रोमन लंडनच्या अस्तानंतर लंडनवर अँग्लो सॅक्सन या लढवय्या जमातीच्या लोकांनी आपला अंमल बसवला. अँग्लो सॅक्सनांची लंडनवरील कारकीर्द इ.स. ४१० ते १०६६ अशी झाली. सॅक्सन ही मूळची जर्मनीतली जमात. सुरुवातीला आलेले हे सॅक्सन लोक मिडल सॅक्सन म्हणून ओळखले जात. ते प्रथम जिथे वसले त्या भागाचे नाव मिडलसेक्स झाले.

अँग्लो सॅक्सनच्या आक्रमणांमुळे लंडनचे मूळ रहिवासी ब्रायटन- भीतीने फ्रान्स आणि स्पेनमध्ये स्थलांतरित झाले. फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्यांना ब्रायटन ‘ब्रिटनी’ तर स्पेनमध्ये राहिलेल्यांना ‘ब्रिटोनिया’ असे नाव पडले. अँग्लो सॅक्सन लोकांची लंडनवरील राजकीय कारकीर्द सुरू झाली तेव्हा सुरुवातीला त्यांची राजधानी होती िवचेस्टर आणि लंडन होते महत्त्वाचे व्यापारी ठाणे. त्यामुळे राजधानी िवचेस्टरपेक्षा लंडनलाच अधिक महत्त्व होते. अँग्लो सॅक्सन लोक सांस्कृतिक दृष्टय़ा पुढारलेले असल्यामुळे लंडनमध्ये योजनाबद्ध घरे, मंदिरे, रस्ते निर्माण झाले.

सातव्या शतकाच्या सुमारास लंडनमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रवेश झाला. लंडनची झालेली भरभराट पाहून उत्तरेतल्या डेन्मार्कमधले लुटारू – व्हायकिंग्ज- जमातींनी आपला मोर्चा लंडन आणि दक्षिण इंग्लंडकडे वळवला. पुढे नार्वेचे व्हायकिंग्जही आले. किंग कनूट हा मूळचा डॅनिश व्हायकिंग राजा दक्षिण इंग्लंडवर राज्य करीत होता. १०१६ साली त्याने आपली राजधानी िवचेस्टरहून लंडनला आणली. या व्हायकिंग्जपकी नार्वेजियन व्हायकिंग्जनी लंडन ही राजधानी ठेवून इंग्लंडवर  इ.स. १०६६ ते ११५४ या काळात राज्य केले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

काटेसावर (शाल्मली) 

खरे तर वसंत ऋतू अमुक दिवशी येतो, असे सांगता येत नाही. पण काटेसावरीच्या झाडावर फुले आली म्हणजे तिथे वसंत ऋतूचे आगमन झालेय, असे समजावे.

२०-३० मीटपर्यंत उंच वाढणारा हा वृक्ष खोडांवर, फांद्यांवर मोठमोठाले त्रिकोणी काटे दिमाखात मिरवत असतो. यामुळेच काटेसावर हे नाव पडले. भारतात बर्फाळ आणि वाळवंटाचे प्रदेश सोडले तर काटेसावरीचा सगळीकडे आढळ आहे.

डिसेंबर-जानेवारीत झाडांची पूर्ण पानगळ होते. जणू फुलांच्या आगमनाची तयारीच. पण पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी पाण्याची केलेली ती तजवीज असते. जरा तापायला लागले की त्याच्या निष्पर्ण काटेरी खोडांवर हिरवी बोंडे दिसायला लागतात. हिरव्या निदल पुंजातून आकर्षक लाल-गुलाबी रंगाच्या पाच मांसल पाकळ्या बाहेर डोकावू लागतात आणि फुलल्यावर देठाकडे वळतात. त्यामुळे आतले पुंकेसर  लांबूनही स्पष्ट दिसतात. बघता बघता फेब्रुवारी-मार्चमध्ये संपूर्ण झाड फुलांनी बहरून जाते. आणि आतापर्यंत रूक्ष वाटणारी काटेसावर एकदम विलोभनीय सौंदर्यवती वाटायला लागते. अशा वेळी या वृक्षाचे काटेसावर नावही रूक्ष वाटते. या वृक्षाचे संस्कृत नाव ‘शाल्मली’ हे जास्त योग्य आहे, हे पटायला लागते. एरवी तिच्या काटय़ांमुळे दूर राहणारी जनावरे आता या वृक्षाच्या खाली पडलेली फुले खायला वृक्षाभोवती घिरटय़ा घालायला लागतात. या फुलांना आपल्याला आवडणारा सुगंध नाही; पण फुलांतला मध चोखण्यासाठी मधमाश्यांसारखे कीटक, खारी, मना, फुलटोचे, बुलबुल, चष्मेवाला अशा अनेक प्राणी-पक्ष्यांची झाडावर झुंबड उडते.

एप्रिलनंतर निष्पर्ण फांद्यांवर पानांबरोबर वीतभर लांबीची होडीसारखी हिरवी फळं दिसू लागतात. फळ पक्व झाले की आतला चकचकीत कापूस वाऱ्याबरोबर भुरुभुरु उडू लागतो. अर्थात बियांचा प्रसार होण्यासाठी ही योजना असते. हा कापूस वजनाने अतिशय हलका आणि रेशमी- मुलायम असतो, यावरूनच इंग्रजीमध्ये या वृक्षाला ‘सिल्क कॉटन ट्री’ नाव पडले असावे.

कापसाचा उपयोग उशांमध्ये केला जातो. सावरीचा िडक ‘मोचरस’ म्हणून ओळखला जातो. तो जुलाब, आव, रक्तस्रावात उपयोगी पडतो. फुलांचाही औषधासाठी उपयोग होतो.

चारुशीला जुईकर,

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org