धुलाई व्यवस्थित झालेले कापड पाणी चटकन शोषून घेते. तसेच त्या कापडावर, कोणतेही खासकरून पिवळे डाग असता कामा नये. विरंजन म्हणजे कापडाचा किंवा सुताचा नसíगक रंग नाहीसा करणे. ही प्रक्रियासुद्धा आम्लारी (अल्कली) द्रावणात केली जाते. त्या द्रावणात जलशोषक, स्थिरीकरण करणारे इत्यादी घटक घातले जातात. प्रक्रिया सुरळीत आणि परिणामकारक व्हायला या घटकांची मदत होते.
हायड्रोजन पेरॉक्साइडची द्रव स्वरूपातील आम्लारी आणि प्रक्रियेला साहाय्य करणाऱ्या इतर पदार्थाच्या उपस्थितीत कापसाबरोबर प्रक्रिया होते. ही प्रक्रिया पेरॉक्साइड आणि आम्लारीदरम्यान होते. त्या वेळी परहायड्रोसिल आयन तयार होतो. या आयनची कापसातील सेल्युलोजबरोबर प्रक्रिया होते आणि त्यातील रंगीत भागाचे ऑक्सिडेशन होऊन त्याचा रंग नाहीसा होतो. त्याचा परिणाम म्हणून कापड पांढरे शुभ्र होते. त्याला आपण ब्लीच केलेले कापड म्हणून ओळखतो.
बाजारात ब्लीचिंगसाठी वापरली जाणारी वेगवेगळी रसायने उपलब्ध आहेत. त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड, ज्याला ब्लीचिंग पावडर म्हणून संबोधले जाते, परसल्फेट ब्लीचिंग, पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर करून ब्लीचिंग असे आणखी काही पर्याय आहेत. यापकी परसल्फेट आणि हायड्रोजन पेरॉक्साइड यांचा ब्लीचिंगसाठी नेहमी वापर केला जातो. हायपोक्लोराइड ब्लीचिंग म्हणजे ब्लीचिंग पावडरचा उपयोग करून केलेले ब्लीचिंग आता वापरले जात नाही. त्यामध्ये असलेल्या क्लोरिनमुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करून ब्लीचिंग करण्याची पद्धत जास्त वापरली जाते. ही पद्धत सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही आहे.
हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करून आम्लारीच्या उपस्थितीत ब्लीचिंग करणे थंड पाण्यातही शक्य आहे. पण या प्रक्रियेला वेळ खूप लागतो. जसजसे आपण तापमान वाढवू तसतसा प्रक्रियेचा वेग वाढतो. तापमान ८५ ते ९५ डिग्री सेल्सिअस असताना ब्लीचिंग सर्वात चांगले होते. प्रक्रियेचा कालावधीही दोन ते तीन तास एवढाच हवा. अन्यथा कापड जास्त वेळ ब्लीचिंगच्या द्रावणात राहिल्यास ते कमजोर होऊन फाटू शकते. त्यामुळे सर्व रसायनांची योग्य मात्रा, द्रावणाचा योग्य सामू (पी.एच. १०.५ ते १२.५ पर्यंत) ठेवणे, तापमान बरोबर असणे आणि ब्लीचिंगचा कालावधी सांभाळणे या साऱ्या गोष्टी नीट केल्या पाहिजेत.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जत संस्थान
सध्या सांगली जिल्ह्यात असलेले जत हे तालुक्याचे ठिकाण ब्रिटिशराजच्या काळात जत संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. डाफळ या गावचे पाटील लखमाजीराव येलदोजीराव चव्हाण हे जतच्या छोटय़ा राज्याचे संस्थापक. लखमाजीराव चव्हाण हे मूळ राजस्थानातील िहदु क्षत्रिय चौहान घराण्याचे वंशज. विजापूरच्या अली आदिलशाह याच्या दरबारात हे लखमाजीराव नोकरी करीत असत. विजापूरकडून त्यांना चार महालांचे देशमुखी वतन आणि जत व करजागीची जहागीर मिळाली.
पुढे १७०४ साली औरंगजेबाने, या घराण्याची जहागीर आणि देशमुखी कायम करून वारसा हक्काने चालू ठेवण्याचे फर्मान काढले. जत संस्थानाच्या पुढच्या शासकांनी देशमुख किंवा डाफळे हे आडनाव लावले. जत संस्थानाच्या चार पुरुष राज्यकर्त्यांचे दुर्दैवाने अल्पवयात निधन झाल्यामुळे येसुबाई, रेणुकाबाई, सलीबाई, भागीरथीबाई या राण्यांनाच पतिनिधनांनंतर कारभाराची जबाबदारी घ्यावी लागली. सत्तर वर्षांचा राज्यकारभार या स्त्रियांनी उत्तमरीत्या पार पाडला.
अठराव्या शतकाच्या मध्यावर, मोगल सत्ता दुबळी झाल्यावर जतचे राज्य सातारा छत्रपतींच्या नियंत्रणाखाली आले. साताऱ्याचे राज्य १८४८ मध्ये ब्रिटिशांनी खालसा केल्यावर, जत हे ब्रिटिश राजवटीच्या अंकित संस्थान बनले. ते पुढे १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत. २५०० चौ. कि. मी. राज्यक्षेत्र असलेल्या जत संस्थानाची लोकसंख्या १९०१ साली ७०,००० होती. तोफ सलामींचा मान नसलेल्या या संस्थानाचे शेवटचे अधिकृत राजे विजयसिंहराव उर्फ बाबासाहेब डाफळे (देशमुख) यांची कारकीर्द इ.स. १९३६ ते १९४७ अशी झाली.
बाबासाहेबांचा कारभार कल्याणकारी होता. त्यांनी या राज्यात प्रशासकीय सुधारणा करून शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधा सुरू केल्या. भारतीय स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी राजकारणात प्रवेश करून विधानसभेत जतचे प्रतिनिधित्व केले. जत संस्थान कर्नाटकाच्या सीमेजवळ असल्यामुळे तिथले निम्मे अधिक रहिवासी कन्नड भाषिक आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com