खूप मोठी संख्या दाखवणारी बरीच एककं आहेत. विशेषत: अवकाशातली अंतरं दाखवताना अशा एककांची गरज भासते. प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षांत कापलेलं अंतर – अंदाजे एकावर तेरा शून्य इतके किलोमीटर. प्रकाशवर्षांच्या जोडीने इतर मनोरंजक एककंही वापरली जातात. पृथ्वीपासून सीरिअस ताऱ्यापर्यंत जाऊन-येऊन अंतराला सिरिओमीटर म्हणतात. हे अंतर साडेपंधरा प्रकाशवर्षांइतकं आहे. कोणी सीरिअसवर एक फेरी का मारेल हे मात्र विचारू नका!

कार्ल सेगनची ‘कॉसमॉस’ ही मालिका तुम्हाला कदाचित आठवत असेल. अवकाशाच्या भव्यतेने दिपून गेलेला सेगन कायम ‘बिलियन्स अँड बिलियन्स’ (एक बिलियन = शंभर कोटी) हा वाक्प्रयोग वापरायचा. या नावाचं त्याचं पुस्तकदेखील आहे. यावरूनच गंमत म्हणून प्रचंड संख्येचा उल्लेख करताना अमेरिकेत काही काळ सेगन हे एकक वापरायची टूम आली होती. सरकार लष्करावर किती सेगन खर्च करणार आहे, अशा चर्चा नव्वदीच्या दशकात चालायच्या. काही जणांनी खूप विचार करून बिलियन्स हे अनेकवचन असल्याने त्याचं मूल्य २ बिलियन असं निश्चित केलं. अर्थात बिलियन्स अँड बिलियन्स होतात ४ बिलियन. म्हणून आकाशगंगेत सुमारे १०० सेगन तारे आहेत, असंही तेव्हा म्हटलं जायचं.

आपल्या सर्च इंजिनसाठी नाव रजिस्टर करायला गेलेले दोन तरुण मुळात गूगोल हे नाव रजिस्टर करणार होते; पण आयत्या वेळेला काही तरी चूक झाली आणि त्यांनी नाव घेतलं गुगल! ही सुरस कहाणी तुम्ही कदाचित ऐकली असेल; पण गूगोल हे नाव का घेणार होते माहीत आहे का? आपलं सर्च इंजिन ऑनलाइन माहितीचा प्रचंड साठा िवचरून काढील अशी त्या दोघांना खात्री होती आणि प्रचंड मोठी संख्या दाखवण्यासाठी वापरलं जाणारं एक एकक आहे गूगोल. एक गूगोल म्हणजे एकावर शंभर शून्य!

आणि त्याहीपुढचं एकक आहे गूगोलप्लेक्स, म्हणजे एकावर एक गूगोलइतके शून्य. ही संख्या कधीही, कोणालाही, अगदी महासंगणकालाही लिहिता येणार नाही. कारण ती लिहायला जेवढी जागा लागेल, तेवढी जागा अख्ख्या विश्वातही उपलब्ध नाही. आता बोला!

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

महाश्वेतादेवींची साहित्यिक भूमिका

‘‘फार काळापासून आदिवासींच्या जीवनाविषयी माझ्या मनात जी तीव्र भावना धगधगते आहे, ती माझ्या चितेवरच शांत होईल,’’ असे उद्गार काढणाऱ्या महाश्वेतादेवींनी आपले सारे आयुष्य आणि साहित्य या आदिवासींच्या उद्धारासाठीच समर्पित केले. समाजाच्या मूळ स्रोतापासून वेगळे पडलेल्या, दु:स्थितीतील जनजातींच्या जीवनाचा परिचय करून देणाऱ्या अनेक कथा-कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. विशेषत: १९६०-७०च्या दशकातील नक्षलवादी चळवळीचा अनुभव  त्यांनी बऱ्याच कथा-कादंबऱ्यांत मांडला. त्यांच्या ४५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह, एक नाटक, बालसाहित्य प्रसिद्ध झाले आहे. १९५६ मध्ये त्यांची ‘झाँसीर रानी’ ही राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील संशोधनात्मक कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर १९५७ मध्ये ‘नटी’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. पण त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत- ‘अरण्येर अधिकार’, ‘हजार चुराशिर माँ’, इ. यांचे अनुवादही सिद्ध आहेत.

लेखन हाच व्यवसाय मानणाऱ्या महाश्वेतादेवी १९५०-५५ पासून विविध साहित्यप्रकार हाताळत होत्या. आदिवासी व तळागाळातील जाती-जमातींसाठी त्या कार्य करीत असल्याने त्यांचे आयुष्य जवळून पाहिल्याने त्यांच्या लेखनाचे विषय वेगळे आहेत. सर्वसामान्य माणसांवर होणारे सत्ताधाऱ्यांचे आक्रमण. हा विषय त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होऊन गेला.

साहित्याला त्या प्रभावी शस्त्र मानत असत. त्या म्हणत – ‘सध्याची समाजव्यवस्था बदलण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, पण आज सामान्य माणसाच्या गरजाही भागताना दिसत नाहीत. अशा शोषितांसाठी लिहिणं- हे लेखकाचं कर्तव्य आहे. समाजातील वर्गसंघर्षांविषयी, शोषणाविषयी लेखकांनी लिहायला हवं. म्हणून मी लिहिते- या धगधगणाऱ्या संघर्षांविषयी न लिहिणाऱ्या लेखकांना इतिहास कधीच माफ करणार नाही.’ भूमिहीन, शेतमजूर, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, आदिवासी इ. शोषण हेच त्यांच्या साहित्याचे मूलस्रोत आहेत. पण त्यांचे साहित्य प्रचारकी नाही तर मानवी भावभावनांना भिडणारे आहे. कळकळीचे आहे.

आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी लढा देणे असो, गुजरातची दंगल असो, नंदीग्राम-सिंगूरचा लढा असो वा तस्लिमा नसरीनला पाठिंबा देणे असो, हिरिरीने रस्त्यावर उतरणाऱ्या महाश्वेतादेवी वयाच्या ८४ व्या वर्षीही सक्तीच्या स्थलांतरांचे होणारे दुष्परिणाम, कम्युनिस्टांचा बंगाल, मोदींचा गुजरात, राजकारण्यांचा कोडगेपणा आणि जनतेची उदासीनता इ. विषयांवर अत्यंत सडेतोडपणे मते मांडत असत. प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना ‘कम्युनिस्ट आर वर्स दॅन हिटलर’ असे सुनावणाऱ्या पत्रात त्या म्हणतात,- ‘आपल्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल राज्यांतून गेल्या वीसएक वर्षांत जे स्थलांतर झालंय, ते त्या त्या राज्यातील राजकारणी आणि नोकरशहांच्या नाकर्तेपणाचा परिपाक आहे.’

.. जिथे कुठे तळागाळातील शोषितांचे अश्रू दिसतात, तिथे तिथे त्या कृतिशील असायच्या आणि तोच त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com