विविध प्रकारच्या जीवाणूंमुळे शेळ्या रोगांना बळी पडतात. पहिल्या पावसानंतर नवीन उगवलेला चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आतडय़ामध्ये याचे जीवाणू मोठय़ा प्रमाणात वाढतात व शेळ्यांना आंत्रविषार रोग होतो. याशिवाय जीवाणूंमुळे ब्रुसेलोसीस रोग झाल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात जीवाणूंमुळे घटसर्प होण्याची शक्यता जास्त असते. जोन्स या रोगात शेळ्या अशक्त होऊन कुठल्याही उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात. अस्वच्छता, कुपोषण, गर्दीसारखे घटक या रोगासाठी कारण ठरतात. सांसíगक फुफ्फूसदाह एक वर्ष याखालील शेळ्यांना जास्त प्रमाणात होतो. हवेमार्फत पसरणाऱ्या या रोगाचा कळपामध्ये शिरकाव झाल्यास शंभर टक्के कळप रोगग्रस्त होतो.
 विषाणूंमुळेही शेळ्यांना विविध आजार होतात. कॉन्टॅजियस एकथायमा हा शेळ्यांच्या तोंडाचा विषाणूजन्य आजार आहे. या रोगात शेळीच्या दाढीच्या खाली फोड येऊन ते फुटतात. सांसर्गिक आंत्रदाह हा रोग बहुतांशी करडांना होतो. गाभण शेळ्यांमध्ये यामुळे गर्भपात होतो. निलजिव्हा या रोगात शेळ्यांच्या तोंडाच्या आतील भाग व जीभ निळसर झालेली दिसते. हवेमार्फत मुख्यत: लाळ्याखुरकत रोग होतो. यात शेळ्यांचे खाणेपिणे बंद पडते. एकपेशीय परोपजीवी (प्रोटोझोआ) यांचा शेळ्यांच्या आतडय़ावर विपरीत परिणाम होतो. हा रोग कळपामधील इतर शेळ्यांमध्ये सहज पसरतो.
हगवण या आजारामुळे करडांच्या प्रतीकारक शक्तीवर, वाढीवर दुष्परिणाम होतो. जास्त दूध प्यायल्यामुळे होणारे अपचन, माती, लेंडय़ा खाणे, पिण्याचे पाणी अस्वच्छ असणे, जंतांचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य खाद्य अशा काही कारणांमुळे हा आजार होतो.
 शेळ्या वर्षांनुवष्रे एकाच चराऊ कुरणावर चरत असल्यास, तळे, डबके अशा साचलेल्या पाण्याच्या ठिकाणचे हिरवे गवत खात असल्यास व तेथील दूषित पाणी पीत असल्यास त्यांना जंतबाधा होते. यामुळे करडांची योग्य वाढ होत नाही. एकदा जंतबाधा झाली की त्यांचा प्रतिबंध करणे कठीण असते.
 गोठय़ाची स्वच्छता राखल्यास व शेळ्यांना सकस खाद्य मिळाल्यास बहुतेक आजारांचा प्रतिबंध करता येतो.  

वॉर अँड पीस   मूत्रपिंडाचा कर्करोग : भाग ७
बदलत्या काळात  जो तो ‘मला जास्त सुख कसे मिळेल; ते सुख, ती चैन वाढती कशी असेल या ‘रेसमध्ये’ गुंतलेला आहे. या अतिसुखाच्या हवेमुळे सगळी जीवनशैली बदलली आहे. एक काळ ‘जगण्याकरिता माणसे खायची; आता खाण्याकरिता जगत आहेत.’ एक काळ घरच्या जेवणाला प्राधान्य होते. आता याउलट बाहेरचे खाणे, आंबवलेले, शिळे अन्न, बेकरी पाव, मेवामिठाई, मांसाहार, चटकमटक खाणे, विविध व्यसने यामुळे नवनवीन रोगांचे आक्रमण मानवी शरीरावर वाढते आहे.
