जेरुसलेम शहराच्या जुन्या भागात असलेले चर्च ऑफ द होली सेपल्चर हे ठिकाण ख्रिश्चन धर्मीयांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे स्थान आहे. ‘रिसरेक्शन’ किंवा ‘चर्च ऑफ द अनास्टासिस’ याही नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला लॅटिनमध्ये ‘कॅलवरी’ तर ग्रीकमध्ये ‘गालगोथा’ असे नाव आहे. याच ठिकाणी येशू ख्रिस्ताला लाकडी क्रॉसवर मारले गेले आणि येशूची कबर रिकाम्या अवस्थेत येथेच मिळाली. या महत्त्वाच्या घटनांमुळे हे चर्च जगभरातील ख्रिश्चनांचे सर्वाधिक पवित्र मानले जाणारे तीर्थस्थान बनलेय. इ.स. २६ साली बायझन्टाइन सम्राट कॉन्स्टन्टाइनची आई हेलेनाने जेरुसलेमची यात्रा केली, त्या वेळी तिने येशूला ज्या लाकडी क्रॉसवर मारण्यात आले त्याचे अवशेष मिळवले. ६१४ साली पíशयन सन्याने या चर्च ऑफ द होली सेपल्चरचा काही भाग उद्ध्वस्त केला आणि क्रॉसचे अवशेष पळवून नेले. परंतु सम्राट हेरॅक्लिअसने त्याची किंमत मोजून ते अवशेष परत आणले. हेलेनाने ३३० साली या जागेवर पहिले चर्च बांधले. येशूचा देहान्त, क्रॉसवर ज्या एका लहान टेकडीवर झाला ती टेकडी कवटीच्या आकाराची असल्याने तिला समानार्थी ग्रीक शब्द ‘गोलगाथा’ असे नाव आहे. दहाव्या शतकाच्या अखेरीस अरब आक्रमकांनी या चर्चची जाळपोळ करून वरचा घुमट उद्ध्वस्त केला, प्रवेशाच्या जागेत एक मशीद बांधली. पुढे बायझन्टाइन सम्राट कॉन्स्टन्टाइन नववा याने या चर्चसाठी बरीच मोठी आíथक मदत करून ते परत पूर्ववत केले, तसेच चर्चचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे केले. पुढे १०९९ साली ख्रिश्चन क्रुसेडर्सनी जेरुसलेम ताब्यात घेऊन ११४९ साली हे चर्च नव्याने बांधले. येशू ख्रिस्ताला देहान्ताची शिक्षा सुनावल्यावर लाकडी क्रॉसचे ओझे घेऊन या गोलगाथापर्यंत जावे लागले. ख्रिश्चन भाविक लहान लहान लाकडी क्रॉस घेऊन या मार्गावरून जातात आणि सेपल्चर चर्चच्या प्रवेशापूर्वी एका ठिकाणी हे क्रॉस जमा करतात. एका ठरावीक शनिवारी, ‘होली सॅटर्डे’ला हे सर्व क्रॉस ‘होली फायर’मध्ये अग्नीला अर्पण केले जातात.

 

वृक्षांद्वारे सूक्ष्म- परिसर सुधार

कडक उन्हातून  वावरताना रस्त्याबाजूच्या झाडाखाली गारवा जाणवतो. त्याचप्रमाणे मदानात खेळून दमणाऱ्या खेळाडूंना झाडाखालच्या सावलीत दिलासा मिळतो हे सर्वाना माहीत आहे. असे आल्हाददायक वाटण्याचे कारण हे की, झाडांची पाने उन्हातील उष्णता शोषून घेऊन झाडाखालच्या हवेत गारवा आणतात. वड, पिचकारी, सोनमोहोर, भेंड, बदाम, सप्तपर्णी अशा अनेक झाडांखाली हा अनुभव आपण नेहमी घेतो.

मुंबई शहरात केल्या गेलेल्या एका पाहणीप्रमाणे उघडय़ा मदानातील झाडाखालील तापमान आजूबाजूच्या परिसरांतील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सें.ने कमी होते, त्याच वेळी झाडाखालील आद्र्रता २ टक्के जास्त होती. त्याच सुमाराला, म्हणजे दुपारी १ आणि ३ च्या दरम्यान (कडक उन्हाचा प्रहर) जेव्हा हवेचे उन्हातील तापमान ३५ अंश सें. होते, तेव्हा रस्त्याबाजूच्या भेंड, करंज या डेरेदार झाडांच्या सावलीत तापमान ३२ ते ३३ अंश सें. होते आणि एका इमारतीच्या सिमेंटच्या िभतीजवळ तापमान ३६ अंश सें. होते.

या पाहणीत झाडांमुळे तापमान कमी होते या सर्वसामान्य समजुतीला दुजोरा मिळाला. किती प्रमाणात गारवा निर्माण होतो हे झाडांच्या पर्णसंभाराप्रमाणे ठरते हेही कळले. अशा माहितीचा प्रत्यक्षात काय उपयोग होऊ शकतो यावर चर्चा झाली. सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि इमारती यांच्यामुळे शहरात उष्णतेची बेटे कशी तयार होतात हे कळून चुकले. पुणे शहरात केलेल्या ‘उष्णतेची बेटे’ या प्रकल्पात मिळालेल्या माहितीशी तुलना केल्यावर लक्षात आले की, कोरडय़ा हवेच्या ठिकाणी झाडांमुळे होणारे तापमानातील फरक जास्त मोठे असू शकतात.

अमेरिकेतील शिकागो शहरात डॉ. रौनत्री आणि सहकाऱ्यांनी अशा तऱ्हेच्या पाहणीची पुढची पायरी गाठली. बठय़ा घरांचे दोन वर्ग केले – १. घरावर मोठय़ा वृक्षांची सावली असलेली आणि २. सावली नसलेली घरे. दोन्ही वर्गातील घरांमधले तापमान दिवसात चार वेळा मोजले. दोहोंमधील तापमानातील फरक विचारात घेऊन पहिल्या वर्गातील घरांचे मालक वातानुकूलनाच्या बाबतीत किती डॉलरचा खर्च वाचवतात याचा हिशेब मांडला. शहरात वृक्षसंवर्धनासाठी यापेक्षा जास्त उत्तेजनार्ह कारण असू शकेल का?

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org