बायोडिझेल आणि पेट्रोडिझेल हे दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत. खनिज तेलापासून मिळवलेल्या डिझेलला पेट्रोडिझेल म्हणतात, तर बायोडिझेल हे वनस्पती किंवा प्राण्यांमधील स्निग्ध पदार्थापासून तयार करता येते. बायोडिझेल बनविण्यासाठी जे तेल वापरतात ते सोयाबीन, रेपसीड, जट्रोपा, पाम, जवस, सूर्यफूल, नारळ, करंजा, मका, शेंगदाणे, सरकी, मोहरी इत्यादींपासून मिळवतात. अगदी तळणाचे तेलसुद्धा चालते. याशिवाय प्राणी, अगदी गटारात जगणारे जीवजंतू, शेवाळ वगरेमध्ये असलेल्या स्निग्धांशापासून पण बायोडिझेल बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 या तेलापासून डिझेल मिळवण्यासाठी त्यावर बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. या तेलात ट्रायग्लिसराइड हे रसायन असते. ट्रायग्लिसराइड हा एक ग्लिसरॉलचा रेणू व तीन मेदाम्लांचे रेणू याचा संयोग होऊन बनलेले असते. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या मेदाम्लात साधारणत: १६-१८ कार्बनचे अणू असलेल्या साखळ्या असतात. ट्रायग्लिसराइडमधली तीन मेदाम्लेपण सारखी नसतात. यातली काही मेदाम्ले असंपृक्त असतात व त्यामुळे त्यात हायड्रोजनचे प्रमाण कमी असते. पेट्रोडिझेलमध्ये संपृक्त मेदाम्ले असतात. त्यात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे त्याची प्रत चांगली असते. शिवाय त्यामुळे त्यांच्या गुणधर्मात थोडा फरक असतो. बायोडिझेलमध्ये सल्फर कमी असते व प्राणवायू जास्त असतो. बायोडिझेलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते. अल्कली वापरून ट्रायग्लिसराइडचे विघटन करतात. त्यामधून ग्लिसरॉल हा जास्त घनता असलेला पदार्थ वेगळा करतात व कमी घनता असलेल्या मेदाम्लाचे मिथेनॉल याबरोबर संयोग करून बायोडिझेल बनवितात.
वनस्पती आणि प्राणी यांमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ आढळतात. प्राण्यात कोलेस्टेरॉल तर वनस्पतीत मेणासारखे पदार्थ असतात. निरनिराळ्या तेलातील वेगवेगळ्या स्निग्ध पदार्थामुळे व मेदाम्लांमुळे बायोडिझेलची प्रत थोडी वेगळी असते.
१९०० मध्ये रुडोल्फ डिझेल याने डिझेल इंजिन शेंगदाण्याच्या तेलावर चालवून पाहिले होते. आता परत वनस्पती तेलावर इंजिन चालवायची वेळ आली आहे!

मनमोराचा पिसारा: आयन रॅण्ड – तेजस्वी व्यक्तित्ववाद
आयन रॅण्ड आयकॉनिक होती, अख्ख्या पिढीची. त्यांच्या स्वप्नांची नव्हे, विचारांची.. असं म्हणून लेखाच्या सुरुवातीला गोषवारा देण्यासारखं आहे. आयन रॅण्डबद्दल असं म्हणणं अक्षरश: खरंय, असं वाटतं.
आताची १८ ते २५ मधली पिढी आयनशी कनेक्ट करते का? मात्र याच पिढीचा ती आयकॉन होऊ शकली असती; संपूर्ण व्यक्तित्ववादी, झळझळीत विचारांची, लख्ख संकल्पना मांडणारी. एकेकटय़ा माणसाची कर्तबगारी हीच परिवर्तनाची तरफ असते यावर ठाम विश्वास ठेवणारी आयन रॅण्ड काळाच्या ओघात हरवली की काय असं वाटतं!
नवी पिढी बिल गेटस्, स्टीव्ह जॉब्ज, झुकरमन इत्यादी ‘ई’ व्यक्तिमत्त्वांना आपला आयकॉन मानते; परंतु ही सगळी मंडळी अमेरिकेतल्या पन्नाशी-साठीच्या दशकातल्या बेबी बूमर्सची मुलं आहेत. बेबी बूमर्सनं साकारलेल्या व्यक्तित्ववादी विचारसरणीचे ते प्रॉडक्ट आहेत.
