सुती कापडाच्या बाबतीत एकेरी सूत ताण्यासाठी वापरतात तेव्हा मागावर विणाई चालू असताना उभ्या धाग्यावर पडणारा ताण सहन करण्यासाठी त्या सुताला कांजी केली जाते. पूर्वी नसíगक पदार्थ वापरून कांजी केली जायची तर आता सुधारित आणि सिंथेटिक पदार्थाचा वापर कांजी करताना केला जातो. हे सर्व पदार्थ ताण्याच्या सुताला चिकटून बसलेले असतात. कापडावर पुढील प्रक्रिया करताना कांजी काढून टाकणे महत्त्वाचे असते. त्यामुळे नंतरच्या प्रक्रिया सुलभ आणि परिणामकारक होतात.

कांजी काढण्याची प्रक्रिया तीन पद्धतीने केली जाते. पारंपरिक पद्धतीत सुती कापड मीठ घातलेल्या गरम पाण्यात २४ तास बुडवून ठेवले जाते. नंतर हे कापड धुऊन घेतात. पण ही वेळखाऊ पद्धत असल्यामुळे याचा वापर आता कोणीही करत नाही. दुसरी पद्धत आम्लाचा वापर करून डिसायझिंग करणे. या पद्धतीत तीव्र आम्लाचे, मुख्यत: हायड्रोक्लोरिक आम्ल, ०.५ ते ०.८ टक्के तीव्रतेचे द्रावण वापरले जाते. जर ही तीव्रता वाढली तर कापड कमजोर होऊन फाटण्याचा धोका असतो. कापड रंगवले जाणार असेल तेव्हा ही प्रक्रिया वापरतात. आता एन्झाइम (विकर) वापरून कांजी काढण्याची प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करताना विकर, मीठ आणि जलशोषक पदार्थ घालून द्रावण तयार केले जाते. मीठ आणि जलशोषक पदार्थामुळे प्रक्रिया लवकर व्हायला मदत होते. कापड चटकन ओले झाल्यामुळे विकराची कांजीकरिता वापरलेली रसायने किंवा पदार्थ यांच्याबरोबर प्रक्रिया घडते. त्याद्वारे कांजीकरता वापरलेले पदार्थ कापडापासून अलग होतात. ही पद्धत कापडासाठीच नव्हे तर मानवासाठीही सुरक्षित पद्धत आहे. शिवाय ती पर्यावरणस्नेही पद्धतसुद्धा आहे. म्हणूनच याचा वापर आता प्राधान्याने केला जातो.
ही प्रक्रिया करताना द्रावणाचा सामू (पी.एच.) ५ ते ६ इतका ठेवावा लागतो. त्यासाठी अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडचा वापर करतात. तसेच द्रावणाचे तापमान ६० डिग्री ते ८० डिग्री सेल्सियस ठेवावे लागते. जिगर मशीनमध्ये केल्यास दोन ते तीन तासांत ही प्रक्रिया पूर्ण होते. पण पॅड बॅच पद्धत वापरल्यास १२ तास एवढा वेळ लागतो. जिगरची पद्धत महाग पडते, त्यामुळे पॅड बॅच पद्धतीचा वापर जास्त होतो. नंतर हे कापड साध्या पाण्यात धुऊन घेतले जाते.