व्हिक्टोरिया टॉवर आणि बिग बेन बसविलेला अल्बर्ट टॉवर या दोन टॉवर्समधील वेस्टमिन्स्टर हॉल, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स अशी लंडन पार्लमेंटची ढोबळ मांडणी आहे. थेम्स नदीजवळ उभ्या असलेल्या पार्लमेंट इमारतीच्या अल्बर्ट टॉवरवरील बिग बेन हे घडय़ाळ अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. १८५९ साली बसविलेल्या या घडय़ाळाचा खर्च एकूण २२ हजार पौंड आला. दोनशे किलो वजनाचा याचा लंबक! सर बेंजामीन हॉल या ‘कमिशनर ऑफ वर्क्‍स’च्या देखरेखीखाली हे घडय़ाळ बसविले गेले. हा बेंजामीन प्रकृतीने स्थूल आणि जाडजूड असल्यामुळे घडय़ाळाचे नावही ‘बिग बेन’ झाले! गॉथिक टय़ूडर शैलीचा उत्तम नमुना असलेल्या पार्लमेंट हाऊसच्या पुढय़ातल्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनेक राजकीय पुतळे दिसतात. त्यात आपल्याला चटकन ओळखता येईल असे चíचलसाहेब आणि अब्राहम िलकनही आहेत. पार्लमेंटच्या दोन सभागृहांपकी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये इंग्लंडची राजा-राणी आणि राजघराण्यातल्या इतरांना प्रवेशबंदी आहे!
दुसऱ्या महायुद्धात पार्लमेंटची इमारत पाडण्यासाठी जर्मनांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या बॉम्बहल्ल्यातून वेस्टमिन्स्टर हॉल बचावला, पण इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले. महायुद्ध समाप्तीनंतर थोडय़ाच दिवसात डागडुजीनंतर ही इमारत परत दिमाखात उभी आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

शैवालांचे प्रकार
नीलहरित शैवाल : या प्रकारचे शैवाल विहिरींच्या, नदीकाठच्या दगडांवर, तळ्यात, ओल्या जमिनीवर आणि समुद्रात सापडते. यापकी बहुतांश वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने बघाव्या लागतात आणि त्यांचा रंग साधारण निळा-हिरवा दिसतो. उदा- नॉसटाक, अनाबिना, आस्सीलॅटोरिया इत्यादी. निळ्या-हिरव्या शैवालांपकी काहीत हवेतील नत्र शोषून घेण्याची क्षमता असते. त्याचा उपयोग भाताच्या वाढीला लागणारे नत्र हे मूलद्रव्य मिळवण्यासाठी केला जातो.
हिरवे शैवाल : सर्व प्रकारच्या शैवालांमध्ये हिरव्या शैवालांचा आकार आणि अधिवासात सर्वात जास्त वैविध्य आहे. गोडय़ा पाण्यात हिरव्या शैवालाची वाढ होते. उदा- स्पायरोगायरा, युलोथ्रीक्स. काही हिरव्या शैवालाच्या रचनेत प्रगत बदल घडून आल्याचे दिसतात आणि खोडासारखे, पानासारखे अवयव तयार झालेले आढळतात. उदा. कारा, नाईटेला. समुद्रातील हिरवे शैवाल लहानमोठय़ा दगडांना चिकटून वाढते आणि ओहोटीच्या वेळी नुसत्या डोळ्यांनी बघता येते. उदा. उल्वा, एंटेरोमार्फा, कौलरपा इत्यादी. शैवालाचा उपयोग खाऱ्या पाण्यातील मासे, िझगे, खेकडे अन्न म्हणून करतात आणि लपण्यासाठीही करतात. काही शैवालांत प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्याने मनुष्यही शैवालाचा उपयोग पूरक अन्न म्हणून करू शकतात.
पिवळसर शैवाल : प्रामुख्याने समुद्रात सापडते. भारतात समुद्रात सापडणाऱ्या पिवळसर शैवालाच्या काही प्रजाती उदा : डिक्टीओटा, सारगासम, टरबीनारिया इत्यादी. पॅसिफिक व अटलांटिक महासागरात आढळणारे शैवाल अनेक मीटर लांब आणि उंच वृक्षासारखे असते. शैवालांना इंग्रजीत ‘सीवीड’ असे म्हणतात. या शैवालांपासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. उदा- जपानमधील ‘कोंबू’. काहींचा उपयोग खतांसाठी होतो, तर काही शैवालांपासून आयोडीन आणि अल्जीनेट उपलब्ध होते. औषधे, दंतचिकित्सा आणि अग्निसंरक्षण साधने तयार करण्यासाठी पण वापर होतो.
लाल शैवाल : काही लाल शैवालांपासून एक चिकट पदार्थ मिळतो. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ‘आगार’ नावाचा पदार्थ तयार केला जातो. आगारचा उपयोग आईस्क्रीम, जेली, सॉसेस हे पदार्थ घट्ट करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म जीवांची कृत्रिमरीत्या वाढ करण्यासाठी आगारचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो. उदा. ग्रॅसीलॅरिया, जेलिडियम. सोलीएरा, शैवाळांमधील वैविध्य आणि उपयोगिता लक्षात घेता हा वनस्पतींमधील महत्त्वाचा गट आहे.

– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org