इजिप्तमधील नाईल नदीच्या सुपीक त्रिभूज परिसरात वसलेल्या कैरो शहराची लोकसंख्या आहे एक कोटी वीस लाख. जुनी आणि नवी संस्कृतीचा मिलाफ साधलेल्या या शहरात ९० टक्के सुन्नी पंथीय इस्लाम धर्माचे लोक आणि १० टक्के ख्रिस्ती धर्मीय आहेत. एके काळी इथे ख्रिस्ती आणि ज्यू धर्मीय लोकांचे प्रमाण अधिक होते. १९५२ सालच्या राज्यक्रांतीनंतर ब्रिटिश, फ्रेंच वसाहती संपल्या. मग इजिप्तच्या दूरवरच्या प्रदेशातल्या लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कैरोत स्थलांतर केल्यामुळे या शहरातली लोकसंख्या भराभर वाढली. सरकारनेही या वाढत्या लोकसंख्येसाठी नवीन उपनगरे वसवून नवे रस्ते आणि इतर मूलभूत सोयींचे चांगले नियोजन केले. पुढच्या काही दशकांतच भरभराट होऊन कैरो हे इजिप्तचे महत्त्वाचे औद्योगिक, व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाऊ लागले. १९५० साली कैरो नगर प्रशासनासाठी म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. इजिप्तचा राष्ट्रीय अध्यक्ष कैरो शहर प्रशासनासाठी गव्हर्नरची नियुक्ती करतो. ‘पॉप्युलर असेम्ब्ली’ हे प्रशासकीय कार्यकारी मंडळ गव्हर्नरच्या सल्ल्याने काम करते. या असेम्ब्लीचे सदस्य काही निर्वाचित, तर काही नियुक्त असतात.

कैरोत अरबी ही अधिकतर वापरली जाणारी भाषा आहे आणि थोडय़ा प्रमाणात इंग्रजी, फ्रेंच आणि इटालियन भाषांचा वापर होतो. प्राथमिक शिक्षण मोफत असलेल्या कैरोत साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के आहे. १९०८ मध्ये स्थापन झालेले कैरो विद्यापीठ ही कैरोतील प्रमुख शिक्षणसंस्था आहे तर दहाव्या शतकात स्थापन झालेले अल-अझर विद्यापीठ हे धार्मिक शिक्षणाचे सर्वात जुने केंद्र आहे.

कैरोचे अर्थकारण प्रामुख्याने औद्योगिक उत्पादन, सुवेझ कालव्यातून मिळणारे जकातीचे उत्पन्न आणि पर्यटन यांवर अवलंबून आहे. सर्वसाधारण कैरोवासीयांचे दरडोई उत्पन्न मात्र कमी असल्याने खर्चाची मिळवणी करण्यासाठी त्याला बरीच धडपड करावी लागते, काही वेळा दोन दोन नोकऱ्या कराव्या लागतात. शहरात आठ-नऊ वष्रे वयाचे बालकामगारही बरेच आढळतात.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

मोगरा

‘मोगरा फुलला’ हे गाणे कानावर पडताक्षणी मोगऱ्याचा सुगंध आल्यासारखे वाटते. स्वत:च्या सुगंधाने सर्वाना आकर्षति करणारी मोगरा ही वनस्पती जास्मिन या प्रकारातील आणि ओलिएसी वनस्पतीच्या कुळातील आहे. मोगरा या वनस्पतीचे मूळ पूर्व हिमालय, भूतान, पाकिस्तान या सर्व ठिकाणी दिसून येते, जास्मिनच्या फुलाने इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्रीय फुलाचा मान मिळवला आहे.

झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची ३० सेंमी – ५० सेंमी एवढीच असते. चकचकीत हिरव्या रंगाची पाने अंडाकृती आणि साधी असतात. पांढऱ्या रंगाच्या लहानशा मोगऱ्याच्या फुलाच्या पाकळ्यांची संख्या निश्चित सांगता येत नाही. फुलातील पाकळ्यांच्या संख्येवरून त्याचा प्रकार ठरवता येतो. मदनबाण, साधा मोगरा, बटमोगरा, असे वेगवेगळे प्रकार मोगऱ्यामध्ये दिसून येतात.

मोगऱ्याच्या फुलाच्या अर्कापासून सेंद्रिय तेल काढले जाते. या तेलात बेंझिल अ‍ॅसिटेट, बेंझिल अल्कोहोल, बेंझिल बेंझॉएट आणि इतर रासायनिक द्रव्ये असतात. मोगऱ्याच्या तेलाच्या सुगंधाने मनावरील ताण कमी होतो. मन प्रसन्न होते. शरीरातील संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत होते. चीनमध्ये मोगऱ्याच्या स्वादाचा चहा लोकप्रिय आहे.

हजारी मोगरा हा मोगऱ्यातील एक प्रकार आहे असे आपल्याला वाटते. खरे तर हजारी मोगऱ्याचा आणि ओलियासी कुळातील जास्मिन समबॅक या कुळाशी काही संबंध नाही.

हजारी मोगऱ्याचे शास्त्रीय नाव आहे Clerodendrum Chinese  किंवा Clerodendrum philippinium हे ‘वब्रेनसी’ कुलातील झुडूप आहे. त्याचा वास मोगऱ्यासारखा असतो. हजारी मोगऱ्याची फुले गुच्छात येतात, मात्र फुलाला हजार पाकळ्या नसतात. या मोगऱ्याची फुले रात्री फुलतात. हा मोगरा मूळचा भारतीय नाही. चीन, जपान या देशातील आहे.

जाई, जुई, चमेली, नेवाळी या सर्व पांढऱ्या रंगाची सुगंधी फुले याच कुळातील आहेत.

जाई, मोगऱ्याच्या कुळातील या वनस्पतीचे मूळ वायव्य हिमालयात आढळते. पाच पाकळ्यांच्या या सुवासिक फुलाची खालची बाजू जांभळट रंगाची असते. जाईच्या फुलापासून सुगंधी तेल/ द्रव्य मिळत असल्यामुळे या झाडाला व्यापारीदृष्टय़ा खूप महत्त्व आहे. भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात जाईची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते, ती मुख्यत: सुगंधी द्रव्य मिळवण्यासाठीच.

सुचेता भिडे (कर्जत)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org