नायलॉन तंतू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बहुवारिकाचा पायाभूत रेणू हा मूळ रसायनांपासून प्रयोगशाळेतच तयार केला जातो आणि नंतर या रेणूपासून बहुवारिक तयार केले जाते. या बहुवारिकाचे पुढे तंतूमध्ये रूपांतर केले जाते.
मूळ रसायने वापरून प्रयोगशाळेतच एखादा रेणू किंवा पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेस संश्लेषण (सिंथेसिस) असे संबोधले जाते आणि म्हणूनच नायलॉनसारख्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात येणाऱ्या तंतूंना संश्लेषित तंतू (सिंथेटिक फायबर) असे नाव पडले.
नायलॉनच्या यशानंतर शास्त्रज्ञांना अधिकच हुरूप आला आणि त्यानंतरच्या काळात पॉलिस्टर, अ‍ॅक्रिलिक, पॉलिप्रॉपिलीन, पॉलियुरेथिन असे अनेक तंतू विकसित झाले आणि खूप लोकप्रिय झाले. संश्लेषित तंतूंचे गुणधर्म नसíगक तंतूंच्या बरोबरीचेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा अनेक बाबतीत सरस असतात. त्यामुळे हे तंतू अतिशय लोकप्रिय झाले. या तंतूंच्या, उच्च ताकद, उच्च स्थितिस्थापकता, चांगली लंबन क्षमता यांसारख्या गुणधर्मामुळे हे तंतू वस्त्रप्रावरणांसाठी लोकप्रिय तर झालेच, पण उद्योग, वैद्यकीय, क्रीडा, कृषी, स्थापत्य यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योगांमध्ये तयार होणाऱ्या कापडाचा/ सुताचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला. संश्लेषित तंतूंमुळे वस्त्रोद्योगासाठी अनेक दालने खुली झाली. आज संश्लेषित तंतू इतके लोकप्रिय झाले आहेत की जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण तंतूंपकी मानवनिर्मित तंतूंचे प्रमाण ६० ते ६५% इतके आहे आणि नसíगक तंतूंचे प्रमाण ३५ ते ४०% इतके कमी झाले आहे. संश्लेषित तंतूंमुळे खऱ्या अर्थाने नसíगक तंतूंना पर्याय मिळाला आहे.
मानवनिर्मित तंतूंनी नसíगक तंतूंना पर्याय निर्माण केला हे सत्य असले तरी नसíगक तंतूंचा वापर पूर्णपणे थांबला नाही. नसíगक तंतूचे आणि मानवनिर्मित तंतूचे प्रमाणबद्ध मिश्रण करून दोन्ही प्रकारच्या तंतूच्या गुणधर्माचा फायदा घेण्याचे धोरण वस्त्रोद्योगात अवलंबले गेले. याचा सर्वात जास्त फायदा ग्राहकाला झाला. वापरायला अनुकूल, धुवायला सोपे, वाळायला अवधी कमी, इस्त्रीची गरज मर्यादित इत्यादी अंगांनी हा ग्राहकाचा फायदा वर्णन करता येईल.

संस्थानांची बखर: कपूरथाळा राज्य स्थापना
सध्याच्या पंजाब राज्याच्या उत्तरेकडील कपूरथाळा हे ‘शीख राज्यसंघा’तील महत्त्वाचे संस्थान होते. लाहोरजवळच्या अहलु येथील जस्सासिंगचे वडील त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी निधन पावल्यामुळे शिखांचे दहावे गुरू गोिवदसिंग यांची विधवा पत्नी मातासुंदरीने जस्साचे पालनपोषण केले. पुढे नवाब कपूरसिंग याने त्याचे पालकत्व स्वीकारले. पुढे सन्याचा एक गटप्रमुख झालेल्या जस्साने खालसा संघाला लाहोर मिळवून देण्याची मोठी कामगिरी केल्यामुळे खालसा संघाने त्याला सुलतान-उल-अवाम हा किताब दिला.
 १७५३ साली कपूरसिंगाने जस्साला जरी आपले वारस नेमले होते तरी जस्साने १७७२ साली कपूरसिंगाच्या नावाने कपूरथाळा हे राज्य स्थापन केले. जस्सासिंग हा अहलुवालिया किंवा वालिया हे आडनाव लावणारी पहिली व्यक्ती. जस्साचे पुढील वारस महाराजा रणजीतसिंगच्या उदयापर्यंत प्रबळ होते. कपूरथाळा राजघराण्यातले लोक व बहुसंख्य नागरिकदेखील लष्करी कौशल्यामुळे प्रसिद्ध होते.
जस्सासिंगनंतर त्याच्या वारसांपकी बाघसिंग, फतेहसिंग, निहालसिंग, रणधीरसिंग, जगतजीतसिंग या शासकांनी कपूरथाळा संस्थानाला उत्तम प्रशासन देऊन एक वैभवसंपन्न राज्य म्हणून प्रसिद्ध केले. राजा फतेहसिंग याने १८०६ साली ईस्ट इंडिया कंपनीशी संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखणे सुरू केले. १५५० चौ.कि.मी. राज्य क्षेत्र असलेल्या कपूरथाळा संस्थानात १६७ खेडी आणि दोन शहरे अंतर्भूत होती. १९०१च्या जनगणनेनुसार संस्थानाची लोकसंख्या ३,१५,००० होती, तर महसुली उत्पन्न वीस लाख रुपयांचे होते. ब्रिटिशांशी चांगले संबंध व उत्तम प्रशासन यामुळे संस्थानाला १३ तोफ सलामी, तर शासकाला व्यक्तिश: १५ तोफांच्या सलामींचा बहुमान मिळाला होता. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, सनिकी शिक्षण, संगीताच्या शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कपूरथाळा शासकांनी औद्योगिक विकासातही लक्ष घातले. परंतु काही महाराजांचे बडेजाव, रंगेल-विलासी खासगी जीवन,  याबाबतही कपूरथाळा प्रसिद्ध आहे.
सुनीत पोतनीस –   sunitpotnis@rediffmail.com