डेनिमच्या खरेदी मूल्यातील विविधता ही डेनिमच्या बनवण्याच्या प्रक्रियेशी वा गुणात्मक दर्जाशी निगडित आहे. ताणा व बाणा निर्मितीच्या प्रक्रिया जरुरीप्रमाणे दोन प्रकारे घडवून आणता येतात. एक विनाचाती अति वेगाच्या भोवऱ्याने पीळ देणाऱ्या कताईकरणाच्या पद्धतीने घडून येते. दुसरी पारंपरिक तत्त्वावर वेगाने फिरणाऱ्या फुग्याने पीळ देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या चात्यांवर करतात. विनाचाती यंत्रांवर निर्मिलेल्या धाग्यांच्या किंमती कमी असतात. तसेच असमान व्यासाच्या (त्याला ‘स्लब’ डेनिम म्हणतात) तत्त्वाने धाग्यांमध्ये येणारी विविधता जिन्सला एक वेगळा आयाम देते. डेनिमचे हे विविधांगी रूप त्याच्या किंमतीतील चढ-उताराचे कारण आहे. प्रत्येक प्रक्रिया मूल्यवृद्धी करते. या मूलभूत प्रक्रियांच्या अपरिहार्य मूल्यवृद्धीनंतर पेहरावाला पूर्णरूप देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या; वस्त्र योग्य पद्धतीने कापणे, डिझाइनप्रमाणे शिवणे, खिसे लावणे, गुंडय़ा लावणे, पट्टा, लूप, शोभेत भर घालण्यासाठी लावावे लागणारे लेबल, भरतकाम, रिव्हिट यासारख्या जिन्स सुसज्जतेसाठी लागणाऱ्या साहाय्यक प्रक्रिया मूल्य विविधतेच्या मुळाशी आहेत. सरतेशेवटी निरनिराळ्या प्रकारच्या धुण्याच्या आद्र्र व अल्कलीयुक्त प्रक्रियांचे मूल्य मूळ वस्त्रनिर्मितीपेक्षा (कापणे/ शिवणे) जास्त होते. पण हे अपरिहार्य आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण यामधील बहुतांशी कोरडय़ा प्रक्रिया- उदा : वाळू घर्षणाच्या प्रक्रिया, द्रवफवारा, केरसुणी आभूषणाच्या/ कल्ले करणाऱ्या प्रक्रिया या हस्तकौशल्याच्या कुशलतेवर अवलंबून आहेत, त्या यंत्राने होत नाहीत. या सर्व श्रममूल्यांवर आधारित प्रक्रिया आहेत. यामध्ये महत्त्वाचे हे की जेवढी जास्त आभूषणे तेवढी धुण्याची प्रक्रिया प्रदीर्घ व खर्चीक. जेवढय़ा जास्त प्रक्रियेमधून जिन्स जाते, तेवढी ती महागडी होत जाते.
तुम्ही जर कल्ले असलेली, विकृत केलेली (फाडलेली), विशिष्ट रीतीने अधोरेखित केलेली एक जिन दुसऱ्या साध्या जिनशी तुलनात्मक दृष्टीने बघितली तर तुमच्या लक्षात येईल की महागडय़ा म्हटल्या जाणाऱ्या जिनमध्ये किती हस्तकौशल्य पणास लागलेले आहे. यावरून या कामाला लागणारे कामगारांचे वा व्यक्तिकेंद्रित श्रम व त्यामुळे वाढणारे मूल्य याची कल्पना यावी, जेव्हा ग्राहकांची निवड ही विचित्रपणे विकृत केलेली (रिप) जिन आहे, तेव्हा कारखान्यात त्याकरिता खास त्यातील कसबी कामगार त्यामागे लावावा लागतो; हीच ती मूल्यवृद्धीची साखळी.
जिन्ससाठी जरी डिझाइन, आकृतिबंध व वस्त्राचा दर्जा हे महत्वाचे असले तरी आद्र्र प्रक्रियांचा (धुण्याच्या) जिन्सचे स्वरूप बदलण्याचा क्रांतिकारी परिणाम कोणतीच प्रक्रिया साधू शकत नाही.
शिखा शर्मा (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – सिरोही राज्यस्थापना
सध्याच्या दक्षिण राजस्थानातील सिरोही या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी १३१२ साली, चौहान राजपूत वंशाच्या देवरा घराण्याचा वंशज देवराजऊर्फ प्रतापसिंह याने आपले छोटेखानी राज्य स्थापन केले. पुढील सिरोहींच्या राजांपकी विजयराज आणि कुंभा यांनी परमार राजांकडून मंदार, बडगाव आणि अबू हे परगणे घेऊन मोठा राज्यविस्तार केला. सिरोही राजा साहसमलने राणा कुंभास आश्रय दिला होता. राणा कुंभने साहसमलची अनुमती न घेता सिरोहीत वसंतगढ आणि अचलगढ हे किल्ले स्वत:साठी बांधले. साहसमलने त्या किल्ल्यांची मागणी करूनही राणा कुंभाने त्याच्या हयातीत ते दिले नाहीत. जोधपूर महाराजाने सिरोहीवर अनेक वेळा आक्रमण केले. १८०८ मध्ये जोधपूरच्या मानसिंह तृतीयने तत्कालीन सिरोही राजा उदयभानसिंहावर हल्ला करून त्याला कैदेत ठेवले, त्याच्याकडे अवास्तव खंडणीची मागणी करून त्याला ती रक्कम गोळा करण्यासाठी कैदेतून मुक्त केले. खंडणी गोळा करण्यासाठी उदयभानने प्रजा आणि सरदार, उमरावांवर नवे कर लादल्यामुळे काही सरदार शेजारच्या पालनपूर राज्यात सामील झाले. बाकीचे सरदार व धनिकांनी उदयभानसिंहाला अबू येथे नजरकैदेत ठेवले. अशा वेळी ब्रिटिश त्याच्या सुटकेसाठी आले. ब्रिटिशांनी सिरोहीच्या राजेपदी उदयभानच्या भावाला बसवून, १८१७ मध्ये संरक्षणात्मक करार करून त्या राज्याला संस्थानाचा दर्जा दिला.
सिरोहीचे पुढचे राजे महाराव केशरीसिंह आणि महाराव सरूपसिंह यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम प्रशासन देऊन सिरोही संपन्नावस्थेत आणले. महाराव मानसिंह हा स्वत: तलवारबाजीत आणि तलवार बनविण्यात तज्ज्ञ होता. त्याच्या ‘मानशाही’ या तलवारींमुळे सिरोही प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर येथील लोकांनी मानशाही तलवारी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. महाराव शेवोसिंगने १८४५ साली ईस्ट इंडिया कंपनीला अबु हा परगाणा कराराने दिला पुढे १९४७ साली ब्रिटिशांनी अबु परत सिरोहीमध्ये सामील केले. भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथम सिरोहीचा काही भाग मुंबई इलाख्यात व काही राजस्थान युनियनमध्ये वर्ग केला गेला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com