अशा सगळयांचा दुष्परिणाम म्हणून आपल्या नकळत मूत्रपिंडावर परिणाम होतो. पुरुषांच्या पौरुषग्रंथीवर नंतर आघात होऊन पौरुषग्रंथी वाढू लागते. अशा अवस्थेत मल, मूत्र व वायू यांचा वेग अडविल्यामुळे ‘रेसिडय़ूएल युरिन’ किंवा तुंबून राहणाऱ्या मूत्राच्या प्रमाणामध्ये वाढ होते. पुरुषांच्या सोनोग्राफीमध्ये हे कळते. एक काळ अशा वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीचे शस्त्रकर्म खूप दुष्कर होते. निम्मेअधिक प्रोस्टेट ग्रंथीग्रस्त रुग्णांचा रोग बळावून प्रोस्टेट कॅन्सर होत असे. या शस्त्रकर्मामध्ये निम्मे-अधिक रुग्ण दगावत असत. विशेषत: प्रोस्टेटग्रंथी वाढलेला रुग्ण मांसाहार करत असेल तर त्याला प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो. हे संबंधितांनी लक्षात ठेवण्याची नितांत गरज आहे.
प्रोस्टेटग्रंथी वाढावयास सुरुवात झाली की वारंवार लघवीला, विशेषत: रात्रौ उठावे लागते. त्याकरिता अशा रुग्णाने सायंकाळी सूर्यास्तापूर्वी व कमी जेवावे. जेवणानंतर फिरून यावे. वर सांगितलेली कुपथ्ये टाळावी. गोक्षुरादिगुग्गुळ, बारा गोळ्या, अम्लपित्तवटी तीन गोळ्या, रसायनचूर्ण एक चमचा, गोक्षुरक्वाथ चार चमचे अशी औषधयोजना दोन वेळा घ्यावी. पांडुता असल्यास चंद्रप्रभा जादा औषध घ्यावे. रात्रौ गंधर्वहरितकीचूर्ण घ्यावे. शरीरातील मूत्रपिंड या अवयवाची कार्यक्षमता अधिक चांगली करण्याकरिता २० ग्रॅम गोखरू, चार कप पाणी अटवून एक कप काढा उतरवून प्यावा. प्रोस्टेट कॅन्सरवर निश्चयाने मात करता येते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  – मोठय़ा लोकांचे अज्ञान
‘‘मी असे म्हणतो की, आजच काय, पण कधीही गोऱ्या आणि काळ्या वंशाच्या लोकांना सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ा एकच न्याय द्यावा, अशा मताचा मी नाही आणि नव्हतो. त्यांना (काळ्यांना) मतदानाचा हक्क द्यावा, न्यायालयात त्यांची पंच (ज्युरी) म्हणून नेमणूक करावी किंवा त्यांना प्रशासनात अधिकाऱ्याच्या जागा द्याव्यात किंवा त्यांच्याशी आंतर्वर्णीय विवाह करावेत, अशा मताचा मी नाही. मी असेही म्हणेन की, गोऱ्या आणि काळ्या लोकांमधले असलेले शारीरिक फरक असे आहेत की, त्यांना एकत्र समान हक्काचे नागरी जीवन जगता येईल, असे मला वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर ती दोघे भले का एकत्र जगेनात, त्यांच्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे भाग करावे लागतील आणि श्रेष्ठत्वाचा हक्क गोऱ्यांनाच द्यावा लागेल, असे माझेही इतरांसारखेच मत आहे.’’ हे उद्गार आहेत अ‍ॅब्रहॅम लिंकनचे, ज्याने अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट केली. हा मोठा धार्मिक होता. त्याचे अ‍ॅब्रहॅम  हे नावही धर्माचेच द्योतक आहे. कारण मध्यपूर्वेत जन्माला आलेल्या यहुदी (ज्यू), इसाई (ख्रिश्चन) आणि इस्लाम धर्माच्या सामायिक असलेल्या जुन्या कराराची (ओल्ड टेस्टामेन्ट) या अ‍ॅब्रहॅम नामक उद्गात्याच्या शिकवणीतून सुरुवात होते.