आयन रॅण्ड वाचणं ही नशा होती. विशेषत: डावीकडे झुकणाऱ्या विचारवंतांचे लेख, चरित्रं वाचल्यावर मग आयन रॅण्ड वाचायला लागलं की, डोकं चक्रावून जायचं. आयन रॅण्ड मूळ रशियन. तिथल्या बूज्र्वा कुटुंबातली चुणचुणीत मुलगी. बोल्शेविक क्रांत्योत्तर काळातल्या राजकीय अराजकाच्या काळात तिनं तारुण्यात पदार्पण केलं. तिनं तेव्हाचा उद्ध्वस्त समाज पाहिला. साम्यवादाच्या नावाखाली होणारी सामाजिक उलथापालथ पाहिली आणि त्याचे चटके तिला बसले.
तारुण्यसुलभ जाणिवेतले प्रणयाचे रंग, तात्त्विक विचारानं भारलं जाणं, आपल्या तत्त्वनिष्ठेपायी येणारा भोगवटा आणि फरफट तिनं जवळून पाहिली. व्यक्तीच्या उपजत बुद्धिमत्ता, जिगर आणि स्वप्नांचा चुराडा होताना अनुभवला. पुढे रशियातून निसटून अमेरिकेत पोहोचल्यावर तिने सात र्वष खपून ‘वी, द लिव्हिंग’ नावाची कादंबरी लिहिली. किरा, अ‍ॅण्ड्री, लिओ यांच्या प्रेमत्रिकोणाच्या ठरावीक त्रराशिकाला धरून आयननं तीन प्रखर व्यक्तिरेखा मांडल्या.
जगण्याकरिता करावी लागणारी तडजोड, लाचारी आणि तात्त्विक शरणागती याला किरा कंटाळते. जगण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ आपल्या जिवात जीव टिकविणे, माणूस म्हणून जगणं असं नाही; तर व्यक्ती म्हणून टिकून राहणं, हे महत्त्वाचं असं मानून पळून जाणारी किरा जखडून टाकणारी पाशवी सामाजिकता आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची चाड बाळगणारं जग (अमेरिका) यांच्या सीमेवर अखेर मरते.
आयन रॅण्डनं ही स्वानुभवावर बेतलेली कादंबरी लिहिली. सुरुवातीला जेमतेम म्हणत म्हणत पुढे कादंबरी लोकप्रिय ठरली. अनेकांनी प्रचारकी म्हणून कादंबरीची संभावनाही केली. पुढे आयन रॅण्डनं ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ नावाची भली थोरली कादंबरी लिहिली. त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. ‘हू इज जॉन गाल्ट?’ असा प्रश्न या कादंबरीतील पात्रं एकमेकांना विचारतात. ‘जणू काही काय होणारे ठाऊक नाही! काही तरी होईल, व्हायला हवं..’ अशा अर्थाचा हा प्रश्न त्या वेळी आमच्या तोंडी असायचा! (अलीकडे ‘सिंघम’मध्ये ‘आता माझी सटकली!’ असं अजय देवगण म्हणतो, त्या स्टाइलचं हे वाक्य. अर्थात देवगणच्या वाक्यात आक्रमकपणा आहे.) रॅण्डने या प्रश्नाद्वारे समाजापुढे तात्त्विक कूट प्रश्न टाकला. त्याआधीची आयन रॅण्डची ‘द फाऊण्टनहेड’ ही कादंबरी सर्वात गाजली. ती गाजली कारण त्यातला आर्किटेक्ट इतर कादंबऱ्यांतील पात्रांप्रमाणे फिलॉसॉफी झाडत नाही, तो आयन रॅण्डचं ‘ऑब्जेक्टिविझम’ हे तत्त्वज्ञान जगतो. रोअर्क म्हणजे स्वतंत्र वृत्तीने स्वत:च्या सर्जनशीलतेतही कणभरही तडजोड न करणारा तेजस्वी हीरो. जगाशी भांडणारा, स्वत:च्या तर्कनिष्ठतेला ‘परम’ मानणारा म्हणजे स्वार्थी या अर्थानं नव्हे; तर रॅशनल विचार, बुद्धिगत ज्ञान हेच माणसाच्या जीवनाचं खरं मर्म आहेत असा ठाम विश्वास बाळगणारा हा नायक. मग त्यात लोकप्रियता, समाजमान्यता, अभिजनवाद याला स्थान नाही, असं ‘द फाऊण्टनहेड’ ही कादंबरी म्हणते.
