ज्या सजीवांना स्वत:च्या शरीरात जटिल संरचना असलेले अन्नपदार्थाचे रेणू तयार करता येतात, अशा सजीवांना ‘स्वयंपोषी’ म्हटलं जातं. स्वयंपोषी सजीव हे दोन प्रकारांत मोडतात, प्रकाशसंश्लेषी सजीव आणि रसायनसंश्लेषी सजीव. उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात पृथ्वीवर निर्माण झालेले एकपेशीय सूक्ष्मजीव हे रसायनसंश्लेषी प्रकारचे होते. वनस्पती जशा अन्न तयार करण्यासाठी प्रकाश ऊर्जेचा वापर करतात, तसे हे रसायनसंश्लेषी प्रकारचे सजीव सल्फेट, अमोनिया, नायट्राईट यांसारख्या काही आयनांचं विघटन घडवून आणून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर कार्बन डायऑक्साइडपासून कबरेदकं निर्माण करण्यासाठी करत असत. नायट्रोसोमोनास आणि अ‍ॅझेटोबॅक्टर हे आताच्या सजीवसृष्टीमध्ये आढळणारे रसायनसंश्लेषी जिवाणू नायट्रोजन चक्राचा अविभाज्य भाग आहेत.
समुद्रतळाशी खोलवर जिथे सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही, तिथे रसायनसंश्लेषी सूक्ष्मजीव मोठय़ा प्रमाणावर आढळतात. उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात समुद्राच्या पाण्याचं तापमान जास्त होतं. या पाण्यात रसायनसंश्लेषी सूक्ष्मजीवांचं अस्तित्व होतं. आताही काही गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये अशाच प्रकारचे रसायनसंश्लेषी सूक्ष्मजीव आढळतात.
सजीवांच्या उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) मदतीने सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करणारे म्हणजेच प्रकाश ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करणारे एकपेशीय सजीव निर्माण झाले. या सजीवांपासून पुढे प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या वनस्पतीसृष्टीची निर्मिती झाली आणि आता पृथ्वीवरचं संपूर्ण जीवनच या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर अवलंबून आहे.
हरितद्रव्याच्या रेणूंमध्ये सौर ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. हे हरितद्रव्य वनस्पतींच्या पेशींमध्ये असणाऱ्या हरितलवकांमध्ये (क्लोरोप्लास्ट) असतं. म्हणूनच वनस्पतींना प्रकाशसंश्लेषण करणं शक्य होतं. या प्रक्रियेत हरितद्रव्यांमार्फत शोषलेल्या ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणूंची निर्मिती केली जाते.
या प्रक्रियेमध्ये प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर, पाण्याचं प्रकाश ऊर्जेमुळे होणारं विघटन आणि क्षपण प्रक्रियेने कार्बन डायऑक्साइडचं शर्करेत रूपांतर या तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो. हे रूपांतर घडून येत असताना चक्रीय पद्धतीने अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात आणि प्रत्येक टप्प्यांवरील अभिक्रियेत निरनिराळ्या विकरांचा समावेश असतो.
प्रिया लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा -त्वं चत्वारि वाक् पदानि
गणेश ओंकारस्वरूप चार वाक् कोणते? १) परा वाक् २) पश्यन्ति वाक् ३) मध्यमा वाक् आणि ४) वैखरी वाक्.
परमेश्वराच्या नावाच्या उच्चारामागील मानसप्रक्रिया इथे स्पष्ट होतात. मानवानं आपल्या वाणीला अर्थपूर्णता दिली. पशु-पक्षीदेखील बोलतात, पण त्यांच्या शब्दातून भूक, मिथुनोत्सुकता, भय असेच भाव व्यक्त होतात.
माणसाच्या शब्दातून मात्र निर्मिकाला, आद्यरूपाला हाक दिली जाते.
प्रत्यक्ष कानी पडणारा शब्द म्हणजे वैखरी वाक्. स्वरयंत्राच्या कंपनामधून व्यक्त होणारा शब्द. हे श्राव्य अथवा ऐकीव रूप.
