मुख्य हेतू होता. या कराराच्या योजनेची मुख्य आठ कलमे पुढीलप्रमाणे होती. (१) या कराराचा स्वीकार करणाऱ्या राज्यामध्ये एक निवासी ब्रिटिश अधिकारी नियुक्त केला जाईल, (२)राज्यक्षेत्राच्या राजधानीत संरक्षणासाठी ब्रिटिश तनाती फौज राज्याच्या खर्चाने राखली जाईल. (३)राज्याच्या शासकीय सेवेत ब्रिटिशांशिवाय दुसरा कोणताही युरोपियन नागरिक असणार नाही, (४) तसा असल्यास त्याला त्वरित पदच्युत करावे. (५) या कराराचा स्वीकार करणाऱ्या शासकाने ब्रिटिश सत्तेशिवाय दुसऱ्या कुठल्याही सत्तेशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यास मनाई राहील.(६) ब्रिटिश सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय इतर कोणत्याही राज्याशी युद्ध करण्यास मनाई असेल आणि (७) इतर राज्यांशी झालेल्या संघर्षांत ब्रिटिश सरकारने काढलेला तोडगा करार केलेल्या राजास बंधनकारक राहील. (८) राज्याचा शासक कंपनी सरकारचे आणि पुढे ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व मान्य करील.
 कराराच्या सर्व कलमांचा स्वीकार करणाच्या बदल्यात त्या संस्थानाचे बाह्यशत्रूपासून आणि अंतर्गत अराजकांपासून रक्षण करण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची असेल. करार स्वीकारणाऱ्या संस्थानाने ब्रिटिश सरकारला तनाती फौजेच्या खर्चाची रक्कम देण्यात चालढकल केल्यास त्या संस्थानाच्या राज्यक्षेत्रातला काही प्रदेश दंडात्मक कारवाई म्हणून कंपनी सरकार जप्त करील.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com