टणक, फारसा वास नसलेली, अगदीच नकोशी, कडवट, आंबट-तुरट चवीची कच्ची फळं पिकल्यानंतर मात्र मधुर लागतात आणि हवीहवीशी वाटतात. असा आमूलाग्र बदल होतो तो कशामुळे?
आंबा, चिकू, सफरचंदसारख्या फळांत गर असतो. अशा फळांत बी अजून तयार व्हायची असेल, तर फळाचा आतील भाग आम्लाने भरून जातो. त्यामुळे फळ आंबट लागतं. साहजिकच पक्षी, माकडे, कीटक वा इतर प्राणी या फळांपासून दूर राहतात. जेव्हा आतील बिया पूर्ण तयार होतात, तेव्हाच फळ पिकतं, पण गुपित हे की, कच्चे फळ आंबट लागत असले, तरी त्यात भरपूर कबरेदकं असतात. फक्त त्यावर आम्लाचं आवरण चढवलेलं असतं.
फळ पिकताना फळातील तवकीराचे (स्टार्चचे) शर्करेत (साखरेत) रूपांतर होते. फळाच्या आवरणाच्या रंगातही बदल होतो. हिरव्या रंगाची फळं लाल (उदा. सफरचंद, टॉमेटो), केशरी किंवा पिवळी (आंबा, पपया, केळे) अशी आकर्षक दिसू लागतात. फळांचा सुवास पसरतो. अशा रंगांकडे आणि वासाकडे प्राणी-पक्षी आकर्षति नाही झाले तरच नवल. फळांचं पिकणं हे ऋतुमानावर अवलंबून असतं. उदा. आंबे उन्हाळ्यात पिकतात, तर सफरचंद हिवाळ्यात तयार होतात. ऋतू, तापमान, आद्र्रता यांतील बदलांनुसार वनस्पती इथिलिन तयार करतात आणि सर्व भागांकडे पाठवतात.  
इथिलिन फळात पोहोचलं, की फळांतील सर्व पेशींना संदेश जातो. मग स्टार्चचं अमायलेज विकराच्या (ज्यामुळे स्टार्चचे जलअपघटन होते) साहाय्याने शर्करेत रूपांतर करण्याचे काम सुरू होतं. अधिक प्रमाणात असलेले आम्ल कायनेज विकराच्या साहाय्याने जवळपास उदासीन व्हायला लागतं. त्यामुळं फळाचा  तीव्र आंबटपणा कमी होतो. त्याचप्रमाणे फळाच्या आवरणातील हरितलवके अन्थोसायनेनमध्ये बदलू लागतात आणि फळाला त्याचा रंग यायला सुरुवात होते. कच्च्या फळात पेक्टीनमुळे आलेला टणकपणा पेक्टीनेज विकरामुळे कमी होतो. फळ रसाळ होतं.  हायड्रोलेज विकरामुळे बाष्पनशील सुगंधी द्रव्ये तयार होतात. त्यामुळे त्या फळाचा वास सगळीकडे पसरतो आणि प्राणी-पक्ष्यांना सांगतो- आता फळ खाण्यासाठी तयार आहे!  
प्रबोधन पर्व: खणखणीत बुद्धिवादाचे प्रणेते – गोपाळ गणेश आगरकर
आगरकरांनी महाराष्ट्राला एका नव्या विचारसरणीची ओळख करून दिली, तिचा आयुष्यभर पुरस्कार केला, त्यासाठी मानहानी, आरोप-प्रत्यारोप, टीका, अवमान अशा किती तरी गोष्टी सहन केल्या. ती विचारसरणी म्हणजे ‘बुद्धिवाद’. प्रत्येक गोष्टीची इष्टनिष्टता बुद्धीच्या जोरावर तपासून मगच ती स्वीकारायची की नाकारायची, हे ठरवणं म्हणजे बुद्धिवाद. ‘इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार’ हे आगरकरांचे जीवनध्येय होते. त्यांच्याविषयी माधव दामोदर अळतेकर लिहितात – ‘‘महाराष्ट्रांत बुद्धिवादाची ध्वजा तत्त्वनिष्ठेच्या भक्कम पायावर आगरकरांनीं उभी केली आणि म्हणूनच ती भयंकर वादळांना, मोठाल्या वातचक्रांना दाद न देतां फडफडत राहिलेली आहे.. दुराग्रही सनातनी व्यभिचाराचें व दुराचाराचें समर्थन धर्माच्या नांवाखालीं करतात तर उल्लू आधुनिकबरोबर तशाच किंवा तशासारख्या गोष्टींचें ‘आधुनिकते’च्या नांवाखालीं करतात आणि म्हणून अशा दोन्ही दुष्ट लोकांवर आगरकरांनीं कोरडे ओढलेले आहेत.’’ तर इरावती कर्वे म्हणतात – ‘‘हिंदु देश, हिंदुधर्म व हिंदी संस्कृति ह्य़ा सर्वाबद्दल मनांत अमाप प्रेम असूनहि ह्य़ा तीन्हींमध्यें जें जें वाईट दिसेल तें तें शोधून नाहीसें करण्याचा आगरकरांनी प्रयत्न केला.. आगरकरांच्या भूमिकेंत राजकारणी पुरुषांचे डावपेंच नाहीत; पुढारीपणाची हांव नाहीं, अधिकाराची लालसा नाही; समाजहिताची तळमळ व दलितांबद्दल करुणा हें त्यांच्या सर्व लेखांचें अधिष्ठान आहे.’’ आगरकरांनीच बोलके सुधारक, कर्ते सुधारक आणि सुधारणानिंदक असे लोकांचे तीन वर्ग केले आहेत. ‘‘समाज ही कांहीं स्वतंत्र मूर्तिमंत वस्तू नाहीं. समाजांतील घटक हलले तर समाज हलतो, ते मंदावले तर तो मंदावतो आणि ते मागे हटूं लागले तर तो मागें हटूं लागतो,’’ असे आगरकरांनीच म्हटले आहे. ‘आज आगरकर असते तर?’ यापेक्षा आजही आगरकर आहेत याचे भान ठेवून त्यांच्या विचारांचे मनन केले तरी बरंच काही साध्य करता येईल.

