टीएफएल म्हणजे ट्रान्सपोर्ट फॉर लंडन ही सरकारी संस्था, लंडन शहरातील दळणवळणाची व्यवस्था आणि त्यावर नियंत्रण ठेवते. टीएफएलच्या वाहतूक सेवांमध्ये भूमार्ग वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक यांचा समावेश आहे. सध्या लंडनवासीयांसाठी व्यत्यय न येता जलदगतीने पोहचवण्यासाठी भरोशाचे वाहन म्हणजे ‘लंडन टय़ूब’ ऊर्फ ‘लंडन अंडर ग्राऊंड’.

लंडन मेट्रोपोलिटन रेल्वेने ही भूमिगत टय़ूब रेल्वेसेवा १८६३ साली सुरू केली. रोज तीस लाख लोकांची वाहतूक करणारी ही लंडन टय़ूब जगातली सर्वाधिक व्यग्र भूमिगत रेल्वे झालीय. २७० स्थानके असलेल्या लंडन टय़ूबच्या एकूण ११ लाइन्स म्हणजे वाहिन्या आहेत. एकूण ४०२ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग असलेल्या या टय़ूबने लंडनच्या रहदारीचा ४५ टक्के वाटा उचललेला आहे. २३ सरकते जिने असलेले वॉटर्लू स्टेशन हे लंडन टय़ूबचे सर्वाधिक वाहतूक करणारे स्टेशन. कोणत्याही टय़ूब स्टेशनवर प्रवाशाला दोन मिनिटांहून अधिक वेळ खोळंबावे लागणार नाही असे वेळापत्रक या टय़ूब रेल्वेने आखले आहे.

टय़ूबच्या सेंट्रल लाइनची व्हिक्टोरिया, चेिरग क्रॉस, यूस्टन, वॉटर्लू, लंडन ब्रिज, लिव्हरपूल स्ट्रीट, किंग्ज क्रॉस ही अतिविशाल, कलापूर्ण शैलीत बांधलेली स्टेशने कळस, मिनार, पुतळे यांनी सुशोभित केलेली आहेत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

दगडफूल व जिवाणू

दगडफूल : दगडफूल ही सहजीवी वनस्पती आहे. यात कवके आणि शैवाल एकत्र वाढतात. यापकी शैवाल प्रकाशसंश्लेषणाचे काम करते आणि कवक पाणी व क्षार शोषून घेण्याचे काम करते. दगडफूल ओल्या िभतीवर, दगडावर, झाडाच्या खोडावर व फांद्यांवर वाढते. दगडफूल प्रदूषणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असते. म्हणून त्याचा उपयोग प्रदूषणाचा अभ्यास करताना, प्रदूषण दर्शक म्हणून करता येतो. दगडफूल अतिशय पातळ थरात दगडावर किंवा झाडावर वाढते. जे सहजासहजी खरवडून काढता येत नाही. अशा दगडफुलांना ‘क्रस्टोज लायकेन’ म्हणतात. ज्या दगडफुलांच्या थरांमध्ये थोडी जाडी आलेली असते आणि आकारात पापुद्रे असतात त्यांना ‘फोलीओज् लायकेन’ म्हणतात. उदा. पारमेलिया. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल या प्रकारात मोडते. काही दगडफुले झाडावर आणि फांद्यांवर झालरीसारखी लोंबकळत असतात. यांना ‘फ्रुटीकोज लायकेन’ म्हणतात. उदा. उस्नीया. ही दगडफुले प्रामुख्याने जास्त पर्जन्य असलेल्या भागांत बघायला मिळतात. काही दगडफुलांचा वापर औषधांतही केला जातो.

जिवाणू : हा पाणी जमीन, हवा या सर्वत्र ठिकाणी आढळणारा एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. जिवाणू गोल, दंडगोल, पीळदार दंडगोल स्वल्पविरामच्या आकारात असतात. उपयुक्त बेसीलाय आपल्याला दह्य़ातून आणि आजकाल औषधाच्या स्वरूपात मिळतात. हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की आपण रोज जे दही खातो त्यात अनेक उपयुक्त जिवाणूंची व्याप्ती आहे. जिवाणूंची व्याप्ती बर्फाच्छादित अंटाíक्टकापासून उकळत्या झऱ्यांत, अगदी समुद्राच्या तळाशीही असू शकते. जिवाणूंची शरीररचना अत्यंत साधी असते. काही जिवाणू ऑक्सिजनशिवाय जगतात त्यांना ‘विनॉक्सी’ म्हणतात, तर काही ‘ऑक्सी’ म्हणजे त्यांना मुक्त  प्राणवायू अशा प्रकारचे असतात, उपद्रवी जिवाणूंच्या प्रादुर्भावाने धनुर्वात, न्यूमोनिया, कॉलरा, क्षयरोग, कुष्ठरोग, इत्यादी रोग होऊ शकतात. जिवाणूंच्या उपयोगितेचे उत्तम उदाहरण म्हणजे नत्रस्थिरीकरण जिवाणू- साफ्यनोबॅक्टेरिया आणि माणसाच्या लहान आतडय़ातले इ. कोलाय.

जिवाणू हा सूक्ष्म, उपद्रवी आणि उपयोगी या दोन्ही प्रकारांत प्रचंड प्रमाणात आढळणारा गट आहे त्यामुळे प्राणिमात्रांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांचा अभ्यास गरजेचा आहे.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, 

चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org