गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कुत्र्यांचा वापर करतात, कारण या श्वानवीरांची नाकं तेजतर्रार असतात, असा समज आहे. पण आपलं म्हणजे मानवी नाकही काही कमी नाही, बरं का, असं वैज्ञानिकच सांगताहेत आणि तेही एका अजीबोगरीब प्रयोगानंतर. त्या प्रयोगासाठी त्यांनी कापसाच्या सूक्ष्म धाग्यांवर चॉकलेट चोपडलं आणि ते एका मदानातल्या गवतावर पसरून दिले. त्यानंतर त्यांनी वीस जणांचे डोळे बांधले, कान बंद केले, हाताच्या कोपरावर आणि गुडघ्यांवर जाड पडदे बसवले आणि त्यांना ते धागे शोधून काढायला सांगितलं. थोडक्यात त्यांच्या मदतीला केवळ गंधसंवेदनाच असेल याची खात्री करून घेतली. त्यापैकी बहुतेक जणांनी तो धागा शोधून काढला. तिघा-चौघांनी तर त्या धाग्याचा संपूर्ण ठावठिकाणाही मिळवला.

हवेत सहज उडून जाणारे रसायनांचे रेणू जेव्हा आपल्या घ्राणेंद्रियातल्या संवेदकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यातून एक विद्युतसंदेश आपल्या मेंदूकडे पोचतो. तिथं त्याचं विश्लेषण होऊन त्या वासाची ओळख पटते आणि त्याची तीव्रताही ध्यानात येते. तेव्हा आपल्या गंधसंवेदनेच्या क्षमतेचं मोजमाप करण्यासाठी  मेंदूपर्यंत पोचायला हवं. ते तर महाकर्मकठीण.

तेव्हा इस्रायली वैज्ञानिक नोआम सोबेल यांनी वेगळीच युक्ती केली. त्यांनी काही हजार गंध रसायनांची यादी बनवली. प्रत्येकाच्या निरनिराळ्या गुणधर्माचं एक कोष्टक तयार केलं. त्यांचं संगणकाकरवी विश्लेषण करून दोन गंधांमध्ये किती वेगळेपण आहे, याचा आढावा घेतला. थोडक्यात दोन गंधांमध्ये किती गंधात्मक अंतर आहे याची एक मोजपट्टी तयार केली. ओलफॅक्टोमीटर या यंत्राच्या मदतीनं या अंतराला आकडेवारीत बसवलं.

आता त्यांनी काही मानवी गंधविशारदांना दोन गंध एकमेकांपासून वेगळे ओळखायला सांगितलं. जितकं त्या दोन गंधांमध्ये जास्त अंतर होतं तितकी त्यांची वेगळी ओळख सहज पटवता आली. हे गंधात्मक अंतर हे गंधसंवेदनेच्या क्षमतेचं एक मोजमाप झालं.

तरीही कोणताही एकच गंध मंद आहे की उग्र आहे, याचंही मोजमाप करणं आवश्यक होतं. कारण सुगंधसुद्धा अतिशय उग्र असला तर नाक दाबून धरायला लावतो. दरुगधाची तर बाबच निराळी. तेव्हा एकाच गंधाच्या निरनिराळ्या मात्रेमधल्या गंधातराचंही कोष्टक त्यांनी बनवलं. त्यातून मग किती कमी अंतराची निर्विवाद ओळख नाक पटवू शकतं, याचं मोजमाप केलं गेलं. तीच झाली आपल्या गंधसंवेदनेची क्षमता. एखाद्याचं नाक किती तीक्ष्ण आहे हे आता आकडेवारीतही सांगता येईल. नुसतीच अलंकारिक भाषा वापरण्याची गरज राहिलेली नाही.

-डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गुरुदयाल सिंग यांच्या कादंबऱ्या

गुरुदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांनी, पंजाबी कादंबरी लेखनाला एक नवे वळण दिले. त्यांच्या ‘मढी दा दीवा’, ‘अणहोए’ या सुरुवातीच्या कादंबऱ्या त्यांच्याच जीवनानुभवावर आधारित आहेत. त्यानंतरही ते कादंबरीलेखन करीत होते. तेव्हा आपल्या आजूबाजूला असलेल्या जीवनाविषयीची समज त्यांना ते इतरांहून वेगळे आहेत हे सिद्ध करीत होती.

‘परसा’ ही त्यांची कादंबरी केवळ समाज वास्तव्य चित्रित करीत नाही तर या कादंबरीच्या नायकाची ही कथा पंजाबच्या विविध घटकांनी बनलेल्या संस्कृतीचे चित्रण करते, प्रतिनिधित्व करते. ‘परसा’ ही कल्पितकथा असली, तरी यामध्ये पंजाबी समाजातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंगांचे चित्रण आहे.

‘परसा’ हा नायक जन्माने ब्राह्मण आहे. पण कर्माने शेतकरी आहे. त्यामुळे तो ‘जाट ब्राह्मण’ समजला जातो. तो हिंदूच आहे. पण त्याचे एकूण व्यक्तिमत्त्व दिसते मात्र अगदी खास ‘शीख’ असल्यासारखे. त्यामुळे समाजात तो उपरा समजला जातो. तो साधा शेतकरी असूनही स्वत:चे स्वत्व कधीही सोडत नाही.

कादंबरीच्या या नायकाला तीन मुले आहेत. पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर तिला दिलेल्या वचनानुसार मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण याकडे त्याचं लक्ष असतं. त्याचा मोठा मुलगा क्रीडा शिक्षक असून, तो इंग्लंडमध्ये स्थायिक होतो. दुसरा पोलीस अधिकारी आहे. त्याची जगण्याची रीत वडिलांपेक्षा वेगळी आहे. धाकटा वसंत आपला आदर्श मूल्यांचा, तत्त्वांचा वारसदार आहे असं परसाला वाटतं. खऱ्या अर्थाने तो वडिलांसारखा अस्सल पंजाबी आहे. पण तो नक्षलवादी होतो आणि पोलिसांच्या चकमकीत शेवटी मारला जातो. पंजाबमधील एकूणच परिस्थितीचे चित्रण विलक्षण संवेदनशीलतेने लेखकाने केले आहे. मोजामध्ये परंपराविरुद्ध आधुनिकता, दांभिकपणा विरुद्ध वास्तव, आसक्ती विरुद्ध संयम, वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध सामाजिक क्रांती या परस्परविरोधी पण तरीही परंपरांची ओढ आणि पंजाबी संस्कृतीची मूल्ये या समान सूत्रात, एकमेकात बांधलेल्या स्थितीचे अत्यंत वास्तववादी चित्रण गुरुदयालसिंह यांनी या कादंबरीत केले आहे. पंजाबी संस्कृतीत सूफी, संत आणि गुरूंच्या संमिश्र परंपरा आहेत. हीच पंजाबची ओळख आहे. याची जाणीव करून दिली आहे. तसंच त्यांनी जात आणि धार्मिक पंथ, संप्रदाय यांच्यातील भेदाभेदाविरुद्ध आवाज उठवला आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com