समाजानं एकत्र येऊन केलेले धर्म, रीतिरिवाज आणि संकेत माणसातल्या व्यक्तिमत्त्वाची गळचेपी करतात, यावर आयन रॅण्डचा पूर्ण विश्वास होता. जे प्रत्यक्ष दिसतं, बुद्धीला अवगत होतं, तेवढंच सत्य, बाकी सर्व बाष्कळ कल्पना, असं तिचं म्हणणं होतं. हा भांडवलशाहीचा पुरस्कार नव्हता, तर मुक्त-अर्निबध अर्थव्यवस्था (लैझ फेअर) चा उद्घोष होता!  
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
* या सदरातील शनिवार, १४ जूनच्या मजकुरासोबत चित्र आणि शीर्षक ‘अ‍ॅस्टेरिक्स’ऐवजी ‘टिनटिन’चे छापले गेले असून ही संपादकीय चूक आहे.  
* ‘हीलिंग पॉवर ऑफ माइंड- सिम्पल मेडिटेशन एग्झरसायझेस फॉय् हेल्थ, वेलबीइंग अँड एन्लायटनमेंट’ (ले. टुल्कु थोंडुप) या पुस्तकाबद्दल अनेक वाचकांना हवी असलेली माहिती  अशी: प्रकाशक : शम्बाला (बोस्टन व लंडन) आयएसबीएन क्रमांक : ९७८१५७०६२३३०१ (ईबुक उपलब्ध)

प्रबोधन पर्व: महाराष्ट्रीय समाजाची वैगुण्ये
‘‘लीनता व स्वाभिमानशून्यता आम्ही एकच समजतो, असा भास आमच्या वर्तनावरून अनेक वेळा होतो. आमच्या स्वभावाचे सर्वात हीन व अनिष्ट प्रदर्शन म्हणजे आमच्या अनेक वृत्तपत्रीय लिखाणात पदोपदी, अनेक र्वष दिसून येत असलेली हीन अभिरुची व आततायीपणा. स्वाभिमान-शून्यता जेवढा दुर्गुण तेवढाच दुसऱ्याशी वागताना, त्याच्याबद्दल बोलताना योग्य मर्यादा न पाळणे हा आहे; आणि रगेलपणा अगर कणखरपणा यांचे ‘मारकेपणा’ हे खास इष्ट स्वरूप नाही. आमची ही वैशिष्टय़े इतिहासजन्य असतील. तसे असल्यास आमच्या इतिहासाचा व तो नवीन पिढीस शिकविण्याच्या पद्धतीचा आम्हांस फेर-अभ्यास केला पाहिजे. जपानी लोकांचा स्वाभिमान व कणखरपणा जगप्रसिद्ध आहे; असे असूनही त्यांचा शिष्टाचार, त्यांच्या वर्तनातील अदब, त्यांच्या हरघडीच्या वागण्यात प्रतीत होत असलेले सौजन्य ही सर्व परस्थांना मोहित करतात.. दक्षिण आफ्रिकेच्या सत्याग्रहात म. गांधींनी जगाच्या प्रत्ययास आणलेले खरे लोकोत्तर गुण म्हणजे त्यांचे धैर्य व कणखरपणा.’’
‘महाराष्ट्र जीवन – परंपरा, प्रगति, समस्या’ (संपादक-गं. बा. सरदार, १९६०) या ग्रंथातील लेखात ध. रा. गाडगीळ महाराष्ट्रीय समाजाची वैगुण्ये सांगताना लिहितात-
‘‘आमचा अहंकार व रगेलपणा, एकमेकांशी तुसडे वर्तन, इतरांबद्दलची तुच्छतादर्शक वृत्ती, सामूहिक कारभारात पदोपदी अडणारा भांडखोरपणा अशा स्वरूपात आज दिसून येतात. या सर्वानुळे आमची फार हानी होत आहे. यांमुळे समाजातील सर्व अंतर्गत कारभारात निष्कारण अडथळे उत्पन्न होतात; आणि इतर प्रदेशांतील लोक यांमुळेच, इच्छा असूनही, आम्हांस चाहू शकत नाहीत. याबाबत आमच्या समाजाच्या धुरीणांनी अंतर्मुख होण्याची फार मोठी अवश्यकता आज भासत आहे. असे झाले व आमची बुद्धी, कणखरपणा व त्यागाची तयारी यांच्या जोडीस आम्ही खरी लीनता, सहिष्णुता व सौजन्य संपादू शकलो, थोडक्यात ‘सात्त्विक’ ही पदवी पूर्ववत प्राप्त करून घेतली, तर भारताच्या व जगाच्या कारभारात मानाचे व मोलाचे स्थान आम्हांस साहजिकच मिळेल.’’