परंतु, ‘वैखरी’वाटे व्यक्त होणाऱ्या या नादाला आपल्याच शरीरातून विविध भागातून प्रवास करावा लागतो. हा उच्चार ‘वायु’च्या कंपनामुळे ध्वनित होतो, पण वायु हे ऊर्जेचं मूळ रूप नव्हे. सुरुवात होते ती परम अथवा ‘अवकाश’मधून. अवकाश म्हणजे केवळ अनुभव. पूर्णपणे अव्यक्त अवस्था हा अनुभव जाणवणं ही मूळ सुरुवात. ‘परमा’चे शरीरांतर्गत स्थान म्हणजे मूल स्थान अथवा मूलाधार चक्र. शब्दाची सुरुवात या मूलाधार चक्रातील कंपनामुळे होते. इथे होणारी जाणीव केवळ तुरिया अवस्थेत अनुभवता येते. आज आपल्या लाडक्या दैवताचं, श्रीगणरायाचं घरोघरी आणि दारोदारी आगमन होत आहे. कुठे दीड दिवस, तर कोणाकडे गौरीमातेबरोबर सात तर काही ठिकाणी दहा दिवस बाप्पा आपल्यासमवेत असतील. यथाशक्ती, यथामती आपण त्यांची पूजाअर्चा करू आणि साश्रुनयनांनी पुढच्या वर्षी लवकर या असं आमंत्रण देऊन निरोप घेऊ. गणपतीचं हे साजिरं रूप मोठं मोहक. घणघणत्या आरत्या ते घालीन लोटांगण यांनी होणारी सांगता अत्यंत नादमय. हा लौकिक पातळीवरचा उत्सवी गणपती / नित्यपाठातील गणपती अथर्वशीर्षांत श्रीगणेशाचं रूप अलौकिक पातळीवरून केलेलं आहे. आपल्या जीवनातलं कर्ता, धर्ता आणि हर्ता असं त्याचं स्थान आहे. आपलं सर्वतोपरी रक्षण करण्याचं सामथ्र्य त्याच्या ठायी आहे असं म्हटलंय.
अथर्वशीर्षांत गणपतीचं स्वरूपवर्णन करताना मात्र लौकिकापलीकडची, चेतसरूपाची पातळी गाठली आहे. ते समजून घेतलं तर गणपतीच्या रूपाचा पारलौकिक अर्थ उमजतो.
भारतीय विचारपरंपरेमधील देव-दैव आणि वर्णवाद वगळला की, मानवी मनाच्या संरचनेचा, विचारप्रक्रियेचा अभ्यास स्तिमित करतो.
‘त्वं चत्वारि वाक्पदानि’ या चरणाचं विश्लेषण केलं की, मानवी मनाचा, चेतसाच्या स्वरूपाचा मनोज्ञ थांग लागतो. वायूचं पुढचं स्थान नाभि अथवा मणिपुर चक्र म्हणजे पश्यन्ति वाक्. इथे त्या जाणिवेला रंगरूप मिळतं. म्हणजे जाणीव फक्त जाणवत नसून दृश्यमान होते. म्हणून ही पाहणारी वाणी. हे रंगरूप म्हणजे अनुभवाला येणारा संदिग्ध आकार अजूनही धूसर. अजूनही चेतसाचं खरं स्वरूप दिसत नाही, दृग्गोचर नाही.
पुढची पायरी मध्यमा वाक्. आता वायुरूप ऊर्जा हृदयस्थानापर्यंत अथवा अनाहत चक्रापर्यंत पोहोचली आहे. मध्यमा वाक् कानाने श्राव्य नाही, पण इथे नि:शब्द संवाद होतो, शब्देविणु संवादु घडू लागतो. उच्चारल्याशिवाय हृदयीचे भाव दुसऱ्यापर्यंत पोहोचतात. आता ईशस्वरूपाची जाणीव स्पष्ट होते आहे. मनातली अंत:स्फूर्ती, प्रतिभा जागृत झाली आहे. हा वायू नंतर स्वरयंत्रापर्यंत पोहोचतो आणि गणेशस्वरूपी ओंकार नाद उमटतो. सर्वांपर्यंत पोहोचतो.
गणेश म्हणजे ओंकार. ओंकार म्हणजेच ईशाचे वाणी रूप. त्या वाणी रूपाला प्रणाम. बाप्पा मोरया.
डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com