मनमोराचा पिसारा: हमरी अटरिया
‘हमरी अटरिया पे’ हा दादरा एरवी डोळे मिटून ऐकावा असा असला तरी त्याचं गाणं होतं तेव्हा दीक्षित नेन्यांच्या माधुरीच्या कथ्थकशैलीतल्या नाचाकरता डोळे उघडून पाहावा असा आहे. देवेश मीरचंदाणीच्या कोरिओग्राफीवर ती अफलातून नाचते. घुंघटामधून तिचं ‘मिलियन डॉलर स्माइल’ बिजलीसारखं चमकतं आणि त्याच चापल्यानं ती गिरकी घेऊन निमिषभर थांबते, तो क्षण.. क्या बात है! गुलजारजींच्या अजोड शब्दानं रेखा भारद्वाजनं सामर्थ्यांनं सूरमय केलंय. मजा आया..
पुन्हा डोळे मिटू आणि बेगम अख्तरनं (सिंधू) भैरवीत गायलेला मूळ दादरा ऐकू. गाण्यातली नृत्यात्मक लय बेगमनं आपल्या बुलंद, दाणेदार स्वरातून साकारलीय. पुन:पुन्हा ऐकून त्यातली नजाकत हळूहळू मनात उलगडते आणि मनावर अक्षरश: भुरळ पडते. ते शब्द आणि सूर अंतर्मनातल्या अनामिक हुरहुरीला साद घालतात.
हमरी अटरियामध्ये भांडूनतंडून दूर गेलेल्या प्रियकराची आर्जवं आहेत. दुरावलेल्या सावरियाला साद घातली आहे. तुझ्याविना मी अधुरी आहे.. असं ती म्हणते. महाकवी जमाल मिर्झाच्या शब्दांनी कमाल केलीय. प्रेमाच्या मार्गावर भांडण, गैरसमज आणि झगडण्याचं अवघड वळण येतं. वळण कसलं? दोन वेगळे रस्तेच फुटतात. प्रियकर आणि प्रेयसीची ‘डगर’ वेगळी होते. त्यामुळे मन विरहात होरपळून जातं.
पण मुआ अहंपणा आड येतो. मानापमानाची खिंड होते. अखेर प्रेयसी पुढाकार घेऊन म्हणते, ‘ये ना प्रियकरा, माझ्या सावरिया, माझ्यापाशी ये , देखादेखी होईल आणि निमिषात सगळा झगडा मिटून जाईल.’
तुझ्या आठवणींच्या आसवांनी माझे डोळे पाझरतात आणि तू लपविलेस तरी तुझे अश्रू मला दिसतात. माझ्या शुष्क जीवनातला तू पाऊस, वैराण आयुष्यातली बहार आहेस.. ही अखेरची भैरवी गाऊन मी वाट पाहत्येय तुझी..
दादऱ्यामधल्या या शब्दात केवळ प्रेयसी प्रियकराची विरहवेदना नाहीये. त्यांना ‘सूफी’ तत्त्वाचं अस्तर आहे. देखादेखी हा शब्द अगदी खास. कारण त्यात केवळ नजरभेट इतकाच अर्थ नाहीये. तुझ्या-माझ्या जीवनानुभवाची जुळणी करायची आहे, असा भावार्थ आहे.
आता ही वेदना शारीरिक आणि मानसिक पातळीवर राहत नाही. ‘प्रेम की भिक्षा मांगे भिखारन, लाज हमरी रखियो साजन’ या शब्दातून मीरेच्या काव्यरचनेची आठवण येते. मी समर्पण करते आहे, त्याचा स्वीकार करून आपलीशी कर, असं भक्तिरूप त्या शब्दातून जाणवतं.
मग ही विरहिणी खूप व्यापक होते. अनेक पंथ, धर्म, जाती-जमातींना पुरून उरणाऱ्या शुद्ध मानवी दु:खाचे त्यात पडसाद उमटतात. खरंच, संगीत हा विलक्षण अनुभव होतो. गंमत म्हणजे डोळे मिटून आणि उघडे ठेवूनही!
 डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com