यहुदी (ज्यू) लोकांचा हा नेता. त्यांना इजिप्तमधून मोठय़ा संख्येने परागंदा करण्यात आले. ही मंडळी एकाच वंशाची, वर्णाची किंवा एका साम्य असलेल्या जनवर्गातली. त्यांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नाही तेव्हा याहवेह या देवावरच्या श्रद्धेला बिलगून त्यांनी इस्राएल किंवा पॅलेस्टाइन या प्रदेशांपर्यंत मजल मारली. या मजलीला एक्सॉडस  म्हणतात आणि जुन्या करारात त्या नावाचे एक प्रदीर्घ प्रकरण आहे. त्यात इतर टोळ्यांच्या वर्णाच्या, वर्गाच्या, वंशाच्या देवाबद्दल पुढील उतारा आहे- ‘तुम्ही दुसऱ्यांच्या कोठल्याही देवावर विश्वास ठेवू नये. आपला देव मत्सरी आहे. किंबहुना त्याचे दुसरे नाव मत्सर असेच आहे. त्या इतरांच्या देवांच्या पूजेसाठीचे चौथरे, त्यांच्या मूर्ती आणि त्या मूर्तीची गर्भगृहे जमीनदोस्त करणे हे तुमचे आद्यकर्तव्य आहे.’ पुढे याच ज्यूंमधल्या पुजाऱ्यांविरुद्ध येशूने बंड पुकारले आणि ख्रिश्चन धर्म जन्मला. त्यानंतर त्याच मालिकेत इस्लामचा जन्म झाला. फरक एवढाच की, येशू देवाचा मुलगा होता आणि महमद देवाचा प्रेषित होता.
वरच्या ओळी रिचर्ड डॉकिन्सच्या ‘देव नावाचा भ्रम’ या पुस्तकावर आधारित आहेत.
 तो विचारतो ‘एक्सॉडस’मधली शिकवण अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांनी बुद्धाच्या उंचच्या उंच मूर्त्यां पाडून हुबेहूब अमलात आणली. त्यात त्यांचे काय चुकले? शेवटी ते धर्मच पाळत होते! चुकले असे की, त्यांनी धर्माकडे नव्या दृष्टीने बघितले नाही.’ त्याबद्दल उद्या.

रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  २७ सप्टेंबर
१८९९> सामाजिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्याच्या इतिहासावर कादंबरी लेखन करणारे विठ्ठल वामन हडप यांचा जन्म. ‘झाकली मूठ’ ही त्यांची पहिली कादंबरी. ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ते गाजले.
१९०६>नाटककार, वृत्तपत्रकार, लघुकथाकार सुंदरराव भुजंगराव मानकर यांचा जन्म. काचेचे घर, न्याय, दारूबंदी, नवे जग  ही नाटके त्यांनी लिहिली.  
१९०७> संगीतज्ज्ञ वामन हरी देशपांडे यांचा जन्म. ‘महाराष्ट्राचे संगीतातील कार्य’ या पुस्तकातून अनेक संगीतज्ज्ञांचा आढावा त्यांनी घेतला.
१९२९>  निबंधकार, वृत्तपत्रकार, लेखक काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांचे निधन. ‘विष्णुसहस्रनाम’ या लेखात भक्तीच्या प्रांतात बुद्धिवादाला जागा नसते या पाच शब्दांसाठी २७ ओळींचे काव्य रचले. त्यांचे साहित्यविषयक निवडक लेख ‘साहित्य संग्रहा’च्या तीन भागांत संग्रहित केलेत. याशिवाय एका खडी फोडणाऱ्याची गोष्ट, आम्रवृक्ष, एक कारखाना या कथा, तर गोविंदाची गोष्ट, विंध्याचल या कादंबऱ्या तसेच ९ नाटके, काव्य मिळून त्यांची वीस पुस्तके प्रकाशित.
१९८७>  कथा-कादंबरीकार डॉ. भीमराव बळवंत कुलकर्णी यांचे निधन.
संजय वझरेकर