डय़ू पॉन्ट कंपनीने १९५१ मध्ये हा पॉलिस्टर तंतू बाजारात आणला. याची जाहिरात करताना पॉलिस्टर हा तंतू जगातील एक नवा चमत्कार असून या तंतूपासून बनविलेले कपडे इस्त्री न करता अनेक वेळा वापरले तरी नव्यासारखे दिसतात, असे म्हटले होते. अगदी सुरुवातीपासूनच पॉलिस्टर तंतू अतिशय लोकप्रिय झाला. १९५८ मध्ये ईस्टर्न केमिकल प्रॉडक्ट्स या कंपनीने कोडेल नावाचा पॉलिस्टर तंतू उत्पादित करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच पॉलिस्टर तंतूचा प्रसार सर्वदूर झाला. त्या वेळेस अमेरिका व युरोपमध्ये पॉलिस्टर तंतू हा इतर नसíगक तंतू आणि नायलॉन यांच्यापेक्षा स्वस्त होता. (भारतामध्ये हे चित्र सुरुवातीस याच्या बरोबर उलटे होते) या त्याच्या विशेषत्वामुळे पॉलिस्टर तंतूच्या बाजारपेठेचा आणि त्यापासून कापड बनविणाऱ्या गिरण्यांचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार झाला. अमेरिकेमध्ये अगदी जुन्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणीसुद्धा पॉलिस्टर तंतूपासून कापड बनविणारे छोटे-छोटे उद्योग उभे राहिले. या तंतूपासून बनविलेल्या स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कापडाची लोकप्रियता १९७० पर्यंत वाढत गेली. परंतु १९७० मध्ये पॉलिस्टर तंतूपासून बनविलेल्या ‘दुहेरी गुंफाई’ (डबल निट) केलेल्या कापडाच्या अपयशामुळे पॉलिस्टर तंतूची प्रतिमा खूपच खराब झाली आणि हा तंतू अंगावर घालावयाच्या योग्यतेचा नाही आणि या तंतूपासून बनविलेली वस्त्रे आरामदायक नसतात, तर संवेदनशील त्वचेला त्रासदायक असतात, असे मानले जाऊ लागले. त्यामुळे पॉलिस्टर तंतू आणि त्यापासून वस्त्रे बनविणाऱ्या उद्योगांना फार मोठा फटका बसला.
परंतु फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पॉलिस्टर तंतूने पुन्हा भरारी घेतली. पॉलिस्टर तंतूचे कापूस, लोकर यांसारख्या नसíगक तंतूंच्या बरोबर मिश्रण करून वस्त्रे बनविल्यास ती स्वस्त असतातच, पण नसíगक तंतूंपासून बनविलेल्या वस्त्रांपेक्षा अधिक टिकाऊ असतात, ते धुणे सोपे असते आणि त्यांना इस्त्री करावी लागत नाही हे लक्षात आल्यावर पॉलिस्टर तंतूंचा अशा मिश्रणासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होऊ लागला. त्याशिवाय पॉलिस्टरचे सूक्ष्म जाडीचे (मायक्रो फायबर) तसेच विविध आकाराच्या छेदाचे तंतू बनवून ते आरामदायी करण्यात यश आले. यामुळे पॉलिस्टर तंतूंपासून बनवलेली वस्त्रे पुन्हा लोकप्रिय होऊ लागली.

संस्थानांची बखर: कचरावाहक रोल्सरॉइस
भारतातील बहुतेक सर्व संस्थानिकांमध्ये विविध ब्रँडच्या गाडय़ांचा संग्रह करण्याचा छंद होता. ब्रिटिश व्हॉइसरायने रोल्सरॉइस कंपनीची गाडी आणल्यावर त्याची बरोबरी करण्यासाठी काही संस्थानिकांनीही महागडय़ा रोल्सरॉइस वापरायला सुरुवात केली. बऱ्याच संस्थानिकांकडे या गाडय़ा आल्यावर त्यात काही वैशिष्टय़ न राहिल्याने काहींनी आपल्याला हवा तसा रंगरूपात बदल करून तशा गाडय़ांची, चढेल किमतीने खरेदी सुरू केली.
१९३० साली पतियाळाचे महाराजा भूिपदरसिंग रोल्सरॉइसच्या एका शोरूममध्ये नवीन गाडीची ऑर्डर देण्यासाठी गेले. महाराजांकडे पतियाळात रोल्सरॉइसच्या २२ गाडय़ा होत्याच, पण काही नवीन बदल करून हव्या तशा रंगाची एक नवी गाडी त्यांना हवी होती. शोरूमच्या विक्रेत्याने महाराजांना उत्तर दिले की, तुम्ही म्हणता तशा गाडीची किंमत देण्याची तुमची ऐपत नाही. तुम्ही या भानगडीत न पडणे चांगले. या उत्तराने संतप्त झालेल्या महाराजांनी पतियाळात परत येऊन आपल्या सर्व २२ रोल्सरॉइस गाडय़ा पतियाळा शहरात कचरा, शेण वाहून नेण्यासाठी वापरणे सुरू केले. हे कळल्यावर व्हॉइसरायने त्या शोरूमच्या व्यवस्थापकाची कानउघाडणी करून महाराजांशी बोललेल्या त्या विक्रेत्याची नोकरीवरून हकालपट्टी करावयास लावली. रोल्सरॉइस कंपनीने झालेल्या घटनेबद्दल त्यांची माफी तर मागितलीच, पण पतियाळातील त्या २२ कचरावाहक रोल्सरॉइस पतियाळातून आणून महाराजांना हवे ते बदल करून त्या गाडय़ा नव्यासारख्या करून दिल्या.. तेही मोफत! महाराजा भूिपदरसिंग परदेश दौऱ्यावर जात. तिथे आवडलेल्या वस्तू भरमसाट किमतीला घेऊन त्यांचा मोठा संग्रह त्यांच्याकडे झाला होता. पतियाळात किला मुबारकात या संग्रहांचे वस्तुसंग्रहालय केलेले आहे. त्यातील विशेष आणि अद्वितीय असे शीश महलातील देशोदेशींची ३२०० विविध पदके होत. या पदकांमध्ये काही त्यांना मिळालेली व विकत घेतलेली, १४ व्या शतकापासूनची रशिया, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि भारतीय ही पदके या व्यवस्थित मांडून ठेवली आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com