१९०८ साली बुडापेस्ट इथे जन्मलेले एडवर्ड टेलर यांची ओळख ‘हायड्रोजन बॉम्बचे पितामह’ अशी आहे. हायड्रोजन बॉम्बनिर्मितीव्यतिरिक्त न्यूक्लीअर आणि मोलॅक्युलर फिजिक्स या विज्ञान शाखांमधील अनेक नवीन संशोधनांमध्ये त्यांचा सहयोग होता. वयाच्या केवळ २२व्या वर्षी एडवर्डनी सद्धांतिक वास्तवशास्त्र या विषयात पीएच.डी. मिळवली. प्रथम लंडन विद्यापीठ आणि नंतर जॉर्ज वॉिशग्टन विद्यापीठात व्याख्याता म्हणून नोकरी केली. पुढे दुसऱ्या महायुद्धापूर्वी अमेरिकेने ‘मॅनहटन प्रोजेक्ट’ या अणुविभाजनविषयक संशोधन प्रकल्पावर एडवर्डची नियुक्ती केली. अणुविघटन आणि अणुसंघटन प्रक्रिया करून अणुबॉम्बनिर्मिती करणाऱ्या संशोधकांच्या कामगिरीमध्ये एडवर्डचा महत्त्वाचा वाटा होता. पहिल्या न्यूक्लीअर रिअ‍ॅक्टरचा मूळ आराखडा त्यांनीच तयार केला. १६ जुल १९४५ रोजी दक्षिण मेक्सिकोमध्ये पहिली अणुस्फोट चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर तीन आठवडय़ांनी, ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून स्फोट करण्यात आला. वॉशिंग्टन विद्यापीठात संशोधन करीत असताना गॅमाव या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने एडवर्ड टेलरकडे सूर्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेच्या मूलस्रोताचा शोध घेण्याची कल्पना मांडून त्यांना त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले. यातूनच पुढे हायड्रोजन बॉम्बचा उदय झाला. एडवर्ड टेलर यांनी यापुढे आपले संशोधन हायड्रोजन बॉम्बनिर्मितीच्या दिशेनेच चालू केले. अमेरिकन सरकारच्या अणुशक्ती विभागाने टेलर यांच्या या संशोधनाला ‘द सुपर’ हे सांकेतिक नाव दिले. हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटातून प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन तिच्यावर नियंत्रण ठेवणे फार अवघड होईल, पृथ्वीचा फार मोठा भाग उद्ध्वस्त होईल अशी धोक्याची सूचना ओपनहायमर या शास्त्रज्ञाने टेलर आणि अमेरिकन सरकारला दिली होती, पण तरीही टेलरनी १९५४ साली हायड्रोजन बॉम्ब तयार करून त्याची चाचणी घेतली. टेलरना या संशोधनाबद्दल एन्रीको फेर्मी पुरस्कार, अल्बर्ट आइनस्टाइन पुरस्कार, अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल इत्यादी पुरस्कार मिळाले. २००३ साली एडवर्ड टेलरचे निधन झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

द्राक्ष

अनेक गरदार आणि रसाळ फळांपकी ‘द्राक्ष’ एक रसाळ फळ. मांसल फळांपकी बेरी प्रकारात हे फळ मोडते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव व्हायटिस व्हिनिफेरा असे आहे. या प्रकारात बियाच फक्त थोडय़ा कठीण असतात. बाकीचा सगळा भाग मऊ, गरदार असतो. द्राक्षाच्या फुलोऱ्यात दांडोऱ्याला दोन्ही बाजूस छोटय़ा काडय़ा फुटतात. त्यावर छोटी छोटी फुले येतात. द्राक्षाच्या झाडासाठी मांडव घालतात. खोड व पान मांडवाच्या वरच्या बाजूला पसरत जातात, तर फुलोरा मांडवाच्या खालच्या बाजूला लोंबतो. फुलांची सदले व पाकळ्या वेगळ्या असतात. हे एकमेकांना चिकटून फुलातल्या स्त्रीकेसर व पुंकेसरावर आच्छादन करतात. त्याला शास्त्रीय परिभाषेत ‘कॅलिप्ट्रा’ किंवा ‘कॅप’ म्हणतात. परागीभवनाच्या वेळेस कॅलिप्ट्रा गळून पडतो तेव्हा फुलांना बहर आला असे समजले जाते. १-३ आठवडय़ांनी फलधारणा होते. हिरवे गोल थोडे मोठे झाले की त्याला फ्रुट सेट झाले आहे असे म्हणतात. फळाच्या बीजांडकोशात ४ बीजांडे असतात. त्याचे बियांत रूपांतर होते. बीजांडकोशाचा सर्व भाग गरदार होतो. बिया गरात चिकटलेल्या असतात. तो भागही खाण्यासाठी योग्य होतो. दांडोऱ्यावर फूल आल्यावर ‘कॅलिप्ट्रा’ गळून पडायच्या आधी किंवा गळल्यावर लगेच ‘जिबरेलिक अ‍ॅसिड ३’मध्ये फुलाचा दांडा बुडवतात. त्यामुळे फ्रुट सेट चांगले होते. दांडोऱ्यावर फुले खूप असतील तर त्यातली काही काढून टाकतात. त्यामुळे राहिलेले द्राक्षाचे मणी चांगले वाढतात. नाही तर घडाचे मणी एकमेकांवर घासून त्यातून आत जिवाणू शिरून द्राक्षाचा घड खराब होतो. द्राक्षाच्या घडातले टोकाचे द्राक्ष मऊ, गोड झाले असले तर घड तयार झाला असे समजावे. थॉमसन सीडलेस व काळी सीडलेस या जातींच्या मनुका करतात, तसेच थॉमसन अनाबेशाही, शरद सीडलेस, ब्यूटी सीडलेस या जातींपासून नवीन केलेल्या व्हरायटीसुद्धा खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अगदी सुरुवातीला सीडलेस द्राक्ष उत्परिवर्तनाने (म्युटेशन) तयार झाली, परंतु सध्या सीडलेस द्राक्षे संजीवके वापरून (जिब्रेलिक अ‍ॅसिड फवारून) किंवा बीजांड-फलन न करता तयार करतात.

डॉ. कांचनगंगा गंधे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org