मध्य इराकमधील तग्रीस  नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले बगदाद शहर हे इराकची राजधानी आहे. इस्लामपूर्व काळातील प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशातील प्रमुख शहर बाबिलोन येथील उत्खननात त्याच्या जवळच्याच बगदाद येथील वस्तीचा उल्लेख सापडला आहे. सध्याचे बगदाद, अबासिद साम्राज्याचा द्वितीय खलिफा अल मन्सूर याने ७६२ साली तग्रीस नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राजधानीचे शहर म्हणून वसवले. मेसोपोटेमियाचे प्रमुख व्यापारी रस्ते जेथे मिळतात, अशा या ठिकाणाची निवड अल मन्सूरने केली. पाíशयन, सासमिड परंपरेच्या वर्तुळाकार नगररचनेत बांधलेले बगदाद प्रथम केवळ साम्राज्याचे मुख्यालय म्हणून वसवले गेले; परंतु थोडय़ाच काळात तिथे तग्रीसच्या दोन्ही किनाऱ्यांवर वसती झाली. पाण्याची मुबलकता आणि तग्रीस- युफ्रेटिस नद्यांमधील सुपीक खोरे, तसेच व्यापारी रस्त्यावरचे ठिकाण म्हणून अल मन्सूरने राजधानीचे ठिकाण म्हणून बगदादची केलेली निवड अगदी योग्यच होती.

नवव्या शतकात सुलतान हसन अल रशीद आणि अलमाम यांच्या कारकीर्दीचा काळ बगदादच्या इतिहासात सुवर्णकाळ ठरला. या काळात तीन लाख वस्तीचे बगदाद शहर वस्त्रोद्योग, चामडी वस्तू, कागद यांच्या व्यापाराचे एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. त्याचप्रमाणे ग्रीक, पíशयन आणि अरबी भाषांमधील तत्त्वज्ञान आणि शास्त्रीय विषयांच्या ग्रंथनिर्मिती तसेच अनुवादांची कामे मोठय़ा प्रमाणात इथे होत असत. परंतु हे सारे वैभव १२५८ साली मंगोल आक्रमक चंगीजखानाच्या नातवाने आणि पुढे १४०१ मध्ये तमूरलंगाने हल्ले करून उद्ध्वस्त केले, लुटले. मशिदी, ग्रंथालयांची जाळपोळ करून नष्ट केले. पुढे बगदादवर इ.स. १५३४ ते १९१८ या काळात तुर्की ओटोमान साम्राज्याचा अंमल राहिला तर पहिल्या महायुद्धानंतर १९१८ ते १९३२ या काळात ते ब्रिटिशांच्या अंमलाखाली राहिले. ब्रिटिश सत्ताकाळात त्यांनी फाझल अली या मक्केच्या शेरीफाच्या मुलाला बगदाद आणि इराकचा राज्यकर्ता म्हणून घोषित केले. १९३२ साली इराक ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन फाजल अलीच्या राजवटीखाली आले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

तिरफळ

जगभरातील मसाल्याच्या पदार्थामध्ये कमी ज्ञात असलेला एक पदार्थ म्हणजे ‘तिरफळ.’ भारतात याचा वापर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात आढळतो. या प्रांतातील विशिष्ट शाकाहारी व मांसाहारी पदार्थाचा हा अविभाज्य घटक आहे. भारतात वापरल्या जाण्याऱ्या तिरफळ जातीचे नाव झान्थोझाय्लम रहेत्सा (zanthoxylum rhetsa)  असे आहे. सदाहरित असलेल्या या झाडाचा बुंधा शंकूच्या आकाराचा असून बाहेरून बुचासारखा दिसतो. त्यावर लंबवर्तुळाकार किंवा अंडाकृती पानांची विषम रचना असते. पिवळसर हिरव्या रंगांचा फुलोरा आणि गोलाकार फळांचे लटकणारे हिरवेगार घोस हे या झाडाचे मोहक रूप आहे.

तिरफळाची झाडे सुमारे दोन ते पाच मीटर उंच वाढतात व सदैव काटय़ांनी आच्छादलेली असतात. उष्ण व दमट हवामानात प्रखर उन्हात किंवा सावलीत याची लागवड करतात. पावसाळ्यात याला गडद हिरव्या रंगाची फळे धरतात. फळे वाटाण्याच्या आकाराची असून त्यांचे घोस झाडावर लागतात. तेसुद्धा काटय़ाच्या आवरणातच. काटय़ाचे जणू चिलखत घातलेल्या या झाडाला ‘प्रिकली ऐश’ असे म्हणतात.

सुकल्यावर तिरफळे काळ्या रंगाची होऊन उघडतात. त्यातून बिया वेगळ्या करून फक्त टरफलांचा वापर केला जातो. ओल्या किंवा सुकवलेल्या तिरफळांचा अर्क काढला जातो. ओल्या नारळाच्या वाटणासोबत हा अर्क म्हणजे सर्व कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ओल्या तिरफळांचे लोणचे हा एक अनोखा प्रकारही या भागाची खासियत आहे.

चीनमध्ये शोध लागलेल्या तिरफळाच्या काही प्रजाती नेपाळ, तिबेट, भूतान, थायलंड व इंडोनेशियामध्येही आढळतात. ‘शेजवान पेप्पर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडाची फळे लाल, गुलाबी व केशरी रंगाची असतात. चायनीज खाद्यप्रकारातील ‘फाइव्ह स्पाइस पावडर’मध्ये शेजवान पेप्पर हा एक घटक असतो.

तिरफळातील तीव्र स्वाद हा त्यात असलेल्या ‘हैड्रोक्सई अल्फा संशुल’ या रसायनामुळे प्राप्त होतो. याच्या  मज्जातंतूंवर होणाऱ्या परिणामामुळे जिभेवर एक विशिष्ट प्रकारची बधिरता रेंगाळते. रुचिशास्त्रानुसार या चवीचे वर्णन खमंग आणि झणझणीत असे केले जाते. याशिवाय यातील आवश्यक तेले व टíपन्स दातदुखी व पचनविकारावर गुणकारी आहेत.

डॉ. अपर्णा दुभाषी (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org